मुंबईचा तिबेटी (अनुवादीत कविता)

मुंबईचा तिबेटी (अनुवादीत कविता)

  मुंबईचा तिबेटी
  ------------------
ते जे मुंबईतले तिबेटी आहेत
परदेशी नाहीयेत

तो चायनीज हाॅटेलात स्वयंपाकी
आहे,
लोक त्याला बीजींगमधून पळालेला
चिनी समजतात

उन्हाळ्यात परळपूलाखाली
स्वेटर विकतो,
लोक समजतात की,तो
कुणी रिटायर 'बहादूर' असावा

मुंबईचा तिबेटी जरा कुठे
तिबेटी शैलीत मुंबईच्या शिव्या
घालतो,
भाषेचं संकट आलं की,
तिबेटी बोलायला लागतो,
पारशी त्याच्या याच गोष्टीवर हसतात

मुंबईच्या तिबेटीला
मिड-डे वाचायला आवडतं
एफएम त्याच्या आवडीचं आहे
हे माहिती असूनही की,
त्यावर
कधी तिबेटी गाणं वाजणार नाही

तो एका सिग्नलवरुन बस पकडतो
चालत्या रेल्वेत चढतो
एका चिंचोळ्या काळ्या गल्लीतून
जात,
आपल्या खोलीत आसरा
मिळवतो...

अतिशय दुखावतो जेव्हा
लोक 'चिंग-चाॅंग,पिंग-पाॅंग' म्हणत
त्याच्यावर हसतात..

मुंबईचा तिबेटी आताशा
फारच थकला आहे
त्याला थोडीशी झोप हवीय
आणि
एक स्वप्न...
११ ची विरार फास्ट
त्याला हिमालयात नेईल
आणि ८-०५ ची फास्ट लोकल
त्याला पून्हा आणून सोडेल
चर्चगेटला...
.....पून्हा त्याच महानगराच्या त्याच नव्या साम्राज्यात.
----------------
मूळ तिबेटी कविता
 तेनजी सुंडू

हिंदी अनुवाद
अनुराधा सिंह

मराठी अनुवाद
भरत यादव
--------------
साभारः(प्रेम भारद्वाज संपादित
हिंदी नियतकालिक भवन्ति)

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने