🚩
कर्मकांड ज्याला
वाटे धर्म खरा
त्याने पंढरपूरा
येऊ नये!
विवेकाचा ज्यास
पडला विसर
त्याने पंढरपूर
विसरावे!
विस्मरून जाई
संतांची वचने
करू नये त्याने
विठु पूजा!
सत्तासंपत्तीत
आहे ज्यास सुख
त्याने हरी मुख
पाहू नये!
लाज वाटे ज्यास
कष्ट करण्याची
वाट ही वारीची
नाही त्याची
लोकहिताची बा
नाही तळमळ
त्याने गंगाजळ
प्राशू नये!
जनाची मनाची
ज्यास नाही खंत
त्याने भक्तीपंथ
धरू नये!
चंगळवादात
जीव ज्याचा दंग
त्याने पांडुरंग
भजू नये!
जपे निसर्गास
दावी भूतदया
उभा विठुराया
त्याच्या पाठी!
करी खटपटी
सत्तापदांसाठी
त्याचे वाळवंटी
काय काम?
थोतांडास मानी
जो सत्य वचन
त्यास नारायण
कैसा भेटे?
देश समाजाचे
भले ना चिंतती
तयांची संगती
जळो आता
कटेवरी हात
ठेवी जगन्नाथ
स्वार्थांध अभक्त
लोटी दूर!
🚩
-भरत यादव
@bharat yadav