१)
माणसाने लावलेल्या शोधांमध्ये
दुर्मिळ शोध आहे काड्याची पेटी
ती भक्कदिशी पेटते उजेडभर
आणि अदृष्य होऊन जाते!
माणूस कधी शिकणार आहे जगणे
क्षणभंगुरतेच्या सत्वरतेत!
-सवाई सिंह शेखावत
०००
२)
तुम्ही बुध्दीजीवी आहात
मग तुमच्या नावाचे पुस्तक छापले जाईल
मी शेतकरी आहे
मग माझ्या नावे ऋणपुस्तिका असेल!
मी तुमचे पुस्तक वाचणार नाही
तुम्ही सुध्दा तर
माझी ऋणपुस्तिका कधी वाचत नसता!
- राजहंस सेठ
०००
३)
एका दीर्घ चर्चेनंतर
तिचा लहानसा,
पण खोल निःश्वास
आणि जाणून घेतो मी
आता मला हरले पाहिजे!
- संदीप गौड
०००
४)
जर सावली झाडाचा
तृप्तता नदीचा
सृजनता पृथ्वीचा
आणि प्रकाश सुर्याचा धर्म आहे
तर माणसाचा धर्म
हिंदू मुस्लीम कसा काय असू शकतो!
- हरीश करमचंदानी
०००
५)
हिमप्रलयानंतर
बर्फांमधून डोकावणार्या
अल्पकोरड्या ओलसर फांदीवर
जी पहिली पालवी फुटेल
निश्चितपणे
ती स्त्री असेल!
-सुदर्शन शर्मा
मूळ हिंदी लघुकवितांचा
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav