अन् समतेची निळी सकाळ तू ! (कविता)

अन् समतेची निळी सकाळ तू ! (कविता)

         अन् समतेची निळी सकाळ तू !  

अन्यायावर कोसळणारा 

विद्रोहाचा अग्निलोळ तू

स्वातंत्र्योत्सुक रक्तामधला 
क्रुध्द क्रांतिकल्लोळ तू

अंधश्रध्दा झिडकारणारा 
अमानुषतेचा कर्दनकाळ तू

शोषितांच्या धमन्यातून 
उफाळणारा संतप्त तो जाळ तू

राज्यघटनेची तू जननी,
नवप्रज्ञेचा प्राप्त काळ तू

तू विवेकाचा उन्नत माथा
करुणार्त आतडीचा पीळ तू

संग्रामशील धम्मवीरांच्या
ओठांवरची मनोहारी शीळ तू

हास्य आश्वासक विश्वाचे तू
अश्वत्थाची शाश्वत सळसळ तू

वंचितांची मायमाऊली 
अन् समतेची निळी सकाळ तू !!




टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने