नरसंहार थांबवा बस्तरमधला

नरसंहार थांबवा बस्तरमधला

नरसंहार थांबवा बस्तरमधला!

कधी होतो खांडववन
तर कधी मी आहे बस्तर
संस्कृतीच्या रथाखालचा
मी व्यथेचा एक प्रस्तर

शरण दे रे तू पार्था,
साम्राज्यशाही उदराग्नीला
'अपराध नव्हे हा तर' म्हणती,
देती टायधारी कृष्ण सल्ला

खादी गुंडाळल्या अर्जुनाचे
अंध-बहिरे ते अग्नीबाण
नित्य बरसती बस्तरवरती
कसली स्वप्ने अरण्यवासियांची
कसले जीवन अन् कसली वस्ती?
रे पार्था, 
सारं सारं जाळून टाक
वाढवी साम्राज्याचा धाक 
खांडव भलेही होवो खाक
वा बस्तरची होवो राख

कृष्णाचा सल्ला अन् 
अर्जुनाचे तीर
जुमानत नाहीत
जंगलातले पीर
सभ्य देवता मागती
जंगल बळी,मुर्दाड लोक
आणि नागवी धरती

धर्मस्थापनेच्या नावाखाली
खांडववनाची होळी रे
लोकशाहीच्या वेदीवरती
आता बस्तरची पाळी रे

तू देतोयस सल्ला परंतू
विसरू नकोस कृष्णा

अरण्यातही आहे
जीव आणि स्पंदन
भरार्‍या घेणारं जीवन
आसवांनी,आनंदाने
वेदनेने अन् संतापाने
कधी खांडवही होते संपन्न
अन् आता बस्तरपण

शतकानुशतके जळतेय अरण्य
क्रोधाने जेव्हा ते मूठ आवळेल
तेव्हा तू पण शिकार ठरशील
येईल कुठूनसा बाण जहरी
आणि तळव्यातून जाईल पार
निळसर ती गर्विष्ठ काया
दुःखावेगाने विव्हळेल फार
ऐकशील मग ही अरण्यगाथा
क्षणात जाणून घेशील तेव्हा
खांडव-बस्तरची ही व्यथा!

स्वैर मराठी रूपांतर
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता
मानसिंह मीणा
Mansingh Meena
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने