नवरात्रोत्सवाचे प्रणेते (लेख)

नवरात्रोत्सवाचे प्रणेते (लेख)

महाराष्ट्रात प्रबोधनकारांनी रोवली
सार्वजनिक नवरात्रोत्सवाची मुहूर्तमेढ

 ‘...उजाडला. अश्‍विन शुध्द प्रतिपदेचा दिवस उजाडला. सनई चौघडा वाजू लागला. आबालवृध्द स्त्री-पुरुष मुला-मुलींची अगदी गर्दी जमू लागली. लोकहितवादी संघाचे सगळे पुढारी हजर झाले. रा. ब. बोले अध्यक्ष नात्याने सगळ्यांचे आगत स्वागत करू लागले. उदबत्त्यांचा घमघमाट सर्वत्र दरवळू लागला. प्रथम मी श्री शिवरायाचा भगवा झेंडा उभारण्याचा मान त्यावेळचे मागासवर्गीय आमदार सोळंकी यांना दिला. नंतर घटस्थापना. हा धार्मिक विधी एका मागासवर्गीय दाम्पत्याकडूनच करविला, पूजाविधी दादरचे विख्यात पालयेशास्त्री यांनी यथाविधी, यथाशास्त्र मंत्रोच्चारानी साजरा केला.’ 

           माहाराष्ट्रातील पहिल्या वहिल्या सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे बहारदार वर्णन केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या माझी जीवनगाथा या आत्मचरित्रात वरील शब्दात केले आहे.

                   मुंबईतील दादरमध्ये १९२६ साली महाराष्ट्र राज्यातील पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा झाला. त्यामुळेच प्रबोधनकारांना महाराष्ट्रातील सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे प्रणेते मानले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक ऐक्य घडण्यासाठी तसेच जातीभेद ,अस्पृश्यता गाडण्यासाठी प्रबोधनकारांनी शक्ती उत्सवाचे हे सामाजिक शस्त्र उपसले होते. या उत्सवामध्ये सर्व जातीतील बांधवांना सहभागी करून घेण्यात आले होते. महाराष्ट्राचा छात्रधर्म ज्यांनी प्रज्वलित केला, त्या छत्रपती शिवरायांना आदर्श मानून त्यांच्या नावानेच श्री शिव भवानी नवरात्रोत्सव ठाकरे यांनी सुरू केला होता. आपला समाज शक्तिपूजेच्या निमित्ताने एकत्र यावा, त्यांनी सर्व प्रकारच्या कृत्रिम भेदांना मूठमाती द्यावी, या उदात्त हेतूनेच सार्वजनिक नवरात्रोत्सवाची मुहूर्तमेढ प्रबोधनकारांनी महाराष्ट्रात रोवली. 

यापूर्वी देशात केवळ बंगालसारख्या प्रांतातच सार्वजनिक दुर्गा-कालीपूजा उत्सव प्रचलित होता. मात्र देवीमूर्ती पाण्यात विसर्जित करण्याची परंपरा महाराष्ट्रात नको, असे आग्रही मत प्रबोधनकारांनी नोंदवून ठेवले आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील सार्वजनिक नवरात्रोत्सवात मूर्ती विसर्जित केल्या जात नाहीत. साडेतीन शक्तिपीठाचे अधिष्ठान लाभलेल्या महाराष्ट्रात आता नवरात्र उत्सव सर्वदूर जाऊन पोहोचला आहे.

                         भारतातील मातृसत्ताक गणव्यवस्थेचा सर्वात मोठा सण म्हणून नवरात्रोत्सवाकडे पाहिले जाते. शक्ती म्हणजे स्त्री. म्हणूनच या उत्सवात मातृदेवतेची मनोभावे आराधना केली जाते. प्राचीन भारतात मातृसत्ताक पध्दती अस्तित्वात होती. त्याच प्रथा-परंपरेचा जागर नवरात्रोत्सवात होतो. मुळात ही परंपरा अवैदिक आहे.
                प्रबोधनकारांनी समाज, राष्ट्र एकसंघ व्हावा याकरिता नवरात्रोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले. या सार्वजनिक उत्सवाचे महत्त्व आणि महत्ता समजून उमजून घेण्याबरोबरच यामागची प्रबोधनकारांची मूळ प्रेरणा आणि तळमळ काय होती, हेही यानिमित्ताने आपण सर्वांनीच ध्यानात घ्यायला हवे. यातच महाराष्ट्रातील सार्वजनिक नवरात्रोत्सवाची खरी सार्थकता दडली आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने