भारताचे हिंदूस्तानीकरण

भारताचे हिंदूस्तानीकरण

भारताचे हिंदूस्तानीकरण!

                 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उघडपणे तर भाजप छुप्यापध्दतीने या देशाला हिंदुराष्ट्र बनविण्याच्या धडपडीत आहे.मागील पाच वर्षांच्या मोदी राजवटीत ते भारताचे हिंदुराष्ट्र जरी बनवू शकले नसले तरी कट्टरतावादी सत्ताधारी धर्मनिरपेक्ष भारताची नावापुरतीतरी हिंदुस्तान अशी ओळख ठसविण्यात यशस्वी ठरले आहेत हे मान्यच करावे लागेल.अन्यथा भाजपविरोधी मुख्य राजकीय पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधींनी या देशाचा उल्लेख भारत याऐवजी वारंवार हिंदुस्तान असा केला नसता!


कांग्रेसनेत्यांच्या तोंडी भारताऐवजी हिंदुस्तान असे ऐकून खरेतर संघवाद्यांना आनंदाच्या उकळ्याच फुटत असतील.

धर्मनिरपेक्षता हा ज्या राष्ट्राच्या संविधानाचा गाभा आहे,

तोच हिरावून घेण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षांच्या काळात केंद्रातील मोदी सरकारकडून झाला आहे.

तथाकथित हिंदुराष्ट्र म्हणजे मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती नव्हे विकृती! तीच समस्त भारतीयांच्या बोकांडी लादण्याचा खटाटोप विविध माध्यमांच्या मदतीने सुरु आहे.


भारताच्या संविधानात कुठेही या देशाचा उल्लेख हिंदुस्तान असा केला गेलेला नाही. India म्हणजेच भारत या अधिकृत नावानेच हे राष्ट्र जगात ओळखले जात असताना,

बहूसंख्य असलेल्या हिंदुप्रजेचा अहंगंड कुरवाळण्यासाठी या देशाचे हिंदूस्तानीकरण सुरु आहे. आजवर उत्तर भारतातील गंगायमुनेच्या खोर्‍यातील प्रदेशाला हिंदुस्थान असे ऐतिहासिक संबोधन होते,आहे.

मात्र संघाने भाजपच्या माध्यमातून हिंदुराष्ट्र होईल तेव्हा होईल तोवर या सर्वसमावेशक भारताची हिंदुस्तान अशी ओळख रुजवायला काय हरकत आहे,असा विचार केला असावा.


कारण संघाच्या कल्पनेतले हिंदुराष्ट्र अस्तित्वात येण्यामधला सर्वात मोठा अडथळा हा या देशाची राज्यघटना आहे.तसेच बहुसंख्य हिंदूजनता आजही संघभाजपप्रणित कट्टरतावादाला भिक घालत नाही.म्हणूनच तर सनातनी टाळक्यांचा तिळपापड होत आला आहे.परंतु वेदनादायी बाब ही की पाकिस्तानची उभारणी जशी मुस्लीम कट्टरतावादाच्या पायावर झाली,तशी भारताची हिंदुस्तान या नामधारी का होईना हिंदुराष्ट्रात झाली अशी पक्की धारणा सध्या इथल्या कर्मठांमध्ये रुजली आहे.


हिंदुव्यतिरिक्त इतर धर्मियांना दुय्यम वा तिय्यम दर्जाचे नागरिक समजणे हा तर हिंदुराष्ट्रवाद्यांचा आवडता छंद आणि निर्धार राहिला आहे. त्याची चुणूक २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही दिसायला लागलीय.

हिंदुस्तानात मुस्लिमांना उपरे समजणे हे ओघाने व प्राधान्याने आलेच.त्यानुसार या निवडणुकीतील  जवळजवळ भाजपेतर सर्वच स्वयंघोषित धर्मनिरपेक्षवादी राजकीय पक्षांनी मुस्लिम समुदाय अथवा त्यांच्यापुढील समस्यांना अनुल्लेखाने मारणे इष्ट व सोयीचे मानले आहे. भारतात जसजसा भाजपचा जनाधार वाढत गेला तसतसा संसदेत मुस्लिम खासदारांचा टक्का घसरत गेला आहे. राजकारणात तोंडी लावण्यापुरते मुस्लिम नेते पोसायचे,

पण मुस्लिमद्वेष्टेपणाचा फणा वारंवार वर काढायचा,त्यातून हिंदुमतांची कमाई साधायची,अशीच आजवरची संघ व भाजपची सत्तानिती दिसून आली आहे. त्यातूनच आज भारताचा हिंदुस्तान झाला आहे!


असा हिंदुस्तान,जिथे मुस्लिम वा इतरधर्मीय जनतेचा राजकीय पक्ष आपल्या जाहीरनाम्यातून सोडा,

उमेदवारी वाटपातही विचार करण्यास वा दखल घेण्यास तयार नाहीत.स्वतंत्र भारतातली अशी ही पहिलीच लोकसभा निवडणूक असावी ज्यात देशात चौदा टक्क्यांच्यावर लोकसंख्या असलेल्या समुदायाला कुठलाच राजकीय पक्ष गृहित धरायला तयार नाही? मग प्रश्न  पडतो की,मुस्लिम लोक भारताचे नागरीक नाहीत का? सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे  भारतातील एकही मुस्लिम संघटना वा राजकीय पक्ष आपल्या प्रश्नांविषयी राजकारण्यांना जाब विचारण्यास तयार नाही.अपवाद फक्त एमआयएमचा.


भाजपने बहुसंख्याकांच्या दबावाचे राजकारण यशस्वीपणे खेळत या देशातल्या अल्पसंख्यांक समुदायाची स्थिती अस्तित्वहीन म्हणावी अशीच केली आहे.गोरक्षणाच्या  आणि बिफबंदीच्या नावाखाली देशातील मुस्लिमांच्या मनात जबर भिती निर्माण करण्यात कट्टरतावादी यशस्वी ठरले आहेत.सरकारविरोधी आवाज बुलंद करणार्‍या सुशिक्षीत मुस्लिम तरुणांना देशद्रोही ठरवून त्यांची प्रतिमा पाकिस्तानवादी केली जात आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी देशातला प्रत्येक घटनावादी नागरीक अनुभवत आहेतच,मात्र त्याची सर्वाधिक झळ ही मुस्लिम कलावंत,विद्यार्थी,अभिनेते,लेखक,

विचारवंत यांना बसत आली आहे.

सरकारविरोधी ब्र उच्चारणेदेखिल आजच्या काळात मोठा अपराध मानला जात आहे. भारतीय राजकारणाची यापुढेही हीच दशा आणि दिशा राहीली तर एखाद्या धर्माधिष्ठीत राष्ट्रासारखे एकधर्मिय,एकरंगीय कट्टर,कर्मठ स्वरुप भारतालाही लाभेल,

यात शंका नाही.



त्यामुळे हिंदुकट्टरतावादी पक्ष

आणि संघटनांना तथाकथित

हिंदुराष्ट्राची प्रत्यक्ष उभारणी करणे आणखी सुलभ जाणार आहे.

ज्याव्यवस्थेमध्ये मुस्लिम जनता दुय्यम  नागरीक ठरतील हे नक्की.

कदाचित त्यावेळी त्यांचा मतदानाचा अधिकारही हिसकावला जाऊ शकतो.


भारताचे आजचे समताधिष्ठीत घटनात्मक स्वरुप ज्यांना डाचते तेच आज मुस्लिमांना या देशात उपरे ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत.

२०११ साली देशात झालेल्या जनगणनेनुसार देशात मुस्लिमांची लोकसंख्या १४.२% होती.त्यानुसार ५४५ सदस्यांच्या संसदेत मुसलमान खासदारांची संख्या ७७ असायला हवी,परंतु आजपर्यंत लोकसभेमध्ये आजवर एकदाही हे प्रमाण पुरेसे होऊ शकले नाही.२०१४ च्या लोकसभेत तर अवघे बावीस मुस्लिम खासदार

संसदेत होते,जी संख्या अजवरची सर्वात घसरलेली म्हणता येईल.

भारतामध्ये हिंदुकट्टरता वाढणे,वाढवणे राजकीयदृष्ट्या  कुणाला फायदेशीर ठरत चाललेय,

हे पून्हा स्पष्ट करण्याची गरज नाही.



राजकीय पक्ष अथवा व्यवस्था कितीही घटनाद्रोही वर्तन करत असले तरी या देशातील बहुसंख्यांक समाजावरच शेवटी महत्वाची जबाबदारी येऊन पडते.

भारताची सांस्कृतिक-धार्मिक विविधता टिकवणे हे प्रत्येक संविधानवादी नागरिकाचे कर्तव्यच

ठरते.

भारताचा आज हिंदुस्तान बनला असेल तर परवा याच देशात हिंदुराष्ट्र उभं राहाण्यासही वेळ लागणार नाही.

आज मुस्लिम दुय्यम झाले,तर पुढे

अस्पृश्यतेच्या झळा भोगलेल्या हिंदुधर्मातील जाती पून्हा 'मनुस्मृती' च्या मगरमिठीत अडकणार नाहीत,कशावरुन?



शेवटी एक गंमतीदार पण तितकेच चिंताजनक वाटावे असे एक निरीक्षण नोंदवावेसे वाटते.मागील पाच वर्षांच्या मोदी राजवटीत दहशतीचे सावट कसे गडद होत आहे याची कल्पना यावरुन येऊ शकेल.मराठी साहित्यविश्वातले एक बंडखोर व्यक्तीमत्व असलेले प्रसिध्द लेखक आपल्या नावामागे मुस्लिम आडनाव लावत होते,त्याबद्दलचे समर्थन करताना ते खासगीत सांगत की, या देशातील मुस्लिमांच्या वाट्याला किती कमालीचा द्वेष-तिरस्कार आलाय,याची थोडीफार कल्पना येण्यासाठीच आपण हे आडनाव धारण केले,ज्यामुळे त्यांच्या वाट्याला

बरेच भोग आलेही,पण अलिकडेच त्यांनी हे मुस्लिम आडनाव लावणे निदान सोशलमिडीयावरतरी थांबवले आहे!

याचाच अर्थ आता भारताचा हिंदुस्तान बनलेल्या या देशात धर्मखोर

भक्ताडांचा ट्रोलउपद्रव असा जगण्याच्या सर्वच क्षेत्रात निरंकुशनिर्लज्जपणे

आपल्या दहशतीची द्वाही

फिरवत अक्षरशः नागव्याने फिरत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने