-डाॅ.आ.ह.साळुंखे
वेळ नसल्यास वेळ काढून पूर्ण वाचावा असा महत्वाचा आणि उपयोगी लेख
गुलामी नाकारणाऱ्या स्वातंत्र्यप्रेमी प्रत्येक भारतीयाने, खास करुन शेतकरी आणि शेतीनिष्ठ कुटुंबातील भूमीपूत्रांनी आणि सर्वच परिवर्तनवादी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी वेळ काढून पूर्ण वाचावा असा महत्वपूर्ण उपयोगी लेख.
दोन वर्षांपूर्वी पुण्यात एस.एम.जोशी फाउंडेशनतर्फे
ज्येष्ठ विचारवंत डाॅ.आ.ह.साळुंखे यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त त्यांना सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना साळुंखे सरांनी केलेल्या भाषणाचे हे संपादित रूप. वेगवेगळ्या परिवर्तनवादी चळवळीत, संघटनेत काम करणाऱ्या करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने आवर्जून वाचावे , विचार करावा, असे हे चिंतन.
शब्दांकन – भरत यादव,सोलापूर.
मान्यवर बंधूभगिनींनो,
एखादा विषय घेऊन शेकडोवेळा मी बोललो असेन मात्र आज आपल्या भावना कशा व्यक्त कराव्यात हे सुचेनासे झाले आहे.अतिशय आगळ्या पध्दतीने एसेम जोशी फाऊंडेशन आणि स्नेही सुभाष वारे यांनी हा सत्कारसोहळा घडवून आणला आहे.माझा सत्कार हा एका व्यक्तीचा नव्हे तर तो एका भूमिकेचा,समतावादी विचाधारेचा सत्कार असल्याचे मी यापूर्वीही सांगत आलो आहे.आनंदाची बाब ही की त्या संपन्न विचारधारेचा वाहक म्हणून मला आपल्यापुढे कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे.
कृतज्ञता हा माणसाच्या काळजाचा सुगंध होय.कृतज्ञता हरवली तर माणसाचे मनुष्यत्वच संपून जाईल,ती कृतज्ञता व्यक्त करणे हेच या संवादाचे निमित्त.
आजच्या अस्वस्थ परिस्थितीत काळवंडून आल्यासारखे वाटत असतानाच मला स्वतःला कोणत्या मार्गाने पुढं जावंसं वाटतं याविषयी आपल्याशी बोलणार आहे.
भारतीय समाज हा संमिश्र ,वैविध्याने नटलेला आहे,हेच आपण विसरायला लागलो तर आपण या संस्कृतीचं सत्वच हरवून बसू.भाषा,धर्म,जाती वेगळ्या असल्यातरी देशातली ही सर्व माणसे आपली आहेत.त्यासाठी मी नेहमी महात्मा बसवण्णा यांच्या उपदेशाचा संदर्भ देत असतो…ते म्हणतात..’हा कोणाचा हा कोणाचा असे न म्हणता,हा आपला हा आपला असे म्हणावे…’
ज्या समाजात शंभर टक्के लोकांना आपली शंभर टक्के प्रतिभा फुलविण्याचं स्वातंत्र्य आणि संधी मिळते तो समाज आदर्श समजावा,असे मला वाटते.प्रत्येकाला पूर्णक्षमतेने फुलण्याची संधी उपलब्ध असावी अशी माझी धारणा आहे.
आपल्या भारतीय इतिहासामध्ये सत्य स्वरुपात इतिहास मांडण्याचे काम झालेले नाही.प्रस्थापितांनी त्यांच्या नजरेतून,त्यांच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या हितसंबंधाला जपण्याच्या पध्दतीतून भारतीय इतिहास लिहीला गेला.रामायण-महाभारत हे आमचे गौरवशाली ग्रंथ आहेत असे एकीकडे म्हटले जाते,मात्र त्या ग्रंथांमधूनही कसा हितसंबंधाचा खेळ झाला आहे हे पाहाण्यासारखे आहे.महाभारतामधील लाक्षागृहासंबंधीची कथा त्यादृष्टीने लक्षात घेण्याजोगी आहे.पांडव आणि कुंती यांचे प्राण वाचविण्यासाठी सहा निषादांचा प्राण घेतला जाऊनही त्यांना मद्यधुंद असल्याचे दाखवून महाभारतकारांनी एकप्रकारे विशिष्ट हितसंबंधच जपले आहेत.त्यामुळे आपल्याला आयता दिलेला दृष्टिकोन न स्विकारता आपण स्वतःच आपला दृष्टिकोन तयार केला पाहिजे,हे विशेषतः तरुणपिढीने ध्यानी घेतले पाहिजे.
हजारो वर्षे ज्यांच्याकडे जिभा असूनही, मेंदू असूनही त्यांना आपला आवाज विचार व्यक्त करता आला नाही,करु दिला गेला नाही, अशा समूहांच्या जीभा आणि मेंदू बनने ही आजच्या नव्या इतिहासकारांची मुख्य जबाबदारी आहे.हे मला चार्वाकाचा अभ्यास करताना तिव्रतेने जाणवले.या व अशा लेखनामागचे हितसंबंध लक्षात येत गेले.
झलकारीबाई सारख्या सामान्य सामाजिक स्तरातील एका स्रिने असामान्य पराक्रम गाजवलेला असताना महाराष्ट्रात मात्र तो इतिहासच माहित नसतो,याउलट बुंदेलखंड प्रांतात झलकारीबाईच्या पराक्रमगाथांनी तेथील लोकसंस्कृती समृध्द आहे.मैथिलीशरण गुप्त यांच्यासारख्या श्रेष्ठ कविनींही तिची गौरवगाथा गायिली आहे.म्हणूनच म्हणतो की, इतिहाससंशोधन व लेखनासंबंधी आजवर मी किंवा माझ्या पिढीने जे काही केले आहे ते केवळ एका विशाल पर्वताचा टवका उडवण्याइतकेच आहे,तो प्रचंड पर्वत फोडून काढण्याच्या कामगिरीचे आव्हान आजच्या युवापिढीपुढे उभे आहे.
स्वच्छ व निकोप दृष्टिकोनातूनच हे काम झाले पाहिजे.
आजच्या काळात माहितीचे प्रचंड स्त्रोत उपलब्ध आहेत.मात्र ती माहिती स्विकारताना सत्य-असत्यतेला पडताळून पाहिले गेले पाहिजे.कारण माध्यमांमध्ये माहिती अपलोड करणारा मानवी मेंदू असतो,तो विशिष्ट हितसंबंधातून कार्यरत असतो,त्यामुळेच अखंड जागृत असण्याची आज आवश्यकता आहे.
प्राचीन काळापासून या देशातले दोन सांस्कृतिक प्रवाह परस्परांशी झुंजत आले आहेत.त्यांच्यात टोकाचे मतभेद होत आले आहेत.यातला कोणताही प्रवाह कायमचा विजयी वा पराभूत झाला अथवा होणार नाही.
देशातील अलिकडच्या काही घटनांमुळे आपल्या मनात अस्वस्थता दाटून आली असली तरी,राष्ट्राच्या किंवा समाजाच्या इतिहासामध्ये पाच किंवा दहा वर्षांचा कालखंड हा अतिशय किरकोळ ठरतो.त्यामुळे आपली जीवनमूल्ये पराभूत झाली असे मानले जाऊ नये.
मनुस्मृती जवळपास सव्वादोन हजार वर्षे भारतीयांच्या मानगुटीवर बसली होती,मात्र महात्मा जोतीराव फुले ‘मनुमत जाळा’ असे कडाडले आणि पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीची होळी केली.एखादे पुस्तक जाळणे म्हणजे एका विशिष्ट,अन्याय्य विचारसरणीचा निषेध करणे,ती नाकारणे,धुडकावणे होय.
