नवरात्रीतील नवरंग वस्त्रपरंपरा (लेख)

नवरात्रीतील नवरंग वस्त्रपरंपरा (लेख)



      नवरात्रीतील नवरंग वस्त्रपरंपरा

         घटस्थापनेपासून म्हणजेच प्रतिपदेच्या दिवसापासून नवमीपर्यंत दररोज वारांप्रमाणे विशिष्ट रंगांची वस्त्रे परिधान करण्याचा महाराष्ट्रातील महिलांमध्ये रुजलेला ट्रेंड म्हणजे नवरात्रोत्सवाचा एक आधुनिक पैलूच म्हणता येईल.

                   विशेषतः नोकरदार महिलांमध्ये ही प्रथा चांगलीच लोकप्रिय बनली आहे.मागील दहापंधरा वर्षांपासून ही नवरात्र नववस्त्राची अभिनव कल्पना उदयास आली आहे.ती आता समाजातील सर्व स्तरात रुजल्याचे पाहायला मिळत आहे.
                        या नवरुढीविषयी बोलताना प्रसिध्द खगोलअभ्यासक आणि हिंदू धर्मशास्त्रांचे जाणकार दा.कृ.सोमण सांगतात,'नवरात्रातील या पोशाखप्रथेला कुठलाही धार्मिक आधार नसून,महिलांमध्ये एकतेची,समानतेची भावना मात्र यामुळे वाढीस लागली आहे. आपले सणउत्सव म्हणजे 'मन करा रे प्रसन्न,सर्व सिध्दीचे कारण' ही तुकोबा उक्ती साध्य करण्याचीच संधी असते.

                      नऊ दिवस वेगवेगळ्या रंगांची वस्त्रे परिधान करण्याने पुण्य लागते किंवा न करण्याने पाप लागते असे मुळीच नाही.त्याचबरोबर ही प्रथा पाळणार्‍यांवर देवीची कृपा अधिक होते असेही नाही,हे स्पष्ट करतानाच सोमण यांनी या परंपरेकडे सकारात्मक दृष्टीनेच पाहायला हवे असे सांगितले.
एखाद्या शाळा,महाविद्यालय अथवा कार्यालयातील सर्व महिला कर्मचारी जेव्हा स्वयंस्फुर्तीने ही नवी प्रथा,पध्दत आनंदाने आणि तितक्याच आवडीने जेव्हा पाळतात तेव्हा आपोआपच सभोवतालच्या वातावरणात प्रसन्नता,उत्साह भरला जातो.त्यातून दैनंदिन कामे करण्यासाठी मनामनाला नवी उर्जाही प्राप्त होते. प्रसारमाध्यमे,सोशलमिडीया यामुळे ही शारदोत्सवातील पेहराव परंपरा समाजाच्या तळागाळात लोकप्रिय होत आहे.पुणे-मुंबईसारख्या महानगरात तर लोकल,सिटीबसेस नवरात्र काळात एकाच रंगाच्या पोशाखाने नटलेल्या महिला व पुरुषांचे गट लक्ष वेधून घेत असतात.

                          काळाच्या ओघात समाजातील धार्मिक प्रथापरंपरेचे अर्थ नव्याने उलगडत जात असतात.अनेक कालबाह्य व टाकाऊ बाबी लयालाही जातात.संस्कृती वाहत्या नदीसारखी कायम प्रवाही असणे म्हणजे दुसरे काय? जे जे उत्तम,उदात्त,सुंदर याचा सहर्ष स्विकार आणि मानवतेला जे जे  मारक त्याला नकार हाच भारतीय संस्कृतीचा आजवरचा स्वभावधर्म राहिला आहे.

                            नवरात्रातील नवरंग वस्त्र धारण करण्याची ही नवरुढी म्हणजे सृजनाचे साक्षात प्रतिक असणार्‍या महन्मंगल जगन्मातेचा जागर करताना प्रत्येक व्यक्तीच्या मनीमानसी नवा उत्साह भरण्याचा तसेच जीवन अधिक आनंदी करण्याचाच प्रयत्न म्हणता येईल.  या खास नारीपरंपरेचे अनुकरण आता पुरुषही करायला लागले आहेत,तेव्हा येत्या काळात या पोशाखपरंपरेतील लिंगभेदही गळून पडल्यास नवल वाटायला नको!

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने