पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर (समिक्षा)

पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर (समिक्षा)

पुरंदरेलिखीत खोट्या इतिहासाची
झाडाझडती

      आपल्या वैचारिक अनुयायांना उपदेश करताना तथागत गोतम बुध्द यांनी स्पष्टपणे असे म्हटले आहे की,
'एखादी गोष्ट अनुश्रवावरुन म्हणजे ऐकीव माहितीवरुन स्वीकारु नका.परंपरा आहे म्हणून स्वीकारु नका.कोणी तरी असे असे सांगितले आहे म्हणून स्वीकारु नका.एखादी गोष्ट पिटकातून (धर्मग्रंथातून) आली आहे,एवढ्यावरुन स्वीकारु नका.(अनुभवाचा पाठिंबा नसलेल्या)तर्काच्या वा न्यायशास्त्राच्या  आधारे स्वीकारु नका.बाह्य रुपाचा विचार करुन स्वीकारु नका.अंदाज बांधण्याचा आनंद मिळतो म्हणून स्वीकारु नका. (किंवा,एखादी गोष्ट आपल्या मताला अनुकूल आहे,म्हणून स्वीकारु नका) (सांगणाराचे) सुंदर रुप पाहून स्वीकारु नका(किंवा,संभाव्यता आहे एवढ्यावरुन स्वीकारु नका.) हा श्रमण आपला गुरु आहे,असा विचार करुन स्वीकारु नका...' बौध्द आणि श्रमण परंपरेतून झिरपत आलेले हे सोपे तत्वज्ञान आजच्या काळातही आपण सर्वार्थाने स्विकारतो किंवा गांभिर्याने घेतोच असे नाही.मात्र त्याकडे दुर्लक्ष करणे हे किती धोकादायक आणि समाजाची हानी करणारे ठरते,हे मागील पंचवीस वर्षांमध्ये पुरंदरेलिखीत शिवचरित्राने निर्माण करुन ठेवलेल्या भुलभुलय्यातुन महाराष्ट्राच्या पुरेपूर प्रत्ययास आले आहे.

मानवी संघर्षाचा जाज्वल्य इतिहास असलेल्या शिवचरित्राकडे दैववादी,पुराणमतवादी तसेच विशिष्ट जातवर्चस्ववादी भूमिकेतून पाहण्यास वाचकांना भाग पाडणार्‍या पोटार्थी आणि जातपोषी रंजनात्मक लेखनाचा नमुना म्हणून पुरंदरेंच्या लेखनकामाठीकडे पाहण्याचे धैर्य आजवर कुठल्याच संशोधक वा विचारवंत लेखकाने दाखवले नव्हते.डाॅ.आ.ह.साळुंखे यांनी मात्र
'पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर' या ग्रंथातून महाराष्ट्राची ती गरज पूर्ण करण्याचा यशस्वीपणे यत्न केला आहे. इतिहासलेखनाच्या नावाखाली चालवलेल्या साहित्यक्षेत्रातील बेबंदशाहीला आवर घालण्याचेच नव्हे तर वाङमयीन अनैतिकतेला धैर्यपूर्वक झिडकारण्याचेच कार्य या ग्रंथातून घडले आहे.या ग्रंथातील मांडणीची आता चर्चा करण्याचे कारण म्हणजे राज्य आणि केंद्र सरकारकडून ब.मो.पुरंदरे यांच्या गौरवीकरणाची व उदात्तीकरणाची
सातत्याने सुरु असलेली धडपड.
पुरंदरेप्रवृत्तीविरोधात महाराष्ट्रातील जनमनात प्रक्षोभ असल्याचे माहीत असूनही नागपूरातील रेशीमबागेच्या आशिर्वादाने व सूचनेबरहुकूम जनतेच्या पैशाचा अपव्यय पुरस्कारखैरातीतुन बिनदिक्कत निर्लज्जपणे अजूनही सुरु आहे.

त्याचा थोडक्यात तपशील असा,
वादग्रस्त इतिहासलेखक, कादंबरीकार आणि ज्यांनी कधीही डफ हाती घेऊन शाहीरी केलेली नाही तरिही शिवशाहीर म्हणून ओळखल्या जाणार्‍या ब.मो.पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने फडणवीस सरकारने गौरवले,त्यानंतर मागच्यावर्षी पुण्यातील बावधन येथे उभारण्यात येणार्‍या प्रस्तावीत शिवसृष्टीसाठी केंद्रसरकारने पुरंदरे यांना पाच कोटी रुपयांचा निधी संभारभपूर्वक जाहीररित्या प्रदान केला ,एवढ्यानेही समाधान न झालेल्या भाजपसरकारने ब.मो.नां पद्मविभूषणचा सन्मान बहाल केला,

मात्र यावरुनच सध्या परिवर्तनवादी चळवळीतील संघटना आणि कार्यकर्ते प्रक्षुब्ध आहेत.राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांची जाणिवपूर्वक बदनामी करण्याचा ठपका असलेल्या पुरंदरे यांना वारंवार सन्मानित करुन बहूजन जनतेला डिवचण्याचे काम शासनाकडून सुरु असल्याचा आरोप पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून होत आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार,डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनीही पुरंदरेंना देण्यात आलेल्या सन्मानांवर तीव्र आक्षेप नोंदवत त्याविरोधात राज्यभरात पून्हा शिवसन्मान परिषदा घेऊन रान पेटवण्याचा इशारा दिला आहे.भीम आर्मी या संघटनेनेही पुरंदरेंचे पद्मविभुषण परत घेतले जावे अशी सनसनाटी मागणी केली आहे.अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनीही अलिकडेच बोलताना पुरंदरे यांनी असा कोणता पराक्रम केला,ज्याबद्दल त्यांना सरकारने पद्मविभुषणचा सन्मान दिला,असा सवाल विचारला आहे. या पार्श्वभूमीवर ब.मो.यांना होत असलेल्या विरोधामागची मूळ कारणे लक्षात घेतली पाहिजेत.छत्रपती शिवरायांचे चरित्र लिहीताना अनेक अनैतिहासिक संदर्भ वापरुन जिजाऊमातेचे चारित्र्यहनन करण्यापासून ते संभाजीराजांची बदनामी केल्याचा गंभीर आक्षेप पुरंदरें यांच्याविरोधात घेण्यात आले आहेत.यासंदर्भात ज्येष्ठ विचारवंत डाॅ.आ.ह.साळुंखे यांनी ब.मो.पुरंदरे यांच्या 'राजा शिवछत्रपति' या पुस्तकाची परखड चिकीत्सा आपल्या 'पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर' या सुमारे १६० पानी ग्रंथातून केल्याची बाब त्यादृष्टीने महत्वाची म्हटली पाहिजे.२०१६ साली प्रसिध्द झालेल्या या ग्रंथाने पुरंदरेंच्या बेगडी शिवप्रेमाच्या पार चिंधड्याचिंधड्या उडवण्याचेच काम केले आहे.  शिवचरित्र  जास्तीतजास्त वस्तुनिष्ठ स्वरुपात समाजापुढे यावे असे वाटणार्‍यांनी यातील मांडणीकडे खुल्या मनाने पहावे असे आवाहन करणार्‍या आ.ह.नीं या ग्रंथामधून पुराव्यांनिशी इतिहासद्रोही कुप्रवत्तीचा
समाचार घेत,खोटारडेपणाचा बुरखा टराटरा फाडला आहे.


          आपली चिकीत्सक भूमिका मांडताना पुरंदरेंना उद्देशून आ.ह.म्हणतात,'पुरंदरे,तुम्ही पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ लोकांना झुलवत ठेवले!

    पुरंदरेंनी कितीही आव आणला,तरी ते शिवचरित्राकडे स्वच्छ दृष्टीने पाहू शकलेले नाहीत,त्यांनी शिवचरित्र हे आपल्या एका संकुचित उद्दिष्टाचे साधन मानून आपले पुस्तक लिहील्याचा गंभीर आक्षेप ते स्पष्टपणे नोंदवतात.एकांगी शिवचरित्रलेखनातून समाजमन कलुषित करण्याचा हेतु लपून राहात नसल्याचे सांगतानाच बहूजन वाचकांना खोट्या,बदनामीकारक,कृत्रिम,नकली,बनावट,फसव्या भाषेच्या भपक्याने दीर्घकाळपर्यंत खुलवले,झुलवले आणि भुलवले--पण अस्सल आशयाने फुलवले मात्र नसल्याचा थेट आरोप डाॅ.साळुंखे या ग्रंथातून निःसंदिग्धपणे करतात.त्याचवेळी अस्सल ऐतिहासिक पुरावे मांडत पुरंदरेकृत लेखनाची बिनतोड चिरफाडही करतात,ती कशी याची यथार्थ कल्पना 'पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर' या ग्रंथातील अनुक्रमणिकेच्या  प्रकरणांच्या शिर्षकांवरुनदेखील येते.


पुरंदरेकृत स्वतःच्या पुस्तकाचा परिचय,

दंडकारण्याचा पुरंदरेलिखीत खोटा इतिहास,

पुरंदरेंचे धर्मशास्त्राचे अगाध ज्ञान,

पुरंदरे आणि साधुसंत व इतर,

पुरंदरेंची ब्राह्मणविषयक भूमिका,

पुरंदरेंच्या कादंबरीचे चरित्रनायक शिवराय आहेत की,दादाजी पंत?

           या व अशा एकूण १३ प्रकरणांमधून पुरंदरेंच्या लिखाण व मांडणीची कठोर चिकीत्सा करत डाॅ.साळुंखे यांनी

असत्यलेखनप्रवृत्तीचे वाभाडे काढले आहे.

१२ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रसिध्द झालेल्या 'राजा शिवछत्रपती' या पुस्तकाच्या २०व्या आवृत्तीच्या आधारे केलेली ही मांडणी वाचकांनी मूळातून वाचणे अभिप्रेत आहे.

तरिही या ग्रंथाची तोंडओळख होण्याच्या उद्देशाने काही मुद्दे व उदाहरणांकडे पाहता येईल.


'हे पुरंदरेंचे पूर्वग्रह'

अशा उपशिर्षकाने सुरुवात करत प्रकरण क्रमांक दोन

'दंडकारण्याचा खोटा इतिहास'

मध्ये डाॅ.आ.ह.साळुंखे लिहीतात,

'पुरंदरेंना चरित्र लिहायचे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि तरी देखील त्यांच्या पुस्तकाचा प्रारंभ महाराजांच्या चरित्राविषयी चार शब्द लिहून मग पुढे जावे अशा प्रकारचा नाही,तर आपले वैदिक पूर्वग्रह प्रकट करणारा आहे.राम,लक्ष्मण आणि सीता यांच्या आगमनाबरोबर दंडकारण्यात मानवता प्रवेशली,हे पुरंदरें यांचे म्हणणे केवळ अनैतिहासिकच नव्हे, तर दक्षिण भारतातील लोकांचा सांस्कृतिक वारसा नाकारुन त्यांचा अपमान करणारेही आहे.'


प्रकरण ४

'पुरंदरे आणि साधुसंत व इतर'

यामधील

संत ज्ञानेश्वर यांना छळणारांच्यासंदर्भात पुरंदरेंच्या

दृष्टिकोनावर भाष्य करताना,

डाॅ.साळुंखे लिहीतात,

....या लहान मुलांना आणि त्यांच्या आईवडिलांना ज्यांनी छळले,त्यांचा निर्देश पुरंदरे 'शहाणे म्हणविणारे' एवढ्या सौम्य शब्दांत करतात.इतर अनेकांविषयी लिहीताना पुरंदरेंच्या लेखणीतून ज्वालामुखीचा लाव्हारस ओसंडताना दिसतो आणि येथे त्या कोवळ्या निष्पाप जीवांना छळणार्‍यांविषयी ते अत्यंत सौजन्यशील होतात....'कुलीन' लेखणी असलेल्या ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना 'अकुलीन' ठरविणारांविषयी त्यांना नितांत आदर आहे...त्यांच्या धर्मव्यवस्थेपुढे ते नतमस्तक होत असतात.त्यामुळे त्यांना त्यांच्या विरोधात काही लिहायचे नाही.'


..गोब्राह्मणप्रतिपालक म्हणून महारांजांना संकुचित ठरवणे अनैतिहासिकही आणि अनैतिकही..


         महाराज ब्राह्मणांचेही प्रतिपालक होते,यात शंका नाही.कारण ब्राह्मणही प्रजेचा भागच होते.पण पुरंदरे आणि त्यांच्यासारखा विचार करणारे लोक महाराजांना गोब्राह्मणप्रतिपालक म्हणून त्यांना मानवांपैकी फक्त ब्राह्मणांचे प्रतिपालक ठरवू पाहतात,ते अनैतिहासिकही आहे,अनैतिकही आहे आणि महाराजांना संकुचित बनवणारेही आहे.अनैतिहासिक यासाठी,की महाराजांनी स्वतःःला उद्देशून असे म्हटल्याचा कोणताही पुरावा नाही.त्यांनी स्वतःसाठी जे विशेषण वापरलेलेच नाही,ते त्यांच्यासाठी वापरणे हा खोटेपणा झाला.'

 दादोजी कोंडदेव यांचे नसलेले गुरुत्व छत्रपती शिवरायांवर लादण्याच्या पुरंदरे प्रवृत्तीवर हल्ला चढवताना डाॅ.साळुंखे म्हणतात,'....चेल्याने ताण चालवली होती....हे वाक्य संस्कृतमधील 'शिष्याद् इच्छेत् पराजयम् हा वाक्प्रचार पुरंदरेंच्या मनात असल्याचे सहजच सुचवून जाते आणि पुरंदरेंना दादाजी-शिवराय यांचे नाते गुरुशिष्यांचे असल्याचे दाखवून देण्याची इच्छा आहे ,हे त्यावरुन स्पष्ट होते.


  शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे दाम्पत्यजीवन अत्यंत  निकोप राहिलेले असल्याचे अनेक ऐतिहासिक संदर्भ असताना त्याकडे किडक्या मनोवृत्तीने पाहात राजमातेच्या चारित्र्यहननाच्या नीच व कुप्रयत्नांचाही पुराव्यानिशी पर्दाफाश करत डाॅ.आ.ह.नीं या पुस्तकातून शिवचरित्रद्रोह्यांचे किळसवाणे स्वरुप उघड करण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे.


संभाजीराजांचे प्रतिमाहनन

करण्याचा पुरंदरेंचा ठाम निर्धार


समग्र शिवचरित्राकडेच विशिष्ट जातवर्चस्ववादी विकृत मानसिकतेने पाहाणार्‍या पुरंदरेंनी छत्रपती संभाजी महाराजांवरही तिरस्काराचे जहरी फुत्कार या इतिहासद्रोही बखरीच्या

माध्यमातून  कसे सोडले आहेत, हे स्पष्ट करताना डाॅ.साळुंखे  'पुरंदरे आणि संभाजी महाराज' या प्रकरणात     लिहीतात,

'...संभाजीमहाराज मुघलांकडे का गेले,हे इतिहासाला खरोखरच नेमकेपणाने ठाऊक नाही,अशा स्थितीत ते भाबडेपणाने तरी गेले असतील किंवा दुष्टपणाने तरी गेले असतील,असे दोन पर्याय मांडणे,याचा अर्थच पुरंदरेंनी संभाजीराजांचे प्रतिमाहनन करण्याचा ठाम निर्धार केला आहे.एवढ्या कर्तबगार महापुरुषाविषयी इतकी कुत्सित भावना पुरंदरे बाळगतात,कारण मंत्र्यांवर कोणताही ठपका ठेवण्याची त्यांची इच्छा नाही.संभाजीराजे भाबडेपणाने मुघलांकडे गेले असतील,तर ती त्यांची अपरिपक्वता ठरते.स्वाभाविकच,ते पुढच्या काळात छत्रपती बनण्यास पात्र नव्हते,असा संदेश देता येतो.ते दुष्टपणाने गेले असतील, तर ते सरळ सरळ स्वराज्यद्रोही ठरतात आणि मग तर भावी काळात छत्रपती होण्याच्या दृष्टीने त्यांची वाटच बंद करता येते.मानले पाहिजे पुरंदरेंच्या बुध्दीचातुर्याला आणि त्यांच्या संभाजीद्वेषालाही!


'पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर' मधून अशी असंख्य उदाहरणे संदर्भासहित स्पष्ट करत इतिहासलेखनातील लबाडीला झोडून काढल्याचे जाणवते, आ.ह.नीं उपस्थित केलेल्या बिनतोड आक्षेपांबाबतचा खुलासा वा प्रतिवाद करण्याचे नैतिक धैर्य आजपावेतो पुरंदरे अथवा त्यांचे समर्थक दाखवू शकलेले नाहीत.यावरुन पुरंदरेंची शिवचरित्राकडे पाहाण्याची पूर्वग्रहदूषित कुजकी व हिणकस मानसिकता होती व आहे यावर मोहोरच उमटते.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने