अल्पसंख्याक
मी पाकिस्तानात छळला गेलेला
हिंदू आहे
मी हिंदूस्तानात दाबला गेलेला मुस्लिम आहे
मी इस्त्रायलकडून मारला जाणारा
पॅलेस्टिनियन आहे
मी जर्मनीत ठार झालेला ज्यू आहे
मी इराककडून जाळला गेलेला कुवैती आहे
मी चीनकडून चिरडण्यात आलेला तिबेटी आहे
मी अमेरिकेत घुसमट होत असलेला कृष्णवर्णीय आहे
मी आयसीसकडून अन्यायग्रस्त यजीदी आहे
मी अशोकाकडून हरलेला कलिंगी आहे
मी रशियाकडून त्रस्त सिरीयन आहे
पाॅलिश आहे,
हंगेरियन आहे,
युक्रेनीयन आहे
मी अकबराकडून पराभूत मेवाडी आहे
मी ब्रिटनकडून लुटला गेलेला आशियाई आहे
आफ्रिकन आहे
आॅस्ट्रेलियन आहे
उत्तर आणि दक्षिणी अमेरिकन आहे
मी अमेरिकेच्या शस्त्राअस्त्राने उद्धवस्त
केला गेलेला इराकी आहे
व्हिएतनामी आहे
लिबीयन आहे
अफगाणी आहे,
जवळजवळ ७० नागरीकत्वाची
जळती कहाणी आहे
मी म्यानमारमधून पळवून लावलेला
रोहिंग्या आहे
मी श्रीलंकेतून संपवण्यात आलेला तमिळी आहे
मी चौर्याऐंशीचा शीख आहे
मी भारतातील जंगलांमधून उद्धवस्त केला गेलेला आदिवासी आहे
मी आपल्या भूमीवर कैद काश्मिरी आहे
मी काश्मिरातून बेघर करण्यात आलेला काश्मिरी पंडीत आहे
मी आसामचा बंगाली आहे
मी स्वतःच्या देशात वर्णभेद साहणारा पूर्वोत्तरवासी आहे
मी पितृसत्ताकतेपासून जीव वाचवणारी मुलगी आहे
मी कुटुंबातून बहिष्कृत समलैंगिक आहे
मी कोलाहलात दाबला गेलेला सवाल आहे
मी वेदांनी बहिष्कार टाकलेली एक जात आहे
मी सामाजिक प्रतिष्ठेसाठी मारला गेलेला प्रेमी आहे
मी धर्मांधांकडून धमकावला गेलेला नास्तिक आहे
मी झुंडीबाहेर ढकलली गेलेली चेतना आहे
मी तर्कशून्य झुंडखोरीने घाबरवलेला तर्कनिष्ठ आहे
मी कधी एखाद्या गावातला,
कधी एखाद्या राज्यातला
कधी एखाद्या देशातला
कधी एखाद्या समाजातला
कधी एखाद्या संस्थेचा
तर कधी अवघ्या जगातला अल्पसंख्याक आहे
मी बहुसंख्याकांना दाखवला गेलेला बागुलबुवा आहे
मी दरोडेखोर सत्तेचा सर्वात सोपा प्यादा आहे
आणि मला ठाऊक आहे की हे दोघे हसतील जर मी स्वतःला निरपराध म्हटले तर
मग माझी भूमी कुठली आहे
माझा देश कुठे आहे
माझे घर कुठे आहे
या पृथ्वीवर मी काय कायमच
बेघर-फिरस्ता असणार आहे?
मूळ हिंदी कविता
पुनीत शर्मा
Puneet Sharma
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav