डाॅ.आ.ह.साळुंखे यांचे भाषण (भाग दोन)

डाॅ.आ.ह.साळुंखे यांचे भाषण (भाग दोन)


डाॅ.आ.ह.साळुंखे सरांचे
भाषण
भाग दोन




                          ....जन्मानेच काही माणसे श्रेष्ठ अथवा हीन असतात असे सांगणारी एक विचारधारा तर दुसरीकडे चार्वाक,बुध्द,महावीर यांची उदार मानवतावादी विचारांची परंपरा आहे.दुबळ्या माणसाला इतरांच्या बरोबरीने संधी मिळण्यासाठी कर्मकांडे बाजूला सारावीत,अशी कृतीशील उदाहरणे या समतावादी परंपरेत सापडतात.
 संधी अधिक प्रयत्न म्हणजे गुणवत्ता होय.आपल्या समतावादी महान पूर्वजांनी निर्माण केलेल्या अनेक गोष्टी वैदिकांनी पळवल्या आहेत.संघ,भगवा हे शब्द तर आता आपला मूळ अर्थच हरवून बसले आहेत.तिपीटकात तब्बल अठरा हजारवेळा बुध्दांसाठी वापरण्यात आलेल्या भगवा शब्दाचे काळाच्या ओघात विकृतीकरण केले गेले.
माणुस कुठे जन्माला आला,हे महत्वाचे नाही तर त्याची गुणवत्ता व शील महत्वाचे असे मानणारा हा दुसरा प्रवाह होय.कोणता विचार वा संस्कृतीप्रवाह आपल्या देशाला पुढे घेऊन जाईल,विषमतावादी की समतावादी यावर विचार व्हावा. कोणत्या विचाराने भारतीय समाज जोडला जाईल,यावरही मंथन हवे.
 यज्ञयागादि कर्मकांडांना चार्वाक आणि बुध्दांनी नाकारले.चार्वाकांची शैली ही एक घाव दोन तुकडे या पध्दतीची तर बुध्दांची शैली माणसाच्या ह्रदयातून त्याच्या मस्तकापर्यंत पोहोचणारी होती,दोन्हीचेही महत्व तितकेच.पण एखाद्याचा विश्वास संपादन करुन त्याचे प्रेमाने मन जिंकण्यावर बुध्दांचा अधिक भर होता.कर्मकांड झुगारुन माणसाला त्याच्या स्वातंत्र्याला महत्व देणारा हा प्रवाह होता.त्याच विचारांचे प्रतिबिंब...काय बा,करिशी,सोवळे ओवळे...असे म्हणणार्‍या संत तुकोबांच्या विचारातही दिसते.गृहस्थांनी गृहिणींनी संसार कसा करावा हेही बुध्दांनी सविस्तरपणे सांगितल्याचे आढळते.
स्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी सावित्रीबाईंनी काय खस्ता खाल्या हे आपणांस माहीत आहे.बुध्दांनी आपल्या काळात समाजातील या दुबळ्या वर्गाच्या बौध्दिक उत्थानाचाही बारकाईने विचार केला होता.बुध्दविचारांमुळे त्याकाळी महिलाही निर्भय बनल्याची असंख्य उदाहरणे सापडतात. या देशातला विषमतेचा हा रोग जुनाट आहे.त्याला कडाडून विरोध करणार्‍यांची समृध्द परंपरा भारताला लाभली आहे.समतेच्या प्रवाहातली मानवतेच्या मूल्यांचा अत्युच्च आदर करणारी, त्याकरिता बलिदान देणारी
उत्तुंग माणसे निर्माण झाली,त्यातुलनेत विरुध्द बाजूला असे एकही नाव आढळत नाही.कर्मकांडी थोतांडांना अवास्तव महत्व देणारे स्वतःचे आणि अापल्या पिढ्यांचेही नुकसान करत असतात.म्हणूनच येथील लोकांनी विद्वान,पंडित यांच्यापेक्षा संतांना डोक्यावर घेतल्याचे दिसते.
आज काळ अवघड आहे.या काळात फार धैर्याने उभं राहाण्याची गरज आहे.निराश होण्याची वा वैफल्यग्रस्त होण्याची मुळीच आवश्यकता नाही.आता आपण सर्वकाही गमावले आहे,असे मानण्याचीही अजिबात ही वेळ नाही.सामाजिक जीवनात चढउतार येत असतात,लाटा येतात-जातात.सत्ता येतात आणि जातात.राजकीय सत्तांपेक्षा सांस्कृतिक सत्ता या महत्वाच्या असतात,याकडे बहुजनांनी लक्ष देणे गरजेचे आहे.मला खंत वाटते ती अशी की,बहूजनातले लोक राजकीय सत्तेच्यामागे धावणारे असले तरी सांस्कृतिक सत्ताधार्‍यांचे ते गुलामच राहिले आहेत.मग ते राजकीय सत्तेत असोत अथवा नसोत.तुमच्या जीवनाची सगळी मूल्ये जर दुसराच कुणीतरी ठरवत असेल तर तुमच्याकडे जळता जळत नाही इतकी इस्टेट, सत्ता, संपत्ती असून तिचे करायचे काय? मनाने गुलामच असाल तर ती सत्ता,संपत्ती,वैभव काय कामाचे?
