मम्मी खोकत असते या दिवसात
सकाळपासून संध्याकाळपर्यंत
आणि बर्याचदा रात्रीसुध्दा
नाही झोपत त्या खोलीत
जिथे झोपले असेल कुणी अन्य
ती भिते की तिच्या खोकल्याने
कुणाची झोपमोड होईल म्हणून
पप्पा जेव्हा सिगरेट ओढायचे
तेव्हा बहूतेकदा काडेपेटी नसताना
मम्मीच आणून द्यायची
सकाळी जेव्हा अंगणात
मम्मी भाजी निवडत असे
पप्पा पेपर वाचत असायचे
तेव्हा सिगरेट फुंकत फुंकत
संध्याकाळी जेव्हा मम्मी सांगायची
दिवसभरातील घडामोडी
पप्पा ऐकायचे शांतपणे
प्रत्येक गोष्ट
सिगरेट ओढता ओढता
रात्री झोपण्याअगोदर
मम्मी करायची उद्याची तयारी
पप्पा वाचत
धर्मयुग,इंडिया टुडे किंवा एखादी
इंग्रजी कादंबरी
सिगरेट पित पित
मम्मीने नाही ओढली कधी सिगरेट
परंतू मला का कुणास ठाऊक
जाणवतो सिगरेटचा दर्प
खोकते जेव्हा केव्हाही मम्मी.
मूळ हिंदी कविता
ज्योती देशमुख
Jyoti Deshmukh
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav