पिक विठोबाचे रुप
भुई कोरड्या रानाला
पावसाचे थेंबदान।
पांग फिटो कुणब्याचे
तुरी खरीपाचा प्राण।।
किती सोसावा उन्हाळा
काळ्या आईचा आकांत।
गर्द कोवळा कल्लोळ
वावराच्या पदरात।।
लख्ख उन्हाची पालखी
कलंडली शिवारात।
नव्या आशेची पहाट
उभी काळीज दारात।।
पानोपानी लगडले
हिरवाईचे अप्रूप।
रान झाले गा पंढरी
पिक विठोबाचे रुप।।
२-०९-२०१८.