शिवराज्याभिषेक दिन आणि तिथीवाद्यांचा उच्छाद

शिवराज्याभिषेक दिन आणि तिथीवाद्यांचा उच्छाद


शिवराज्याभिषेक दिन आणि तिथीवाद्यांचा उच्छाद
-------------------------------------------------------------

                      छत्रपती शिवराय हे अवघ्या राष्ट्राची स्वातंत्र्य प्रेरणा आहेत. त्यांच्या जन्मदिवसाबाबत महाराष्ट्रात तिथीवाद्यांनी घातलेला घोळ सर्वश्रुत आहे.मुळात छत्रपती शिवरायांची जयंती अक्षरशः दररोज जरी साजरी केली गेली तरी शिवरायांनी आपल्यावर केलेल्या उपकारांची परतफेड होऊ शकणार नाही.पण तिथी,पंचाग यांच्या माध्यमातून शिवरायांना मनुवादात घोळण्याचा प्रयत्न इथले संघवादी करत आहेत,त्यांचा तो भटीकावा लक्षात घेण्याची खरी गरज आहे.

शिवजयंतीबाबत सच्च्या शिवप्रेमींमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न फोल ठरले.जगात भारी एकोणीस फेब्रुवारी ही गगनभेदी घोषणा यशस्वी ठरल्याने आणि तिथे आता आपणांस काहीच करता येणार नाही याची खात्री पटल्यानंतर तिथीवाद्यांनी शिवरायांच्या जयंतीबाबतचा तिथीघोळ घालणे बंद केले.तरिही अजूनही कालनिर्णय सारखी साळगावकरी टाळकी आपला दीडशहाणेपणा पाजळत असतातच. तारखेनुसार आणि तिथीनुसार शिवजयंती असा उल्लेख करुन या मनुवादी शक्ती तिथीवाद्यांचीच तळी उचलत असतात. मूळात इंग्रजी तारखेनुसार आपल्या राजांची जयंती साजरी झाली तर अवघे जग या आनंदोत्सवात सहभागी होऊ शकते,पण तिथीवादी मानसिकतेला तेच तर सहन होत नसावे!

पण महाराष्ट्रातल्या जनतेने हा कावा ओळखला आणि एकोणीस फेब्रुवारी हीच शिवजयंती खरी हे सर्वमान्य केले.इतकेच नव्हे तर यावर सरकारी शिक्कामोर्तबही झाले.मान्यवर इतिहास संशोधकांनीही त्याला मान्यता दिली.मात्र आता शिवराज्याभिषेक दिनही तिथीप्रमाणे साजरा करण्याची नविनच टुम निघाली आहे.यात संभाजी भिडे गुरुजी यांच्या शिवप्रतिष्ठान ने पुढाकार घेतला आहे.

मूळात किल्ले रायगडावर सहा जून या दिवशी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याची आणि 
तो राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा संकल्प पहिल्यांदा
कुणी केला असेल तर तो कोल्हापूरचे इतिहास संशोधक मा.इंद्रजीत सावंत यांनी केला होता.ही कल्पना खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी उचलून धरली आणि त्याबाबत सक्रीय पुढाकारही घेतला.आता तर रायगडावरील सहा जून चा शिवराज्याभिषेक दिन सर्वमान्य झाला आहे.त्याचे आता एका लोकउत्सवात रुपांतर झाले आहे.मात्र बहूजनांच्या डोक्याने आणि सहभागाने जर एखादा उत्सव लोकप्रिय होत असेल तर तिथे हमखासपणे मनुवादी नाक खुपसणारच हे पुरातन काळापासूनचे सत्य आहे.नेमके तेच शिवराज्याभिषेक दिनाविषयीही म्हणता येईल.

बहूजन तरुणांची माथी भडकावण्याचे उद्योग करणार्‍यांकडून आता शिवराज्याभिषेक दिनात तिथीचा घोळ घातला जात आहे.त्यानिमित्त शिवरायांचे पालखीसोहळे करुन शिवरायांना देवत्व बहाल करण्याचा प्रयत्न जारी आहे.शिवराय हे विष्णुचा अवतार असल्याचे सनातनी व्यवस्थेकडून मराठी समाजमनावर सातत्याने ठसवले जात आले आहे.म्हणूनच त्यांना चतुर्भुज रुपात दाखवणे,त्यांची मंदिरे उभारणे वा त्यांचे पालखी सोहळे साजरे करणे असे पुरोहितहितैषी धंदे केले जात आहेत.अशा संतापजनक प्रकारांना सच्च्या शिवप्रेमींनी कडाडून विरोध केला पाहिजे.

एकोणीस फेब्रुवारी या समाजमान्य आणि इतिहासमान्य शिवजयंतीप्रमाणे सहा जून हाच खरा शिवराज्याभिषेक दिन असल्याचे मनुवाद्यांना ठणकावून सांगण्याची आता वेळ आहे.
अनवाणी राहाणे आणि ब्रम्हचर्य पाळणे अशा गोष्टींचे उदात्तीकरण करण्यातून नेमके काय साधले जाते याविषयी अधिक सांगणे न लगे! त्यामाध्यमातून बहूजन पोरांना भुलवण्याचे,त्यांची डोकी नासवण्याचे उद्योग थांबले पाहिजेत.
छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी या दोन युगपुरुषांच्या नावांचा वापर करुन संघवादी कर्मठ व्यवस्थेची खुंटी आणखी मजबूत करण्याचे षडयंत्र उधळून लावले पाहिजे.

तिथीवाद्यांच्या उच्छादाला बळी न पडता तारखेनुसार साजरा केला जाणारा शिवराज्याभिषेकदिन हाच खरा याची मनोमन खूणगाठ बांधली पाहिजे.बदलती राजकीय व्यवस्था लक्षात घेऊन मनुवादी शक्ती बहूजनांच्या पारंपारिक धारणा पळवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र बहूजन जनतेने त्यांच्या कारस्थानांना बळी पडता कामा नये. शिवजयंती प्रमाणेच शिवराज्याभिषेक दिन देखील दररोज जरी साजरा केला गेला तरी ते कमीच ठरेल, पण मुद्दा आहे तो मनुवादी कावा,कारस्थान  यशस्वी होऊ द्यायचे की हाणून पाडायचे?

हिंदू जनतेला मुस्लिम शत्रू असल्याचे सांगत दंगली घडवून मनुस्मृतीच्या समर्थकांची व्यवस्था मजबूत करु पाहणार्‍या कुशक्तींना ओळखण्याची आवश्यकता आहे.
शिवरांयाचे हिंदवी स्वराज्य हे सर्वसामान्य रयतेचे राज्य होते,सर्वधर्मीय जनतेला ते आपले वाटत होते,असे असताना शिवराज्याभिषेक दिन हा हिंदूसाम्राज्य दिन म्हणून साजरा करण्याचा हरामखोरपणा करणार्‍यांची
 कीव करावीशी वाटते.

छत्रपती शिवरायांना हिंदुपदपातशहा ठरवणार्‍यांनी सहा सोनेरी पाने मध्ये कसे दुय्यम ठरवलेय हे ध्यानी घेण्याची गरज आहे.शिवरायांचे स्वराज्य म्हणजे काकतालीय योग म्हणजेच कावळा बसायला आणि फांदी तुटायला अशी बाब होती असे निर्लज्जपणे सांगणार्‍यांना शिवप्रेमी मानण्याचा वेडेपणा कुणीही करु नये.त्याप्रमाणेच पंचागातील तिथीप्रमाणे शिवरायांचा राज्याभिषेक दिन साजरा करुन तरुणांचा बुध्दीभेद करु पाहणार्‍यांचा
कावा वेळीच ओळखण्याची आज गरज आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने