अ.भा.मराठी साहित्य संमेलन,उस्मानाबाद २०२०

अ.भा.मराठी साहित्य संमेलन,उस्मानाबाद २०२०


 उस्मानाबादमध्ये पार पडलेल्या

९३व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनावर एक कटाक्ष.

उस्मानाबादमध्ये संपन्न झालेल्या ९३ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाने पाडले अनेक नवे पायंडे


संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रीटो यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार्‍यांच्या धमक्या त्यावर संमेलन संयोजकांनी घेतलेली आणि अखेरपर्यंत राखलेली ठाम भूमिका तसेच उद्गाटक ज्येष्ठ कवी ना.धों.महानोर व ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांची आशयसंपन्न मांडणी त्याचबरोबर रसिकांचा लाभलेला प्रचंड प्रतिसाद युवावर्ग आणि महिलांनी केलेली गर्दी ही या १०,११ आणि १२ जानेवारी या तीन दिवशी उस्मानाबादमध्ये संत गोरोबाकाका साहित्यनगरीत पार पडलेल्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाची ठळक वैशिष्ठ्ये म्हणावी लागतील.

  दरवर्षी साजरा होणारा मराठी साहित्याचा हा सोहळा कुठल्याना कुठल्यातरी वादाने गाजत असतो.मात्र अरुणा ढेरे यांची मागच्या संमेलन अध्यक्षपदी एकमताने निवड करुन साहित्य मंडळाने रसिक जनतेला आश्चर्याचा सुखद धक्काच दिला होता.यंदाही ती आदर्श प्रथा पुढे नेत साहित्यिक,विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड उस्मानाबाद संमेलनाच्या अध्यक्षपदी झाली,तेव्हा मराठी भाषा आणि संस्कृतीला मूठभरांची मक्तेदारी समजत आलेल्यांनी विरोधाचे वाग्बाण चालवून पाहिले,पण त्याचा आयोजनावर काहीच फरक पडत नसल्याचे पाहून उरलासुरला विरोधी आवाज लुप्त झाला.खरेतर मराठी साहित्याचा प्रवाह सर्वसमावेशक असला पाहिजे या मताचे अनेक लेखक,कवी अनेक वर्षांपासून संमेलनाचा,साहित्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्नशील राहिले आहेत.यंदाच्या वर्षी फादर यांच्या निवडीमुळे मराठी साहित्याचा परिघ विस्तारणार हे नक्कीच झाले होते.मायमराठीच्या सेवेसाठी सर्वधर्मिय लेखक,रसिक,वाचक,प्रकाशक यांचा कायम हातभार लागला आहे.महाराष्ठ्र शासनाकडून दरवर्षी संमेलन आयोजनाला दिले जाणारे आर्थिक अनुदानही त्याच उद्देशाने उपलब्ध केले जाते.

          उस्मानाबाद या मराठवाडा विभागातील महत्वाच्या शहराला साहित्य संमेलनाच्या आयोजनाची मिळालेली संधी हजारो जनतेला आगळावेगळा उत्साह प्रदान करणारी ठरली.

बाराव्या शतकातले महान वारकरी संत गोरोबाकाका यांनी त्यावेळी तेरणानदीकाठी तेर येथे वारकरी साहित्यिकांचे संमेलन भरवले होते,आणि सामाजिक समतेचा संदेश दिला होता.तोच वारकरी संत विचारांचा धागा पकडून संमेलनाध्यक्ष दिब्रिटो यांनी आपले परखड आणि सर्वांची मने जोडू पाहणारे विस्तृत मनोगत मांडले.तब्बल छप्पन पानी या छापील भाषणातून त्यांनी मराठी साहित्य,समाज आणि संस्कृतीचा अभ्यासपूर्ण धांडोळा घेतला आहे.त्यांचे भाषण हे उत्तम विचार आणि महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेचा आढावा तसेच चिंतनच आहे.देशामध्ये सध्याच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणाकडे बोट दाखवत त्यावरही या भाषणातून भाष्य केले गेले,जे अपेक्षितच होते.अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्यावर देशातील साहित्यिक आपली स्पष्ट भूमिका मांडत असताना मराठी साहित्य विश्वात मौनावरच भर असल्याचे चित्र दिसत आले आहे.त्या पार्श्वभूमीवर फादर दिब्रिटो यांचे हे अध्यक्षीय भाषण चांगलेच दमदार म्हणायला हवे.'धर्म व जातीवरुन भेद करणे अमानुषपणाचे लक्षण' असल्याचे नमूद करुन विरोधकांना त्यांनी चांगलीच चपराक दिली.या संमेलनाच्या अध्यक्षपदी आपली झालेली निवड ही अनपेक्षीत असल्याचे सांगत फादर दिब्रिटो यांनी आपल्या निवडीवर टिका होत असताना त्यावर आपण व्यक्त होणे गरजेचेच असल्याचे सांगितले.धर्म,जात,वंश यावरुन जर कोणाला लक्ष्य केले जात असेल तर हा प्रश्न जीवनमरणाचाच होता,पण आपली भीती आपणांस सोडून गेली असल्याचे प्रतिपादन करुन त्यांनी विरोधी प्रवृत्तीला काय करायचे ते करण्याचे थेट आव्हानच दिले.आपण आपले काम करत राहू अशी ग्वाहीही त्यांनी या भाषणामधून दिली.आपण घाबरणार नसल्याचेही ते म्हणाले.विशेष म्हणजे मावळत्या अध्यक्षा डाॅ.अरुणा ढेरे यांनीही धमकीबहाद्दरांना योग्य भाषेत चांगलेच फटकारले.

उद्घाटक ज्येष्ठ कवी ना.धों.महानोर यांनी संमेलन अध्यक्ष निवडीच्या नव्या पध्दतीचे कौतुक केले.साहित्याचा निकष लावून केलेली निवड हाच सन्मान असतो असे मत त्यांनी मांडले.मागील चार वर्षात मागच्या सरकारने राज्यातील साडेसहा हजार वाचनालये बंद केली असल्याचे महानोर यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणले.

उद्घाटक आणि संमेलनअध्यक्षांचे भाषण समस्त साहित्यरसिक आणि समाज-संस्कृती यांना सांधणारे तसेच ऐक्याची साद घालणारे ठरले.चाळीस मिनीटे दिब्रिटो बोलले.प्रत्येकाने काही भूमिका घेतली पाहिजे यावर त्यांनी विशेष भर दिला.येशू,तुकोबा आणि इतर महत्वपूर्ण संत,विचारवंतांचा आदरपूर्वक उल्लेख करुन संमेलन अध्यक्षांनी सखोल चिंतनपूर्ण भाषणाची प्रचिती दिली.

            या संमेलनात आवश्यक वातावरणनिर्मितीसाठी संयोजक मंडळ अथकपणे झटत होतं.मागील तीन महिन्यांपासून संमेलनाची तयारी सुरु होती.कुठल्याही राजकारणी वा राजकीय नेत्याला मंचावर फिरकू देण्यात आले नाही.यामधून साहित्य व्यवहारात राजकीय धेंडांची लुडबूड नकोच,या रसिकांच्या जुन्या मागणीचा सन्मानच घडला.उद्घाटन सोहळ्याला निवडक राजकीय मंडळी आले मात्र ते प्रेक्षकातच बसून राहिले.ज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक व्यवहार मंत्री अमित देशमुख,माजी आमदार मधुकर चव्हाण आदींचा समावेश होता.यंदाच्या संमेलनात राजकीय नेत्यांवर फुल्या मारण्यात आल्याने संपूर्ण संमेलन आयोजनावर साहित्य क्षेत्रातील जुन्यानव्या मंडळींचाच राबता दिसून आला.हा बदल सामान्य मराठी रसिकांसाठी सुखदच ठरला.

          उस्मानाबादकरांनी ग्रंथदिंडी,उद्घाटन सोहळा ते ग्रंथ प्रदर्शानातही अमाप उत्साह दाखवला.विशेषतः शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तुडुंब गर्दी आणि उल्हास आयोजकांना परमसंतोष देणाराच म्हणावा लागेल.संयोजकांकडून सर्व निमंत्रीतांची निवास व भोजन व्यवस्था चोखपणे पार पाडण्यात आली,याचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे.

          परिसंवादाचे विषय निवडतानाही संयोजकांची वेगळी आणि सर्वसमावेशक दृष्टी दिसून आली.मान्यवरांनी विषयाची केलेली अभ्यासपूर्ण मांडणी आणि श्रोत्यांची चांगली उपस्थिती यामुळे सर्वच परिसंवाद रंगतदार झाले.दरवर्षीप्रमाणे कवीकट्याला यंदाही कवी आणि रसिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.

  भोजनासाठी भोजनस्थळी आगमन होणार्‍या साहित्यिक मान्यवरांचे चंदन टिळा आणि बुक्का कपाळी लावून स्वागत केले जात होते.उद्घाटनसोहळ्यात आई तूळजाभवानीला आवाहन करणार्‍या पारंपारिक लोककला सादर झाल्या होत्या,हे पाहता उस्मानाबादेतील संमेलनातून लोकसंस्कृतीचा जागर घडविण्याचा उद्देशही बर्‍यापैकी यशस्वी ठरला.संबळाच्या तालावर स्थानीक कलावंतांनी गोंधळात चांगलाच रंग भरला होता.ग्रंथदिंडीमध्ये चाळीसच्यावर शाळांमधील हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभाग लक्ष वेधून घेणारा ठरला.ही ग्रंथदिंडी तीन तास चालली.

     मराठवाडा मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी हे साहित्य संमेलन अराजकीय असेल हे पूर्वीच सांगितले होते.त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्याचेच संमेलनात दिसून आले.मात्र या भूमिकेवरुन मंडळावर टिकेची झोडही उठली....तर मग राजकीय नेत्यांकडून आर्थिक मदत तरी कशाला घेता? असाही सवाल विचारण्यात आला.

           साहित्य संमेलनांमध्ये घेण्यात आलेले परिसंवाद आणि प्रकट मुलाखतींचे कार्यक्रम रसिकांनी डोक्यावर घेतले. शाहीर अमर शेख साहित्य मंचावर ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांची मुलाखत कवी दासू वैद्य आणि सारंग दर्शने यांनी घेतली,जी बर्‍यापैकी रंगली.

         डाॅ.सुषमा करोगल यांच्या अध्यक्षतेखाली भरमसाठ काव्यलेखनाकडे लक्ष वेधणारा परिसंवाद पार पडला.ज्यामध्ये डाॅ.कैलास अंभुरे,डाॅ.समिता जाधव,कवी अरुण म्हात्रे,सीमा शेटे यांचा सहभाग होता.

   समाजात बुवाबाजीचे वाढते प्रस्थ याविषयी चिंता व्यक्त करणारा एक परिसंवाद या संमेलनात घेण्यात आला.ह.भ.प.राम महाराज राऊत यांनी त्याचे अध्यक्षपद भूषविले.

        अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील जीवन जाणिवा या आणखी एका महत्वपूर्ण परिसंवादात अध्यक्ष प्रा.बाळकृष्ण कवठेकर आणि  मोतीराम कटारे,शाहू पाटोळे,डाॅ.ऋषिकेश कांबळे आणि इतर मान्यवर सहभागी झाले होते.

तर एकविसाव्या शतकात लिहील्या गेलेल्या मराठी साहित्यात वाचण्यासारखे काय आहे? या प्रश्नाचा वेध घेणार्‍या परिसंवादामधून अध्यक्ष श्रीराम शिधये तसेच डाॅ. पी.विठ्ठल,डाॅ.दत्ता घोलप,डाॅ.केशव तुपे,अभिराम भडकमकर आदींनी आपली अभ्यासपूर्ण निरीक्षणे नोंदविली.

             एका ख्रिस्ती साहित्यिकाला-धर्मगुरुला प्रथमच अ.भा.मराठी साहित्य संमेलन अध्यक्षाचा सन्मान लाभल्याचे अर्पूप समस्त मराठी जनांना तर होतेच पण विशेषतः वसई भागातल्या ख्रिस्ती बंधूभगिनींना ते थोडे अधिकच होते.याचा प्रत्यय संमेलनस्थळीही आला. फादर दिब्रिटो यांचे कौतुक याची देही याची डोळा पाहण्यासाठी वसई परिसरातील सामवेदी कूपरी समाजातील सुमारे सहाशे नागरिकांनी आपली उपस्थिती नोंदवली.त्या भागातील पस्तीस चर्चमधील १२५ प्रतिनिधीही उपस्थित होते.ही संमेलनाध्यक्ष दिब्रिटो यांच्यावरील स्नेहाची पावतीच म्हटली पाहिजे.

हा सन्मान मिळाल्यामुळे महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती बांधवांंना विशेष आनंद झाला असल्याचे मनोगत यातील अनेकांनी व्यक्त केले.

            मराठवाडा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष ठाले पाटील आणि समिक्षक डाॅ.श्रीकांत तिडके यांनी उस्मानाबादमध्ये पार पडलेले ९३वे अ.भा.मराठी साहित्य संमेलन हे महात्मा जोतीराव फुले यांना अपेक्षित असलेल्या संमेलनासारखेच होणार असल्याचे वारंवार नमूद केले होते,ज्यात बर्‍यापैकी तथ्य दिसून आले.

ग्रंथदालनांमधून फिरताना विद्यार्थ्यांची तुडुंब गर्दी उत्साहवर्धक वाटत होती.कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल ग्रंथविक्री व्यवहारातून झाल्याचे आणि पुस्तकांवर वाचकांच्या उड्या पडल्याचे प्रकाशकमंडळींनी सांगितले.

या संमेलनामधून समाजाला अनेक सकारात्मक संदेश मिळाले आहेत,असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव हे करतात,ते तंतोतंत पटण्यासारखे आहेत.सामाजिक प्रदूषण मुक्तीसाठी साहित्य हे प्रभावी साधन असल्याचेच उस्मानाबाद संमेलनाने दाखवून दिले.

      समारोप सत्रातील प्रमुख वक्ते प्राचार्य रा.रं.बोराडे यांनी वाङमयातील जातीयवाद आणि दहशतवादाकडे लक्ष वेधले.झुंडशाहीचा वाढता उपद्रव

अनेक क्षेत्रात गंभीर समस्या निर्माण करत असल्याचे संमेलनात एका ठरावाद्वारे  मांडण्यात आले.बोराडे यांनी मराठी साहित्यक्षेत्रात बोकाळलेल्या जातीय वादाकडे अंगुलीनिर्देश केला.हा जातीयवाद उद्या वाङमयीन परंपरेलाच पोखरणारा ठरेल असा गंभीर इशारा त्यांनी यावेळी दिला.

         समारोपसत्रात शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेध घेणारे ठराव मांडण्यात आले.

                सामान्य मराठी रसिक वाचकांच्या उत्स्फुर्त सहभागाने कमालीचे यशस्वी ठरलेल्या उस्मानाबादेतील ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने वादाचा धुरळा झुगारत साहित्यसंस्कृती आणि सामाजिक समन्वयाचे शिवधनुष्य यशस्वी आयोजनाने लिलया पेलले असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.संयोजन समितीतील रवी केसकर,राज ढवळे,रवी निंबाळकर,दौलत निपानीकर,चंद्रसेन देशमुख आणि इतरांच्या अथक परिश्रमातून आणि रसिकजनांच्या पाठबळातून हे साहित्य संमेलन काकणभर सरसच ठरले आणि ग्रामीण महाराष्ट्रातील वातावरण हेच आजच्या मराठी साहित्य विकासासाठी कसे पोषक आहे हे सिध्द करणारेही. 

                                             ( दै.नवप्रभा,गोवा )

                                                जानेवारी २०२०

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने