बस्स,हे संविधान तेवढे त्यांच्या मार्गातून हटले पाहिजे !

बस्स,हे संविधान तेवढे त्यांच्या मार्गातून हटले पाहिजे !

बस्स,
हे संविधान तेवढे त्यांच्या मार्गातून हटले पाहिजे !

गल्लीतल्या गुंडांपासून
सभ्य लोक अंतर राखतात
ते त्यांच्या तोंडाला लागत नाहीत
मग ते शेजारच्या कुण्या मुलीला छेडत असले तरी,
जास्तीतजास्त ते कुजबूज करुन थांबतात

मात्र तेच लोक 
स्नूपगेट घोटाळ्यावर गप्प बसत नाहीत
तिखट टिपण्या करतात
वर्तमानपत्रात व्यंगचित्रं रेखाटतात
किस्से रचतात
उग्र कविता लिहीतात
ती व्यक्ती प्रधान बनली, 
तरीसुध्दा लोक घाबरत नाहीत
उलट आपली जीभ आणखी तिखट करतात
आपली लेखणी अजून टोकदार बनवतात
गल्लीतल्या सामान्य गुंडांपासून दूर राहणारे हे लोक
प्रधानाच्या मार्गात
पाय रोवून ठामपणे उभे ठाकतात

ते जाणतात,
त्यांच्या आणि प्रधान यांच्यामधे
संविधान आहे
ज्याला प्रधान उल्लंघू शकत नाहीत
हा विश्वास सभ्यजनांना भितीमधून मुक्त करतो
मात्र गुंड हा संविधानाच्या बाहेर असतो
तो व्यवस्थेच्या कक्षेबाहेरचा माणूस असतो
त्याची कुठलीच असहाय्यता नसते
तो कधीही तुमच्या घरात घुसून
दाभोलकर
पानसरे
कलबुर्गी
किंवा गौरी लंकेश 
यांच्याप्रमाणे तुमचा खून
पाडू शकतो
तो सत्याच्या अखेरच्या टप्यापर्यंत जाण्यासाठी ठाम असलेल्या न्यायाधीशाची हत्या करुन लोया करु शकतो
तो जर खुश झाला तर
सन्मानित करुन त्यांचा गोगोईसुध्दा करु शकतो!

तो 
प्रा.वरवरा राव,
अरूण परेरा,सुधीर ढवळे
वा यांसारख्या लोकांचा
कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग
प्रदीर्घ काळासाठी बंद करू शकतो
आणि जे बाहेर आहेत, 
जसे की
गौतम नौलखा किंवा आनंद तेलतुंबडे
वा यांच्यासारखेच कैक अन्य लोक
त्यांचा जामीन अर्ज फाडून तो कचरा कुंडीत फेकू शकतो

गुंड कशासाठीही जबाबदार नसतो
त्याची कुठली मजबूरी नसते
तो लोकशाहीचा भाग असत नाही
तो सत्तापक्षाचे आमदार खरेदी करुन
एका रात्रीत लोकशाहीचे अपहरण करु शकतो

तो मुडद्यांच्या ढिगार्‍यावर
दिव्यांचा उत्सव साजरा करु शकतो
चहूबाजूला पसरलेल्या शोक आणि 
अशुभाच्या काळात फटाके फोडू शकतो
लाखो घरांमधून उठणार्‍या विलापामध्ये 
जोरदार भाषण देऊ शकतो!
भीती आणि भूकेच्या विवंचनेत 
भटकणार्‍या आयुष्यामध्ये
तो पुढे सरसावण्याचे गाणे
यशस्वीपणे गाऊ शकतो!

ही सर्व कामे प्रधान देखील करु शकतात!
तेही विवशतेमधून मोकळे होऊ शकतात!
जबाबदारीपासून माघार घेऊ शकतात!
त्यांनी ठरवलं तर ते स्वतःला
लोकशाहीचा भाग मानू शकत नाहीत
काहीही अशक्य नाहीये त्यांच्याकरिता
खरेतर ते अाणखी कुशलपणे हे सर्व करु शकतात!
ते तर असे निर्घृण दृष्य उभे करु शकतात
की जल्लादाच्या अंगावरसुध्दा
सरसरुन काटे उभे राहतील
बस्स,
हे 'नकोसे' संविधान तेवढे त्यांच्या मार्गामधून हटले पाहिजे!

मूळ हिंदी कविता
रंजीत वर्मा
Ranjit Verma

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने