क्रांतीचीच जयंती...!
समतोल आणि सभ्य समाज निर्माण करणं म्हणजे क्रांती!
सर्वमानवसमभावी स्वभावाची निर्मिती म्हणजे क्रांती! आज भारतात बाबासाहेब हीच अशी एकमेव क्रांती आहे.
*
जयंतीचा उत्सव त्यामुळेच क्रांतीचा उत्सव ठरतो.या उत्सवातून आंबेडकर नावाचं अनन्य लाॅजिक किवा रॅशनल
प्रमाणशास्त्र दिसायला हवं.
*
जयंती म्हणजे रीझन आणि मोरॅलिटी,विचार आणि वर्तन ही
आयुधे अविभाज्य आणि ज्वलंत
करून घेण्याचा उत्सव!व्यवस्थांतर खेचून आणणारे
सामूहिक साहस निर्माण करण्याचा उत्सव!भारताला प्रज्ञानभारत,संविधानभारत म्हणजे निरंतर क्रांतिभारत करण्याचा उत्सव!
*
फोटोंनी , पुतळ्यांनी,स्मारकांनी
आणि सर्वच कार्यक्रमांनी लोकांना आता बाबासाहेबांच्याच
तत्त्वज्ञानाचा पत्ता सांगायला हवा.
*
अभिजनसत्ताक बाबासाहेबांचं
तत्त्वज्ञान बाजूला सारून बाबासाहेबांचा जयजयकार करतं. ते त्याच्या सोयीच्या भावना
चेतवतं आणि परिवर्तनाचा विचार
गोठवतं. विचार अजिबात पटत नाही त्याही व्यक्तीच्या पुतळ्याला
अभिवादन करण्याचं कौशल्य हेच अभिजनसत्ताकाचं वैशिष्ट्य असतं.या वैशिष्ट्याच्या सापळ्यातच ते धारदार माणसं
पकडतं आणि त्यांचे पोपट
करतं.
*
एकाचवेळी ही लोकांचीही आणि
क्रांतीचीही फसवणूक असते.
जयंतीनं हे पिंजरे पार उद्ध्वस्तच
करायला हवेत.
*
ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही ही दोन शोषणसत्ताकं सर्वच दैन्यग्रस्तांची शत्रू आहेत,मी हिंदू
म्हणून मरणार नाही आणि मी प्रथमही आणि शेवटीही केवळ आणि केवळ भारतीय आहे. ही बाबासाहेब आंबेडकरांची तीन
विधानंही संदर्भासह समजावून घेतली तरी आपल्याला त्यांच्या
तत्त्वज्ञानाच्या प्रीअॅम्बलपाशी पोचता येईल.
*
विषमता,दैन्य आणि परावलंबन
निर्माण करणारे सर्वच विचार ,
परंपरा आणि प्रतीकं त्यांनी पूर्णतः नाकारली. माणसाची पूर्ण
बौद्धिक प्रतिष्ठा प्रस्थापित करण्यासाठीच त्यांनी हे केलं. माणूसच जीवनाचा मूल्यदंडआहे.
या माणसाचं एकमेव महानायकत्व निर्माण करण्यासाठी त्यांनी त्याच्या स्वयंपूर्णत्वाचं तत्त्वज्ञान निर्माण केलं. माणसांच्या एकूणच सर्व
बौद्धिक व्यवहाराचा एकमेव विषय माणूसच असावा.या प्रक्रियेतूनच महासत्य जन्माला येतं.सर्वांचंच समान हित हीच या
सत्याची इच्छा असते. या महान
सत्यासाठीच बाबासाहेबांनी
संग्राम सुरू केला. या महासत्याची वाट रोखणारी सर्व
लोकमान्य असत्ये त्यांनी केवळ
माणसाचं मन स्वतंत्र व्हावं यासाठी नाकारली.जीवनाचा
सलोखा आणि गतिविज्ञान नाकारणारं पूर्ण अभिजनसत्ताकच बाबासाहेबांनी
रद्द केलं.
*
बाबासाहेबांनी पंचाऐंशी टक्के बहिष्कृत जनांचा आणि पंधरा टक्के अभिजनांचा एकश्रेणीसमाज निर्माण करणारं
सिद्धान्तन दिलं. त्यांनी त्यासाठी
निर्णायक संग्राम सुरू केला. विचार आणि प्रथापरंपरा असं सर्व शोषणसत्ताक त्यांनी विघातक म्हणून नाकारलं.
*
बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानातून आणि आंदोलनांमधून सर्वसमावेशकतेची तीन सूत्रं पुढं
येतात.सर्वच दैन्यग्रस्तांची एकजूट हे पहिलं सूत्र!सर्वच क्षेत्रांमधील
सर्व परिवर्तनवादी संघटनांची एकजूट हे दुसरं सूत्र आणि ज्या
गतिमान जगाचे आपण अविभाज्य भाग आहोत त्या जगातील परिवर्तनवादी विचाराशी मैत्री हे तिसरं सूत्र !
या तीन पातळ्यांवरच्या सर्वसमावेशकता एकत्र केल्या तर
बाबासाहेबांच्या क्रांतीचं महाद्वार
उघडलं जातं.त्यासाठी सर्वांच्या
समान हिताचा सर्वमान्य मसुदा
तयार करायला हवा .
*
ही सत्तासंकल्पना प्रत्यक्षात आली
तर देशातील दैन्यग्रस्तांची सत्ता
प्रस्थापित होते. हे मग केवळच
सत्तांतर होणार नाही तर ते सर्वांच्या समान हिताचं मूल्यांतरही होईल.
*
अभिजनसत्ताकानं दैन्यग्रस्तांना केलेली विचारबंदी नष्ट करावी लागेल. यासाठीच बाबासाहेब प्रथम विचारस्वातंत्र्याची महती
स्थापित करतात. विचार सुरू झाल्याशिवाय आपण गुलाम आहोत ,दुय्यम आहोत आणि अभिजनसत्ताकाचे सेवक आहोत
याची जाणीव दैन्यग्रस्तांना होणारच नाही.
*
बाबासाहेबांना अभिजनांचाही आणि दैन्यजनांचाही हा मनोरुग्ण
स्वभाव बदलायचा आहे आणि
परस्परांना सन्मानानं वागवणारा
नवा स्वभाव निर्माण करायचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांची
क्रांती हा परस्परोपकारक नवा
स्वभाव निर्माण करू इच्छिणारीच
क्रांती आहे.
*
बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान काय आहे , ते कोणासाठी आहे , ते
कोणत्या मानवी अस्तित्वाची
संरचना करते आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध कोणत्या विचाराला
आणि का होता हे समजावून घेणं
आणि देशातील सर्वच भावंडांना
कळकळीनं समजावून सांगणं हाच एकमेव ध्यास आज बाबासाहेबांच्या जयंतीला असावा.
*
अभिजनांचाही आंणि दैन्यजनांचाही संपूर्ण परिवर्तनाला विरोध करणारा स्थितीशील स्वभाव बदलणं हाच खरा कळीचा मुद्दा आहे. या दोन्ही स्वभावांचा विरोध समतेलाही आहे आणि नवरचनाशील
विज्ञानदृष्टीलाही आहे. गोठलेल्या
या समूहांचे देशविघातक आणि मानवतामारक स्वभाव बदलण्यासाठीच बाबासाहेबांचं
तत्त्वज्ञान आहे. बाबासाहेबांच्या
जयंतीचा जगातला सर्वात मोठा
उत्सव डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या तत्त्वज्ञानाच्या
सूर्यमुखानंच बोलायला हवा.
****
--- यशवंत मनोहर
Yashwant Manohar