         जीवनाची अत्यूच्च मुल्ये ही भौतिक गोष्टींपेक्षा अधिक मोलाची आहेत ,असे श्रमण परंपरा मानत आली आहे.जर आपणांस स्वातंत्र्य हे मूल्य प्रिय असेल तर स्वातंत्र्याचे मोलही अधिक द्यावे लागेल. संविधान हे आपणांस दिशादर्शक आहे.संविधानाचे रक्षण आपण केले तरच संविधान आपले रक्षण करु शकणार आहे. आज या श्रेष्ठ मूल्यांच्या रक्षणासाठी लोक आपला वेळही द्यायला तयार नाहीत.समाजाविषयी संवेदना प्रकट होण्याची आवश्यकता आहे.गुलामी लादणार्‍यांपेक्षाही ती स्विकारणार्‍यांचा दोष अधिक आहे.
         आपल्या समाजातील दाहक विषमता विषन्न करणारी आहे.विशेषतः शेतकर्‍यांबाबत केला जाणारा दुजाभाव संतापजनक आहे.मूळात शेतकर्‍यांची सरकारकडून जाहीर होणारी कर्जमाफी ही कर्जफेड मानली जावी.शेतकरीवर्गाने या समाज व राष्ट्रावर केलेल्या उपकाराची भरपाई करणेदेखील अशक्य आहे.तरिही त्यांना घोर उपेक्षेचे जिणे जगावे लागत आहे.समाजातील प्रत्येक व्यक्तीला सुखी,संपन्न,आनंदी जगण्याचा अधिकार आहे,त्यासाठीचे पोषक वातावरण निर्माण करणे सर्वांची जबाबदारी आहे.
                     आज आपली एक सांस्कृतिक लढाई चालू आहे.अहिंसेच्या मार्गानेच आपल्याला ।जायचे आहे.आता ही लढाई फार वेगळ्या पातळीवर पोहोचली आहे. शोषक वर्गाच्या हातात तंत्रज्ञानाची प्रचंड शक्ती आहे.त्यामुळे दुबळ्या लोकांची अतिबलाढ्य शक्तींपुढची लढाई ही अधिक अवघड बनली आहे.मग त्यांच्यापुढे आता हार मानावी का?
शांतपणे गुलामी स्विकारावी का?
असे मुळीच नाही.मग शोषितांकडे अशी कोणती शक्ती आहे?
शोषित समाजाचे संख्याबळ ही त्यांची मोठी ताकद आहे.मात्र त्यांच्यात फार मोठे वैगुण्यही आहे,ते म्हणजे त्यांच्यातील ऐक्याचा अभाव.सगळे दुबळे,वंचित,शोषित एक झाले,त्यांनी आपसांमधील छोटे छोटे मतभेद मिटवले तरच ही लढाई सोपी ठरणार आहे.याविषयी तथागत बुध्दांनी केलेला उपदेश महत्वाचा आहे.ते म्हणतात,अरे,एकमेंकांची हाडे मोडणारे,प्राणहरण करणारे,संपत्ती आणि राष्ट्राला लुटणारे यांचाही जिथे मेळ बसतो,तिथे तुमच्यासारख्या उच्च मानवी मूल्यांची म्हणजेच स्वातंत्र्य,समता,न्याय,बंधूता यांचा आग्रह धरणार्‍यांनी किती मिळुनमिसळून राहिले पाहिजे?
म्हणूनच परिवर्तनवादी चळवळीत कार्यरत असलेल्यांनी आपले उद्दीष्ट निश्चित करुन त्याकरिता अहंकार संपवले पाहिजेत.जो आपल्या विचारांचा नाही तो आपल्या विचारांचा व्हावा असे वाटत असेल तर त्यांच्याशी अत्यंत प्रेमाने संवाद साधत राहायला हवे.
आपण माणसं तोडत राहिलो तर चळवळी मोठ्या होणार कशा?
याचा विचार केला पाहिजे.
मी आपल्याशी मुक्तपणे साधलेला संवाद आपण शांतपणे ऐकून घेतलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो.

प्रसिध्दीः
(महाराष्ट्र टाइम्स
संवाद पुरवणी
दि.९जून२०१९)
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने