के.श्रीलता यांच्या तीन कविता

के.श्रीलता यांच्या तीन कविता

काश्मिरखोर्‍यात ज्या अता मोहम्मद यांनी एकट्याने दोनशेच्यावर बेवारस मृतदेहांना दफन करण्याचे आणि त्यांच्या कबरींची देखरेख करण्याचे काम केले होते,त्या अता मोहम्मद यांना ही कविता समर्पित आहे.
अकरा जानेवारी २०१६ रोजी अता मोहम्मद यांचे निधन झाले.
------
१)
मी त्यांना दफन करतो,
चिनार वृक्षांच्या गर्द साक्षीने
-------------------------------

मी त्यांना दफन करतो,
चिनार वृक्षांच्या गर्द साक्षीने,
ते रक्तबंबाळ चंद्रासारखे चेहरे
ज्यांनी अद्याप तारुण्याची गोडी
चाखली नव्हती,
ज्यांना नुकतीच कुठं दाढी
फुटण्यास सुरुवात झाली होती,
खोट्या चकमकी,जखमी देह
जे अतिशय गरजेचे होते,
कुणाला ना कुणाला तरी कुठे ना कुठे
ती मुले ज्यांना त्यांच्या आया कधीच पाहू शकल्या नाहीत,
आता आता जन्मलेली बाळं,
तरुण मुली ज्यांची जननेंद्रिये
कापलेली-फाटलेली आहेत
आणि ज्यांच्या डोळ्यात स्वप्ने होती....
मी सर्वकाही दफन करतोय
आणि माझ्या नसांमध्ये रक्त गोठून
जात आहे

माझा वेळ व्यतीत झालाय
हरवलेल्या,मेलेल्या आणि कायमचे
लुप्त झालेल्या लोकांना नावं देण्यात,
प्रत्येक नव्या कबरीवर फातेहा पढण्यात,
माझा वेळ गेलाय हमसून हमसून रडण्यात,
आणि माझ्यासह रडले आहेत
चिनारवृक्ष
या चिनारवृक्षांच्या पायथ्याखालीच
दफन आहे माझी ही आनंददायी वृध्द ओळख

एक मित्र चिडवतो मला,
म्हणतो,'मोहम्मद, तु इथे दफन
करण्याचे काम सराईतपणे करतोयस
ना?
तो बरोबरच बोलतोय,
वाट्टेल ते मी दफन करु शकतो,
मात्र कधीही दफन करु शकणार नाही
मी माझ्या आठवणींना!
-----------------

२८ आॅगस्ट २०१८ रोजी झालेल्या देशव्यापी छापेसत्रात पुणे पोलिसांनी हैद्राबादेतील इंग्रजी आणि विदेशी भाषा विद्यापीठाचे ५१ वर्षीय प्राध्यापक के.सत्यनारायण यांच्या घरावरही छापा टाकला.प्राध्यापकांचे सासरे वरवरा राव देखील तिथे राहतात असा बनाव निर्माण करणारी खोटी कागदपत्रेही तयार करण्यात आली.

२)
न विचारताच बरेच काही
----------------------------

ते आठ घंटे त्यांच्या घराची झडती घेतात,न विचारताच ब्रेड उचलतात
जो टेबलावर ठेवल्याठिकाणी भुरभुरत होता
ते न विचारताच ती प्रेमपत्रे उचलतात जी त्यांनी आपल्या धर्मपत्नीला बावीसाव्या वर्षी लिहीली होती
ते न विचारताच मार्क्सचे एक पुस्तक
काढतात,जे त्यांनी आबिदच्या फुटपाथवर दहा रुपयात विकत घेतले होते,
त्यांच्या पुस्तकांवर जमा झालेली धूळ ही देशाच्या पतनाएवढीच विशाल आहे
ते न विचारताच बाबासाहेबांची तसबीर उचलतात
आणि त्यामागून पळणार्‍या कोळकिड्याकडे बघून हसतात
त्यांच्यातला एकजण त्यावर बंदूक झाडण्याचा अभिनय करतो
ते न विचारताच त्यांच्या पत्नीविषयीच्या त्यांच्या काळजीचा उल्लेख करतात आणि दुसर्‍या खोलीत त्यांना कशी वागणूक देतायत
ते न विचारताच आपल्या मुलीविषयी त्यांच्या पोटात उठणार्‍या पितृभयाला जोखतात----
काय होईल तिचे जर....?
ते न विचारताच त्यांच्या मेंदूतल्या चळवळीच्या गाण्यांचा छडा लावतात आणि ती ते गायलाही लागतात,
आपल्या कठोर आणि चेष्टेखोर आवाजात
त्यांचा संवाद बाणांसारखा भेदून टाकतोय काळ्या रात्रीला,
जी खिडकीवर बसलीय
चिडीचूप आणि भेदरलेली
---------------------------

३)
एक बेपत्ता माणूस
--------------

ते सांगतात,
एखादा मनुष्य बेपत्ता होऊ शकतो
कुठलीही खूण मागे न ठेवता
अशा घटना घडत राहतात
बेपत्ता लोक कुठली सावली ठेवत नाहीत
जेवणाची खरकटी भांडी वाॅश बेसिनमध्ये ठेवत नाहीत
आणि ना आंघोळीच्या साबणाचे चौकोनी तुकडे
ना घासून विस्फारलेले टूथब्रश
ना फ्रिजमध्ये कागदाचे कपटे
ज्यात प्रेमाचे वगैरे प्रकटीकरण असते
परंतू ठाम गोष्ट ही आहे की बेपत्ता मनुष्याच्या आयुष्यातही विकास वा त्यासारख्याच गोष्टींची शक्यता असू शकते
आणि त्यासाठी
एका चाकूच्या धारेसारखी
ती सावलीची उपस्थिती
जी दुसर्‍या कोणाच्यातरी वाॅश बेसिनमध्ये जेवणाची भांडी सोडून येते आणि आंघोळीच्या साबणाचे
चौकोनी तुकडे तसेच घासून काहीसे विस्फारलेले टूथब्रश
आणि दुसर्‍याच कोणाच्यातरी
फ्रीजमध्ये प्रेम वगैरेचे प्रकटीकरण
करणारे कपटे
थोडं थोडं विस्कटत राहतात
आपल्या आयुष्याच्या
भूमितीय संगतीला
----------------

मूळ इंग्रजी कविता
के.श्रीलता

हिंदी अनुवाद
मंगलेश डबराल

मराठी अनुवाद
भरत यादव


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने