टीव्हीवर महाभारत सिरीयलमधील
द्रौपदीस्वयंवर पाहून
लेकीनं जिज्ञासेनं विचारलं-
प्राचीन काळी त्यावेळीही
मुलीनां
आपल्या इच्छेनुसार विवाह करण्याचा
अधिकार होता काय?
लेकीच्या केसांना
तेल लावत लावत आई म्हणाली-
हे राजांच्या मुलींसाठी होतं फक्त,
बाकीच्यांसाठी नव्हतं
उत्तर ऐकून
लेक क्षणभर मौन राहिली अन्
मग आपल्या शब्दबाणाने लक्ष्य
करत म्हणाली-
प्रत्येक मुलगी ही आपल्या मानाने
राजकन्याच असते
वडील जर राजा नसतील
तर त्यात मुलीचा काय दोष?
आईनं बघितलं,
हे बोलत असताना
लेकीचा आत्मविश्वास
कुठल्याही राजकन्येपेक्षा
तसूभरही कमी नव्हता.
------------+---------------+-------------
मूळ हिंदी कविता
जसवीर त्यागी
Jasveer tyagi
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav