हुकूमशहाचा जय

हुकूमशहाचा जय

हुकूमशहाचा जय

तो जो हुकूमशहाची पालखी उचललेला
सर्वात पुढे चालतो आहे,
माझा दूरच्या नात्यातला भाऊ आहे
आणि जो मागे मागे येत आहे
माझा जवळचा शेजारी आहे
तो वेळीअवेळी माझ्या कामास
पडलाय
आणि जो आरतीचे ताट घेऊन चाललाय
तो माझा मित्र आहे
ज्याने नेहमीच मला मदत केलीय
आणि जो स्तुतीपाठ गातो आहे
तो माझा सहकारी आहे,
माझा शुभचिंतक

मी त्या हुकूमशहाचा तिरस्कार करत आलोय,
तुच्छता धाडत राहिलोय त्याच्यासाठी
      पण एक शब्द बोलू शकलो नाही,
या माझ्या लोकांच्या विरोधात
हे एवढे चांगले वाटत होते की,
कधी संशयास्पद नाही वाटले 
ते सुख-दुःखात असे सोबत होते की, 
कधी धोकादायक नाही भासले
आपण आपल्या लोकांच्या लालसेला
जोखू शकत नाही
त्यांच्या मनाच्या गाभार्‍याचा थांग 
पारखू शकत नाही
त्यांच्याआत फणा काढून बसलेल्या 
क्रूरतेची चाहूल ऐकू शकत नाही
याप्रमाणे टळत असतात 
लहानसहान लढाया
आणि ज्याला आपण मोठी लढाई
समजत असतो,
खरेतर ते एक आभासी युध्द असते
आपणांस वाटते अवश्य की, 
आपण लढत आहोत,
पण अनेकदा न लढताच जंगल जिंकून 
घेत असतो आपला शत्रू

मूळ हिंदी कविता
संजय कुंदन 
sanjay kundan 

मराठी अनुवाद
भरत यादव

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने