------------------------------------
हिटलरची चित्रकला पाहताना
जेव्हा धरला असेल हातात कुंचला हिटलरने
इच्छा नसतानाही उलगडले असतील अर्थ तर्हेतर्हेचे रंगांनी
शेकडोवेळा मिचकावले गेले असतील
आश्चर्याने,
गोबेल्स आणि हिमलरचे डोळे
नरसंहारात सामील असलेल्या मानसभक्तांच्या क्रूर तुकड्या कोसळल्या असतील आकाशातून..
...तोफा,बंदूका आणि बाॅम्बनी रोखले असतील आपले हात
इतिहासाचा तो भयंकर क्षण थबकला असेल श्वासांना रोखून
कला आणि क्रूरता यांच्या विस्मयकारक
गळाभेटीवर हसताना,
ठाम निश्चल
हुकूमशहाच्या भयानक कटकारस्थानांना
रंगांनी सजवताना बारुदगंधीत हवा
डोळे फाडून बघत असेल टकामका...
इतिहासातील त्या गलितगात्र क्षणाला
ज्ञात नव्हता एक हुकुमशहा
रंगारी होण्यामागचा अन्वयार्थ...
...जाणत होता फक्त तो इतकेच,
युध्दाच्या कहाण्या आणि तसबिरी या
फक्त आणि फक्त कच्या मांसाच्या रंगानेच लिहिल्या व घडविल्या जातात...
हुकूमशहाच्या रक्ताळलेल्या हातात कुंचला येणे आश्चर्यच ठरले असेल
..........ठरले असेल आश्चर्यच काळजातील
नाजूक तारांचे तोफांच्या गर्जना आणि
किंकाळ्या,आक्रोशांबरोबर संतुलन जुळवून घेणे...
......आश्चर्यच की चित्रांमध्ये उतरलेल्या रंगांच्या मधुर बोलीचे
गोळ्यांबरोबर ताळमेळ जमवत राहाणे..
खरं आहे,
काळ हा इतिहासाचा सर्वात महान साक्षीदार असतो
आपणांस त्याची साक्ष लक्षपूर्वक ऐकली पाहिजे...
त्या किळसवाण्या लहरी आणि विचित्रतेवरील पडदा
हटवून
काळाच्या सूत्रधाराची भाषा समजून घ्यायला हवी
त्याच्या संकेतांची रहस्ये उलगडत चाललीयत सावकाशीने..
कपटी,चलाख हुकूमशहा कलाकारही असतो
कलाकाराला गर्दी हवी असते,
टाळ्याही हव्या असतात
तो गर्दीला कधी हसवतो कधी रडवतो
आणि शेवटी हिंसक बनवून सोडतो
खरेतर हुकूमशहांच्या कारस्थानांना पोषक असते उन्मादी गर्दी
हुकूमशहाची अंधभक्त असते हिंसक झुंड
हुकूमशहाला इच्छित फळ देतात
विवेकशून्य झुंडी
हुकूमशहाची ओळख टिकवून ठेवते दिशाहीन गर्दी
हुकूमशहाची अदृश्य शक्ती असते
ही गर्दी
काळाचा सूत्रधार घोषणा करत आहे की,
हुकूमशहा आणि झुंडीचे तंत्र यांच्यातील
नात्याची आता 'पुनर्स्थापना' झाली आहे...!
हिंदी कविता
मार्टिन जाॅन