उदगीर येथे सुरू होत असलेल्या सोळाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला ज्येष्ठ विचारवंत डाॅ.यशवंत मनोहर
सरांनी पाठविलेल्या हार्दिक सदिच्छा.
🌿
संविधानभारतासाठी...
विद्रोही साहित्यसंमेलनाला सदिच्छा!
-- यशवंत मनोहर
भावंडांनो!
सांविधानिक भारतीय संस्कृतीशी
द्रोह करणा-या मूलतत्त्वी व्यवस्थेविरुद्ध पूर्ण अहिंसक मार्गानं उठाव करणारे विद्रोही आपण आहोत.
*
सर्वहिताय जीवनाच्या आणि साहित्याच्याही महत्तेची मूल्ये
एकमयच असतात आणि ती पंचाऐंशी टक्के दैन्यजनांना
अभावात खितपत ठेवणा-या पंधरा टक्के लोकांच्या सर्वंकष
शोषणसत्ताकाविरुद्धच असतात.
विज्ञाननिष्ठा आणि सर्वमानवसमभाव ही आपली सांविधानिक
जीवनमूल्ये आपल्या साहित्याचीही सौंदर्यमूल्ये आहेत.
*
प्रत्यक्षातील सामाजिक-आर्थिक
असं सर्वंकष दमन,या दमनाची
तत्त्वदुष्ट व्यूहरचना आणि दमनकारी भाषा अशा तीन पातळ्यांवर काम करणारी अमानुष व्यवस्था समानुषतेशी
घनघोर द्रोहच करीत असते.या
द्रोहाला उद्ध्वस्त करणारा आपला निर्धार विद्रोहीच असतो.
*
ज्या भाषेद्वारा आणि रीतिरिवाजांद्वारा अभिजनसत्ताक
त्याच्या वर्चस्वाचे विष दैन्यजनांमध्ये पसरवते ते संपूर्ण
शोषणसत्ताक मुळासकट नष्ट करण्याची धमक दाखवतो तोच खरा विद्रोही असतो. अभिजनसत्ताकाची दिशाभूल करणारी चैतन्यवादी भाषा आणि तिच्यातील विचारविष या दोन्ही
संदर्भात आपली भूमिका एक घाव दोन तुकडे हीच असायला हवी. या दोन्ही पद्धतींनी विषमसत्ताकाशी समरस होणारा विद्रोह कुठल्याही अर्थानं विद्रोहच
नसतो.
*
आज आपली सर्व क्रांतिभाषा प्रतिक्रांतिवादी लोक क्रांतिविरोधी
विचार लोकप्रिय करण्यासाठी वापरत आहेत. हे भाषेचं अपहरण आपल्याला सत्तापरिघाबाहेर ढकलत आहे हे आपण नीट लक्षात घेण्याची गरज आहे. आपल्या कोट्यवधी भावंडांना षडयंत्री अभिजनसत्ताकानं जातींच्या , धर्मांच्या आणि भक्तीच्या पिंज-यांमध्ये अडकवलं आहेच आता हा भाषिक फसवणुकीचाही
नवा पिंजरा त्यानं तयार केला आहे.
*
ज्या आपल्या दमनत्रस्त भावंडांसाठी आपण विद्रोह उभारला आहे त्यांचा अभिजनसत्ताकानं निर्माण करून
ठेवलेला स्वभाव,कार्यकर्त्यांचा
स्वभाव आणि साहित्यिकांचाही
स्वभाव पूर्ण विसर्जित करून त्याजागी एक सळाळता विद्रोही
स्वभाव निर्माण करण्याची गरज आहे. सोबत या स्वभावात प्रखर
समूहभानही चेतवण्याची नितांत
आवश्यकता आहे.
*
आम्ही विद्रोही आहोत म्हणजे आम्ही केवळ आणि केवळ भारतीय आहोत म्हणजे पूर्ण धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी आहोत आणि संविधानसंस्कृतीची
जबाबदार मुलं आहोत हे आपल्याला ठामपणानं सांगता यायला हवं.असा भारतीय स्वभाव
निर्माण करण्यासाठी आयोजिलेल्या विद्रोही साहित्यसंमेलनला मी मनापासून
सदिच्छा देतो.
*
बंधू गणेश विसपुते,सरवर चिश्तीजी, नागराज मंजुळे, रवीशकुमारजी आणि अशोककुमार पांडेजी या दिग्गजांसह एकूणच संविधाननिष्ठ
प्रज्ञावंत भारत मला इथं इतक्या
अंतरावरूनही दिसतो आहे.
असं वाटतं हा ज्वालांच्या झेंड्यांचा स्वाभिमानी सागर आहे.
भावंडांनो, तुम्हा सूर्यपुत्रांच्या
विचारमंथनात सहभागी होता आलं असतं तर फार बरं वाटलं असतं.असो.व्यवस्थाबदलाची अजिंक्य ऊर्जा मनामनात चेतवणा-या या साहित्यसंग्रामाला
मी अंतःकरणापासून सदिच्छा देतो. धन्यवाद!
--------------
२२ एप्रिल २०२२