होय, मी विद्रोही आहे!
पण,माझा विद्रोह
तू माझ्या नरडीला लावलेलं नख छाटण्यासाठी आहे
माझं नख तुझ्या नरडीला लावण्यासाठी नाही.
दोस्ता,तू माझ्या जीवनाचं वाळवंट केलंस
माझा विद्रोह
त्या वाळवंटात हिरवळ पिकवण्यासाठी आहे
तुझ्या जीवनाचं वाळवंट करण्यासाठी नाही.
बाबा रे,माझा विद्रोह
तू केलेल्या माझ्या अपमानातून मुक्त होण्यासाठी आहे
तुझा अपमान करण्यासाठी नाही.
अरे माझ्या भावा,
माझा विद्रोह
तू माझ्या जीवनात निर्माण केलेली
अमावास्या दूर करण्यासाठी आहे
तुझ्या जीवनात अमावास्या निर्माण करण्यासाठी नाही
उलट,
माझ्यासह तुझ्या जीवनात पौर्णिमा
करण्यासाठी आहे !
- डाॅ. आ.ह.साळुंखे