🚩
सह्याद्रीस का रे
धरले वेठीस
शिवशंभू श्वास
होते ज्याचे
लाभला प्रत्यक्ष
ज्यास शिवस्पर्श
सह्याद्री तो खास
गिरीश्रेष्ठ
सह्याद्रीचा कोट
होता मजबूत
म्हणून शाबूत
गडकिल्ले
सह्याद्री आमुच्या
बापाचाही बाप
सांगता प्रताप
थके जीभ
सहाय्य करी तो
राजा शिवाजीस
तप्त लाव्हारस
पचवूनी
ऐसा सह्यगिरी
तोच हा सह्याद्री
कापतसे वैरी
चळाचळा
याच्याच बळाने
केल्या रे चढाया
दुश्मनांची रया
घालविली
अंगाखांद्यावर
बागडले वीर
कितीक ते शूर
लढवय्ये
आम्ही सारेजण
सह्याद्रीची पोरे
शतकांचे आरे
फिरताती
मावळ्यांची जिद्द
रांगडी संपत्ती
त्याने छत्रपती
घडविले
सह्याद्री सारखा
ज्यांचा पाठीराखा
विश्वामध्ये डंका
वाजे त्यांचा
सह्याद्रीने दिली
लढण्याची हमी
महाराष्ट्र भूमी
धन्य झाली !
🚩
-भरत यादव
Bharat Yadav