सम्राट अशोकाच्या राजवटीनंतर अवघ्या पंचेचाळीस वर्षात भारतामध्ये प्रतिक्रांती घडली.क्रांतीनंतर प्रतिक्रांती या देशात होत आली आहे.मात्र त्याकरिता केवळ प्रस्थापित व्यवस्थेलाच दोष न देता बहूजनसमाजानेही आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे,आपले काय चूकतेय हे तपासण्याची आवश्यकता आहे असे मला वाटते.
वैदिक आणि अवैदिक या दोन प्रवाहांमध्ये मूलभूत फरक आहे.
वैदिक म्हणतात,आमच्या धर्मग्रंथांनी आणि ऋषीमुनींनी जे सांगितले आहे ते अंतिम सत्य आहे,पवित्र आहे.त्याची चिकीत्सा मानवी बुध्दीने म्हणजेच माणसाने करायची नाही,
तर नेमके याविरुध्द मत अवैदिक म्हणजेच श्रमण परंपरेचे आहे,ते म्हणतात,चिकीत्सेचा अधिकार माणसाला आहे.चार्वाक परंपरेने माणसाच्या या बौध्दिक स्वातंत्र्याचा जबरदस्त आग्रह धरलेला होता,आजही अखंडपणे तो संघर्ष चालू आहे.बुध्दाच्याही आधीपासून सिंधूसंस्कृतीपासून हा प्रवाह अखंडपणे वाहतो आहे.स्वातंत्र्य हाच मोक्ष असे हा विचारप्रवाह मानतो.मृत्यूनंतर ब्रह्म वा मोक्षप्राप्ती या विचारापेक्षा इथले जीवन अर्थपूर्ण बनवणे हाच आमच्यासाठी खर्या अर्थाने मोक्ष आहे म्हणजेच गुलामगिरीतून सुटका होय.चार्वाकांचा हाच विचार बुध्दांनी फार स्पष्टपणे पुढे नेला.महात्मा गोतम बुध्दांकडे एका धर्माचा संस्थापक एवढ्या मर्यादित अर्थाने पाहिले जाऊ नये.त्यांनी सांगितलेले कालामसुत्त आजच्या पिढीलाही लागू आहे.कालामांनी बुध्दांना विचारले,चिकीत्सा करण्याची कसोटी काय असावी?त्यावर सविस्तर विवेचन करण्याआधी त्यांनी कालामांना शंका विचारली हे योग्य केलेत,असे म्हटले! ज्या काळात शंका विचारणे,प्रश्न विचारणे हा बहिष्कृत करण्यायोग्य गुन्हा मानला जायचा त्या काळात बुध्दांनी मानवी बौध्दिक स्वातंत्र्याचा सन्मान केला,त्याला पाठबळ दिले.चिकीत्सा करणार्यांना त्याकाळी समाजात एकाकी पाडण्याची भयानक शिक्षा दिली जात असे.बुध्दांच्या विचाराला आजच्या युगाचेही संदर्भ आहेत म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांना बुध्दविचार आकर्षित करु शकला. व्यक्तीचा स्वानुभव हाच सर्वात महत्वाचा,असे बुध्द मानायचे.मग त्यापुढे ऐकीव अथवा ग्रंथ वा व्यक्तीप्रामाण्याला महत्व नाही!
जन्मानेच काही माणसे श्रेष्ठ अथवा हीन असतात असे सांगणारी एक विचारधारा तर दुसरीकडे चार्वाक,बुध्द,महावीर यांची उदार मानवतावादी विचारांची परंपरा आहे.दुबळ्या माणसाला इतरांच्या बरोबरीने संधी मिळण्यासाठी कर्मकांडे बाजूला सारावीत,अशी कृतीशील उदाहरणे या समतावादी परंपरेत सापडतात.
संधी अधिक प्रयत्न म्हणजे गुणवत्ता होय.आपल्या समतावादी महान पूर्वजांनी निर्माण केलेल्या अनेक गोष्टी वैदिकांनी पळवल्या आहेत.संघ,भगवा हे शब्द तर आता आपला मूळ अर्थच हरवून बसले आहेत. त्रिपीटकात तब्बल अठरा हजारवेळा बुध्दांसाठी वापरण्यात आलेल्या भगवा शब्दाचे काळाच्या ओघात विकृतीकरण केले गेले.
माणुस कुठे जन्माला आला,हे महत्वाचे नाही तर त्याची गुणवत्ता व शील महत्वाचे असे मानणारा हा दुसरा प्रवाह होय.कोणता विचार वा संस्कृतीप्रवाह आपल्या देशाला पुढे घेऊन जाईल,विषमतावादी की समतावादी यावर विचार व्हावा. कोणत्या विचाराने भारतीय समाज जोडला जाईल,यावरही मंथन हवे.
यज्ञयागादि कर्मकांडांना चार्वाक आणि बुध्दांनी नाकारले.चार्वाकांची शैली ही एक घाव दोन तुकडे या पध्दतीची तर बुध्दांची शैली माणसाच्या ह्रदयातून त्याच्या मस्तकापर्यंत पोहोचणारी होती,दोन्हीचेही महत्व तितकेच.पण एखाद्याचा विश्वास संपादन करुन त्याचे प्रेमाने मन जिंकण्यावर बुध्दांचा अधिक भर होता.कर्मकांड झुगारुन माणसाला त्याच्या स्वातंत्र्याला महत्व देणारा हा प्रवाह होता.त्याच विचारांचे प्रतिबिंब…काय बा,करिशी,सोवळे ओवळे…असे म्हणणार्या संत तुकोबांच्या विचारातही दिसते.गृहस्थांनी गृहिणींनी संसार कसा करावा हेही बुध्दांनी सविस्तरपणे सांगितल्याचे आढळते.
स्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी सावित्रीबाईंनी काय खस्ता खाल्या हे आपणांस माहीत आहे.बुध्दांनी आपल्या काळात समाजातील या दुबळ्या वर्गाच्या बौध्दिक उत्थानाचाही बारकाईने विचार केला होता.बुध्दविचारांमुळे त्याकाळी महिलाही निर्भय बनल्याची असंख्य उदाहरणे सापडतात. या देशातला विषमतेचा हा रोग जुनाट आहे.त्याला कडाडून विरोध करणार्यांची समृध्द परंपरा भारताला लाभली आहे.समतेच्या प्रवाहातली मानवतेच्या मूल्यांचा अत्युच्च आदर करणारी, त्याकरिता बलिदान देणारी
उत्तुंग माणसे निर्माण झाली,त्यातुलनेत विरुध्द बाजूला असे एकही नाव आढळत नाही.कर्मकांडी थोतांडांना अवास्तव महत्व देणारे स्वतःचे आणि आपल्या पिढ्यांचेही नुकसान करत असतात.म्हणूनच येथील लोकांनी विद्वान,पंडित यांच्यापेक्षा संतांना डोक्यावर घेतल्याचे दिसते.
आज काळ अवघड आहे.या काळात फार धैर्याने उभं राहाण्याची गरज आहे.निराश होण्याची वा वैफल्यग्रस्त होण्याची मुळीच आवश्यकता नाही.आता आपण सर्वकाही गमावले आहे,असे मानण्याचीही अजिबात ही वेळ नाही.सामाजिक जीवनात चढउतार येत असतात,लाटा येतात-जातात.सत्ता येतात आणि जातात.राजकीय सत्तांपेक्षा सांस्कृतिक सत्ता या महत्वाच्या असतात,याकडे बहुजनांनी लक्ष देणे गरजेचे आहे.मला खंत वाटते ती अशी की,बहूजनातले लोक राजकीय सत्तेच्यामागे धावणारे असले तरी सांस्कृतिक सत्ताधार्यांचे ते गुलामच राहिले आहेत.मग ते राजकीय सत्तेत असोत अथवा नसोत.तुमच्या जीवनाची सगळी मूल्ये जर दुसराच कुणीतरी ठरवत असेल तर तुमच्याकडे जळता जळत नाही इतकी इस्टेट, सत्ता, संपत्ती असून तिचे करायचे काय? मनाने गुलामच असाल तर ती सत्ता,संपत्ती,वैभव काय कामाचे?
जीवनाची अत्यूच्च मुल्ये ही भौतिक गोष्टींपेक्षा अधिक मोलाची आहेत ,असे श्रमण परंपरा मानत आली आहे.जर आपणांस स्वातंत्र्य हे मूल्य प्रिय असेल तर स्वातंत्र्याचे मोलही अधिक द्यावे लागेल. संविधान हे आपणांस दिशादर्शक आहे.संविधानाचे रक्षण आपण केले तरच संविधान आपले रक्षण करु शकणार आहे. आज या श्रेष्ठ मूल्यांच्या रक्षणासाठी लोक आपला वेळही द्यायला तयार नाहीत.समाजाविषयी संवेदना प्रकट होण्याची आवश्यकता आहे.गुलामी लादणार्यांपेक्षाही ती स्विकारणार्यांचा दोष अधिक आहे.
आपल्या समाजातील दाहक विषमता विषन्न करणारी आहे.विशेषतः शेतकर्यांबाबत केला जाणारा दुजाभाव संतापजनक आहे.मूळात शेतकर्यांची सरकारकडून जाहीर होणारी कर्जमाफी ही कर्जफेड मानली जावी. शेतकरीवर्गाने या समाज व राष्ट्रावर केलेल्या उपकाराची भरपाई करणेदेखील अशक्य आहे.तरीही त्यांना घोर उपेक्षेचे जिणे जगावे लागत आहे.समाजातील प्रत्येक व्यक्तीला सुखी,संपन्न,आनंदी जगण्याचा अधिकार आहे,त्यासाठीचे पोषक वातावरण निर्माण करणे सर्वांची जबाबदारी आहे.
आज आपली एक सांस्कृतिक लढाई चालू आहे.
अहिंसेच्या मार्गानेच आपल्याला जायचे आहे.आता ही लढाई फार वेगळ्या पातळीवर पोहोचली आहे. शोषक वर्गाच्या हातात तंत्रज्ञानाची प्रचंड शक्ती आहे.त्यामुळे दुबळ्या लोकांची अतिबलाढ्य शक्तींपुढची लढाई ही अधिक अवघड बनली आहे.मग त्यांच्यापुढे आता हार मानावी का?
शांतपणे गुलामी स्विकारावी का?
असे मुळीच नाही.
मग शोषितांकडे अशी कोणती शक्ती आहे?
शोषित समाजाचे संख्याबळ ही त्यांची मोठी ताकद आहे.मात्र त्यांच्यात फार मोठे वैगुण्यही आहे,ते म्हणजे त्यांच्यातील ऐक्याचा अभाव.सगळे दुबळे,वंचित,शोषित एक झाले,त्यांनी आपसांमधील छोटे छोटे मतभेद मिटवले तरच ही लढाई सोपी ठरणार आहे.याविषयी तथागत बुध्दांनी केलेला उपदेश महत्वाचा आहे.ते म्हणतात,अरे,एकमेंकांची हाडे मोडणारे,प्राणहरण करणारे,संपत्ती आणि राष्ट्राला लुटणारे यांचाही जिथे मेळ बसतो,तिथे तुमच्यासारख्या उच्च मानवी मूल्यांची म्हणजेच स्वातंत्र्य,समता,न्याय,बंधूता यांचा आग्रह धरणार्यांनी किती मिळुन मिसळून राहिले पाहिजे?
म्हणूनच परिवर्तनवादी चळवळीत कार्यरत असलेल्यांनी आपले उद्दीष्ट निश्चित करुन त्याकरिता अहंकार संपवले पाहिजेत.जो आपल्या विचारांचा नाही तो आपल्या विचारांचा व्हावा असे वाटत असेल तर त्यांच्याशी अत्यंत प्रेमाने संवाद साधत राहायला हवे.
आपण माणसं तोडत राहिलो तर चळवळी मोठ्या होणार कशा?
याचा विचार केला पाहिजे.
मी आपल्याशी मुक्तपणे साधलेला संवाद आपण शांतपणे ऐकून घेतलेत त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो.
साभार:
दै.महाराष्ट्र टाइम्स