नेत्यांच्या इच्छाशक्तीवर !
ज्येष्ठ काॅंग्रेसनेते सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला सविस्तर मुलाखत दिली आहे.
या मुलाखतीत त्यांनी काॅंग्रेसच्या पराभवाची कारणमिमांसा व्यक्त करताना आजवर अस्पर्श राहिलेल्या अनेक विषयांना स्पर्श केला आहे.
ही वेळ खरोखर काॅंग्रेसच्या आणि समस्त काॅंग्रेसजनांच्या प्रामाणिक चिंतनाची आहे असे वाटते.
या मुलाखतीत एके ठिकाणी शिंदे यांनी पक्षकार्यकर्त्यांच्या वैचारिक कार्यशाळांची गरज अधोरेखीत केली आहे.ही बाब अतिशय महत्वाची वाटते.आजवर सत्तासंपत्तीच्या मागे लागलेल्या काॅंग्रेसजनांना ( अर्थातच सन्माननीय अपवाद वगळता ) पक्षकार्यकर्ते निवडण्याचे,घडविण्याचे आणि वाढविण्याचे सुचले नव्हते.केवळ गांधी घराण्याच्या पुण्याईवर मते मागण्याचे दिवस मागेच सरले असल्याचे लवकर ध्यानी घ्यावे लागेल.अन्यथा २०२४ ला देखील अजस्त्र अशा संघ अधिक भाजपशक्तीपुढे काॅंग्रेस आणि एकटेदुकटे लढणार्या अन्य विरोधकांचे पानिपत ठरलेले आहे हे निश्चित.त्यामुळे ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांकडून येणार्या सूचनांचा पक्षश्रेष्ठींनी गंभीरपणे विचार
करायला हवा.
देशपातळीवर काॅंग्रेस कार्यकर्ता शिबीरांचा धडाका उडवून द्यायला हवा.त्यासाठी जुन्याजाणत्या आणि तरूण,तडफदार नेत्यांची मोट बांधली जावी.कन्हैय्याकुमार,जिग्नेश मेवाणी आणि हार्दिक पटेल सारख्या नव्याने क्राॅंग्रेसवासी झालेल्या आक्रमक तरूण नेत्यांना याकामी कामास लावले पाहिजे,नाहीतर या आणि
इतर युवा व ज्येष्ठ नेत्यांचे पक्षात लोणचे घालायचे आहे काय?
काॅंग्रेसपक्षासारखा जुना आणि देशपातळीवर संघटनजाळे मजबूत असलेला राजकीय पक्ष आज गलितगात्र अवस्थेत पोहोचला कसा? त्याचीही कारणे शोधावी लागतील. काॅंग्रेसनेत्यांनी आजवर पक्षाचे हितचिंतक म्हणून पोसलेले लोकच आज भाजपचे कट्टर समर्थक बनले आहेत.मूळात आरेसेस ने समाजबांधणीच्या नावाखाली सत्ताधारी काॅंग्रेसचा पूरेपूर लाभ उठवला आहे,उरलीसुरली कसर पक्षातील छुप्या संघवादी नेत्यांनी भरून काढली आहे.सांस्कृतिक वर्चस्वाची लढाई कशी लढली आणि लढवली जाते हे ही काॅंग्रेसच्या लोकांनी ध्यानी घ्यायला हवे.
त्यासाठी फुलेशाहूआंबेडकरी विचारांचा वारसा जपलेल्या विचारवंत,साहित्यिक,कलावंत,
दिग्दर्शक यांचे पक्षविरहीत सामाजिक व बौद्धिक मेळावे घ्यावे लागतील,त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे लागेल,त्यांनी केलेल्या सूचनांचा आतातरी गांभिर्याने विचार केला जावा.महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास गांधीनेहरूंच्या विचारांना मानणारे प्रत्येक जिल्ह्यात किमान दहाच्यावर तरी नामवंत नावे निघतील.अशा सर्व ज्येष्ठ स्त्रीपुरूष पक्षसहानुभूतीदारांना विश्वासात घ्यावे लागेल.केवळ पक्षाच्या नव्हे तर देश नव्याने उभारण्याच्या आणि देशाची लोकशाही रचना तसेच संविधान वाचविण्यासाठीची ही लढाई आहे या अभिनिवेशातून कामास लागले पाहिजे.त्यासाठी आजवर सत्तेची फळे चाखलेल्या एकूण एक लहान मोठ्या नेत्यांना कामाला जुंपायला पाहिजे.
सोशल मिडियामध्ये काॅंग्रेसच्या विचारांचा सकारात्मक प्रचार,प्रसार करण्यासाठी तगडी टीम बनवण्याची योजना हवी.कारण आजच्या काळातली खरी लढाई तिथेच आहे.
तिथे केवळ संघभाजपच्या विषारी व जहाल प्रचाराला उत्तर देण्यात ऊर्जा घालविण्यापेक्षा जनसामान्यांचे आणि देशाचे हित कशात आहे हे नेमकेपणाने सांगणारे युक्तीवाद व्हायरल केले पाहिजेत.भारतात आजही काॅंग्रेसच्या मूळ लोककल्याणकारी विचारांवर प्रेम करणारी कोटी कोटी जनता आहे.त्या जनतेपर्यंत कसे पोहोचायचे? याचा मार्ग काॅंग्रेसने शोधला पाहिजे.
तो नक्कीच दीर्घ चिंतनातून आणि सत्तासंपत्तीचा मोह टाळण्यातून येणार आहे.आज नव्याजुन्या नेत्यांची,कार्यकर्त्यांची पक्षाला गरज आहे.गावपातळीवरील कार्यकर्ते दिशाहीन होण्याआधीच त्यांना पक्षकार्याच्या मोहिमेत सहभागी करून घेतले पाहिजे.त्यासाठी आजीमाजी नगरसेवक,पंचायत सदस्य,आमदार,खासदार व इतर पदाधिकार्यांना दिल्लीहून-मुंबईहून आदेश दिले गेले पाहिजेत.
आज पक्ष संकटात आहे म्हणजेच खरा भारत संकटात असल्याची जाणीवजागृती जनलोकांमध्ये होण्यासाठी काॅंग्रेसने मरगळ झटकून कार्याला लागले पाहिजे.'तुझे आहे तुजपाशी,परंतू जागा चूकलाशी' ही उक्ती ध्यानी घेऊन काॅंग्रेसने इच्छाशक्ती दाखवली तर देशात उठलेली ही असहिष्णुतेची वावटळ रोखता येऊ शकेल.
नकली राष्ट्रवादाचा संघीय बुरखा टराटरा फाडता येऊ शकेल.
संघ आणि संघसंबंधीत संस्था तसेच व्यक्ती यांच्यापासून कटाक्षाने अंतर राखत काॅंग्रेसने आपली खरी ओळख ही गावपातळीवर आणि शहरी भागात नेण्याचा प्रयत्न केल्यास आजही लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते
पक्षाशी जोडले जातील.विषारी प्रचाराचा मुकाबला करताना काॅंग्रेसकडून गांधीनेहरू यांची जुनी रणनीती आधुनिक आणि आकर्षक फाॅर्म्युल्यामध्ये सादर केली गेली तर गांधीजींच्या पुण्याईवर मोठे झालेले गोडसेवादी उघडे पडतील. आपला खरा वैचारिक वारसा जर गांधी-नेहरू-पटेल-बोस यांचा असल्याचे काॅंग्रेस खरोखरच मानत असेल तर या आठ वर्षाच्या भाजप सत्ताकाळात नव्याने ओळख पटलेल्या गोडसेसहानुभूतीदारांना खड्यासारखे बाजूला फेकले गेले पाहिजे.राष्ट्रपित्याच्या मारेकर्याचे आणि त्या खूनाच्या सूत्रधारांचे निर्लज्ज समर्थन करणार्या नागपूरी स्वयंसेवकांपासून पक्षाला मुक्त केले पाहिजे.कारण खुद्द सुशीलकुमार शिंदेदेखील आजवर सामाजिक सहिष्णुतेच्या नावाखाली सार्वजनिक कार्यक्रमात कट्टर हिंदूराष्ट्रसमर्थकांच्या मांडीला मांडी लावून बसत आले आहेत.यापुढे हा वैचारिक अविचार काॅंग्रेसनेत्यांनी सोडून द्यायला हवा.केवळ मतांसाठी आणि सत्तेसाठी कुठल्याच पक्षकार्यकर्त्याने संघाशी वा संघसंबंधीत संघटनांशी कुठल्याही प्रकारचे संधान बांधण्याचा प्रयत्न करता कामा नये.भलेही मग निवडणूकीत काही जागा कमी मिळाल्या तरी चालेल. सच्चा काॅंग्रेसविचार हा आरेसेस बरोबर कुठलाही संबंध न ठेवण्यामुळे टिकणार आहे.ज्यावेळी इकडला म्हणजेच बहूसंख्याक हिंदूंमधला कट्टर विचार काॅॅंग्रेसने त्याज्य मानला पाहिजे त्याचवेळी अल्पसंख्याक समाजाचे तुष्टीकरणही टाळले पाहिजे,तिकडला जातीय व धार्मिक कर्मठपणाही जाणीवपूर्वक नाकारला पाहिजे.इथे 'फुलेशाहूआंबेडकरी' विचारांचा अस्सल बाणा पुन्हा मदतीस येऊ शकेल,पण काॅंग्रेसजनांची खरी आंतरीक तळमळ असेल तरच!
तुम्ही संविधान वाचविले तर संविधान तुम्हाला वाचवेल,हे ब्रीद मनामनांवर पक्के बिंबवले गेले पाहिजे.तरच तळागाळातला कार्यकर्ता पक्षाशी जोडला जाईल.
वैचारिक आघाडीवर कार्यरत राहतानाच विकासाचा वेगही मंदावला नाही गेला पाहिजे.देशात काही राज्यांमधील बचावलेली सत्ता जनकल्याणासाठी वापरली जात असल्याचे लोकांना ठळकपणे दिसले पाहिजे.तरूणांच्या रोजगाराचा,शेतकरी समस्यांचा प्रश्न हाती घेऊन सत्ताधारी भाजपशी संघर्ष जारी राखला गेला पाहिजे.निवडून येण्याची केवळ आर्थिक आणि बाहूबलीय ताकद लक्षात न घेता आमदार-खासदारकी साठी इच्छुक असलेल्या विशेषतः युवा महिला व पुरूष उमेदवारांना आपापले मतदारसंघ पदयात्रांच्या माध्यमातून पिंजून काढण्यासाठी सांगितले गेले पाहिजे,नव्हे तशी पूर्वअटच घातली जावी.तरच उद्याच्या नेत्यांना,पुढार्यांना जनसमस्यांचे खर्या अर्थाने आकलन होऊ शकणार आहे.महात्मा गांधीजींचा हा एक पदयात्रामंत्र जरी काॅग्रेसने देशात
तरूण कार्यकर्त्यांकडून प्रामाणिकपणे आणि तळमळीने अंमलात आणला तरी पक्षाला नवी चमक तसेच अपेक्षित झळाळी प्राप्त होऊ शकेल.
पण त्यासाठी सत्तासंपत्तीसाठी होऊ पाहणारा,होणारा भ्रष्टाचार व त्याचबरोबर घराणेशाही यांना तिलांजली द्यावी लागेल. तर आणि तरच राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षाचा खर्या अर्थाने अपेक्षित कायापालट होऊ शकणार आहे.
-भरत यादव,सोलापूर.
९८९०१४०५००
yadavbh515@gmail.com