आजकालचे अभंग

आजकालचे अभंग


आजकालचे अभंग!
🚩
माझिया देशाची
भडकावी पिढी
विस्कटावी घडी
सामाजिक

त्याचसाठी सुरू
सारा अट्टाहास
कलेचा प्रवास
घृणेकडे

धर्म आणि सत्ता
चालती सोबत
हातामध्ये हात
घालूनिया

विवेकाला आता
लागलीसे आग
काश्मिरची धग
देशभर

पेटवा-पेटवी
झाली बहू सोपी
पुन्हा कापा-कापी
दूर नाही

उन्मादाचा वारा
झोंबतो देशाला
जाळतो प्रशाला
गांधीजींची

बेकारांची डोकी
मिळाली आयती
कट्टरतेची बत्ती
पेटविण्या

अराजक आता
पोचले दारात
पांगली वरात
विकासाची

पाशवी सत्तेचे
आम्ही मानकरी
सांगू तीच खरी
पूर्वदिशा

रेशीमबागेचा 
मानती आदेश
दिल्लीचे नरेश
कळसुत्री

एकरंगी करू
देश हा संपूर्ण
राबवू पॅटर्न
गुजराती

देशबांधवांना
बनविती वैरी
फाईल काश्मिरी
दुःखदायी
🚩
-भरत यादव
@bharat yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने