म्हणे, 'सकल हिंदू बंधू बंधू'
संघी पवित्रा हा संधीसाधू
कराडभेटीचा नवछद्मबिंदू
शोधलेला!
प्रज्ञासूर्य आले म्हणे भेटीला
केसरीची बातमी कनवटीला
ठार अंधाराच्या या खटपटीला
अर्थ नाही!
धन्य धन्य हे संघ संशोधन
सकलजन जोडण्याचा यत्न
जाती अ-व्यवस्था पंचप्राण
असूनही!
'बंधुता परिषदे'चा सापळा
समतेचा आवळतो गळा
अखिल मानवतेचा मळा
जाळू पाहे!
संघ विषमतेची विषवल्ली
जी बुद्धभूमीत फोफावली
तुकड्यास्तव माती खाल्ली
फितुरांनी!
सनातनी वैदिकांचा कावा
वरपांगी बंधुत्वाचा देखावा
बहूजन दावणीस बांधावा
हिंदुत्वाच्या!
फेकती समरसतेचे जाळे
त्यात फसती गा धर्मभोळे
जातीअस्मितांचे खूर खिळे
खूपसती!
ऐसा ढोंगियांचा बाजार
अवघा खुनशी व्यवहार
माणसाला अधम लाचार
बनविती!
लोकसत्ताकृत कुबेरनीती
संघधार्जिण धोरण प्रचिती
सदा सत्तेच्याच अवतीभवती
फिरणार!
संघशाखाभेटीचे हे मिथक
आम्ही झिडकारतो बेलाशक
सूर्याशेजारी कुणी संघचालक
घुसडती!
समरसतेसाठीची संघधडपड
जणू समतामार्गावरची धोंड
नवपेशवाईचे नवकपटकांड
ओळखावे!
-भरत यादव
Bharat Yadav