काय हुकूमशहांना माहित्येय?
की मुसोलिनीच्या जहर
ओकणार्या तोंडात
कोंबण्यात आला होता
मेलेला उंदिर
आणि एका महिलेने सगळ्यांसमोर
स्कर्ट उचलून लघुशंका केली होती
मुसोलिनीच्या तोंडावर
लटकवण्यात आले होते
त्याचे मृत शरीर
'आणखी वर,आणखी वर!' च्या चित्कारांसह
कारण सगळ्या गर्दीला पाहाता यावे
यासाठी.
मुसोलिनीची गत ऐकूनच
हिटलर म्हणाला होता,
की 'आत्महत्येनंतर जाळण्यात यावे
त्याचे शरीर'.
हुकूमशहांना मी विचारू इच्छितो
की,कसं वाटतं तुम्हाला
आपल्या पत्नी आणि प्रेयसी यांना मिठी मारताना,
आपल्या मुलांचे गाल स्पर्श करताना,
मृत आईवडिलांच्या तसबिरीसमोर उभे राहून आपले
तरूणपणीचे दिवस आठवताना.
काय ते जाणतात?
की प्रत्येक जण
त्यांच्याप्रमाणेच कुणाचा तरी आप्त आहे,
नातलग आहे.
काय त्यांना आजारपणात होतो त्रास?
मुंगी चावल्यावर होते का वेदना...?
काय ते जाणतात? की लोक
त्यांच्या निरोगीपणाची नव्हे तर
मरणाची प्रार्थना करत असतात.
इतक्या सार्या लोकांना चिरडताना,मारताना
काय ते विसरून जातात?
की मृत्यू निव्वळ कल्पना नाहीये
खच्चकन कापले जाऊ शकतात
ते ही एक दिवस
कुठल्याही सामान्य माणसाप्रमाणे.
दिवस कधीही पालटू शकतात
प्रत्येक शहरात इजिप्तसारखा
एक तहरीर चौक बनण्याची शक्यता खदखदत असते.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
©देवेश पथ सारिया
Devesh Path Sariya