दुष्काळात देव (अनुवादीत कविता)

दुष्काळात देव (अनुवादीत कविता)

दुष्काळात देव
-----------------
अवर्षणात येत नाही देव
भूक-तहानेने मरण
निश्चीत आहे,
मृत्यूची जबाबदारी
तळमळणार्‍या मानवांची,
पशू-पक्षी,
वृक्ष-वेलींची आहे,
गप्पगुमान ते वागवत
आहेत त्याला...

अवर्षणात नाही
ना दुष्काळात येतो देव
त्याच्याकरिता प्रश्नांचे पहाड
रिकाम्या ताटात वाट बघत असतात
आणि निरुत्तर प्रार्थना
कोरड्या ग्लासांमध्ये....


देव कर्ताकरविता आहे
त्याच्या इच्छेशिवाय जगात
पानदेखील हलू शकत नाही,
अनंतकाळापासून कानात आवाज
घुमतोय...

एक प्रश्न छळतोय पुनःपून्हा
कुठल्या अपेक्षेने
हिरव्या धान्याच्या भरल्या ताटाठिकाणी
त्याने पसरवली भेगांनी
फाटलेली- तुटलेली उजाड भूमी?
त्याच्या इच्छांचे कसलेसे तरी गणित
असेलच की..

प्रत्येक भल्या गोष्टीचे श्रेय
लिहीले गेलेय देवाच्या नावावर,
वाईटाचे विष (मात्र)
मानवाच्या कंठामध्ये
उतरवण्यात आले..
जगातले प्रत्येक पान तरिही
त्याच्याच इच्छेने हालते आहे
आश्चर्य वाटते,
देवाच्या वाट्याला विष
का नाही
गेले?

अवर्षणात येत नाही देव
दुष्काळात येत नाही देव
कारण,
जे झाले त्याच्या इच्छेनेच झाले,

त्याच्या इच्छेने जे झाले
असे की,
त्याच्या इच्छेने सळसळण्यासाठी
आता वाळलेलं पानदेखील या
उजाड रानात शिल्लक
उरलेले नाही..!
-----------------

हिंदी कविता
राजेंद्र नागदेव

मराठी अनुवाद
भरत यादव

साभारः-
समकालीन भारतीय साहित्य
मार्च-एप्रिल २०१९

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने