प्रबुद्धत्व आणि इतर धर्मांचे 'त्व'.....

प्रबुद्धत्व आणि इतर धर्मांचे 'त्व'.....

'प्रबुद्धत्व'आणि 
इतर धर्मांचे ' त्व '...

प्रिय भावंडांनो ,
आपल्या वागण्याबोलण्यातून वर्तमानाच्या आजारांचं अचूक आकलन प्रकट व्हायला हवं,
 आणि  आजार नष्ट करणा-या औषधांसारखेच आपले सर्व आविष्कार असावेत. 
*
गरजेतून विचार जन्माला यावा आणि या विचारातून सलोख्याच्या 
सर्व गरजा निर्माण व्हाव्यात. 
*
करायलाच हवं ते नेटानं करावं आणि जे करून काहीही उपयोग नाही तेच उत्साहानं करू नये. 
*
करता येण्यास सोपं ते करण्यापेक्षा उपकारक अशा  अवघड कामाची हिमतीनं निवड
करावी.
*
समविचारी,समध्येयी आणि समस्वभावी माणसं जोडण्याचा सतत कसून प्रयत्न करावा तुमच्याशी जुळणारी माणसं तोडू
नका. अशी माणसं तोडणं हे स्वतःलाच तोडणं ठरतं.
*
' आपली ' माणसं म्हणजे समध्येयी माणसं! आपली माणसं 
म्हणजे त्या ध्येयासाठी एकनिष्ठेनं
झुंजणारी आपली साथीदार माणसं. ' परकी ' माणसं म्हणजे या ध्येयाच्या विरोधात काम करणारी माणसं!
*
धर्मनिरपेक्ष माणसांची संख्या आपण वाढवायला हवी. धर्मनिरपेक्षतेला विरोध करणारांची संख्या त्यामुळं आपोआप कमी होत जाते.
*
संविधानभारताचं स्वप्न आता लोकांच्या डोक्यात नियंत्रक मूल्यदंड म्हणून प्रस्थापित व्हायला हवं. संविधानभारत म्हणजे परस्परांच्या भल्यासाठी 
झटणा-या भारतीय नागरिकांचा
भारत ही खात्री लोकांना पटायला 
हवी. 
*
जी माणसं इतरांच्या हितात   स्वतःचं हित बघतात ती माणसं 
करुणामयच झालेली असतात.
करुणामय मन म्हणजे सर्वच 
भेदांपलीकडं गेलेलं परिपक्व  मन ! हे मनच प्रज्ञानी वा प्रबुद्ध मन असतं.
*
' प्रबुद्धत्व ' हा सर्वमानवसमभावीच स्वभाव असतो. कोणत्याही धर्माच्या ' त्व '
पेक्षा प्रबुद्धत्वातील ' त्व ' ची
माणूसमयता असीमच असते.
*
प्रबुद्धत्व म्हणजे असीम सलोखामयता!या आपल्या सलोख्याचे दिवेच भोवतीच्या 
विद्वेषाच्या वादळात आपण निर्धारपूर्वक लावायला हवेत.
*
करुणा हीच आपली मातृभाषा 
व्हायला हवी. करुणा म्हणजे मानवी सामंजस्य ! मानवी सामंजस्य म्हणजे ' प्रबुद्धत्व '..!
भारतीय संविधान या प्रबुद्धत्वाचाच बीजग्रंथ आहे. त्यात कोणत्याही धर्माच्या ' त्व ' ला थारा नाही. कारण ' प्रबुद्धत्व '
पूर्ण विषमतातीतच आहे. ते पूर्ण 
बंधुतामयच आहेआणि  तेच आपल्या
वागण्याबोलण्यातून लोकांना 
दिसायला हवं..

-- यशवंत मनोहर 
२० एप्रिल २०२२
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने