हुसैनबाबा (कविता)

हुसैनबाबा (कविता)





हुसैनबाबा
-------------
हुसैनबाबा,
खरं खरं सांगा
हीच बात आहे ना?
कि कुठेतरी एक कच्चा रस्ता आहे
फारच ओबड धोबड
आणि लांबलचकही
जिथे तुम्ही इतक्या वर्षांपासून
चालत होता
तेही अनवाणी
नक्कीच थकला असाल
म्हणूनच तर....
हा तोच रस्ता आहे ना,
जो पुढे जाऊन पिकलेली
जांभळं देतो
दोन्ही बाजूंनी शेतांच्या
लांबच रांगा
अधूनमधून तुम्हाला तरतरी येण्यासाठी कडक चहाचे घोट
तुम्ही खात्रीने याच रस्त्यावरुन पाहिले असेल
शेताच्या बांधांवरुन दिसेनाशा होत गेलेल्या गजगामिनीला
आणि
याच मार्गावर तर तुम्ही भेटले होता मदर तेरेसांना
जेव्हा त्या आपल्या रुग्णांसोबत फिरायला आल्या होत्या इथे
तुम्हाला या रस्त्याचा
ठावठिकाणा मुक्तिबोधांनी दिला होता कि कंदिलाच्या उजेडात छत्र्यांची डागडुजी करत तुमच्या त्या म्हातारबाबाने
तुम्ही तुमची 'जमीन' चितारण्यासाठी
इथूनच रंग उचलले होते ना
बाप रे,किती बोलतात हे तुमचे रंग
मीही कधीकधी तुमच्या या बोलत्या रंगांपासून स्वतःसाठी निद्रा निवडून घेतो
तुमची चिंता हीच होती ना
कि शहरात शिंगं उगारुन
उंडारणारे ते वळू कुठे
या रस्त्याला चिरडत त्यांच्यावर बलात्कार तर करणार नाहीत
असे प्रयत्न तर युगेनयुगे होत आले आहेत
तरिही हे रस्ते मोहाच्या फुलांच्या
ढिगांनी भरलेले असतात
जांभळं,सिताफळं,पेरु किंवा आंबे असोत
आजही पोरं ती विकत घेऊन नव्हे
तर चोरुन खातात इथूनच
त्यामुळे आपण काळजी नका करु तुम्हीच बघा न
तुम्हाला या रस्त्यावरुन हटवण्यासाठी किती कारस्थाने झाली
आणि
अशा अफवा तर मीही ऐकल्या होत्या कि तुम्हाला इथून हद्दपार करुन कुठल्याशा काॅंक्रीटच्या जंगलात पाठवण्यात आले आहे
पण मला माहित आहे की या सगळ्या निव्वळ पोकळ अफवा आहेत
तुम्ही तर याच रस्त्यावरुन चालत चालत एकाएकी इथल्या हवेत मिसळून गेला असाल
शेवटी जूनचा महिना आहे तुम्हाला वाटलं असेल कि ही हवा निष्ठुर होऊन उगाचच या झाडांना सतावत आहे झुंजवत आहे
चला, आपणच या हवेत मिसळून
या झाडांना थोडा थंडावा देऊया..
खरं खरं सांगा....
हीच बात आहे ना...?
-----------------

हिंदी कविता
शैलेंद्र साहू

मराठीकरण
भरत यादव

साभार
सदानीरा
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने