🚩
करावा निर्धार
आता विवेकाचा
राज्य घटनेचा
जाणा अर्थ
हा अविवेकाचा
घालवा काळोख
असू द्या पारख
सत्याचीच
बहूमत नसे
सत्याची बा खूण
विवेकाची जाण
असो जरा
लोकशाही जरी
निकोप व्यवस्था
सजग जनता
हेचि बळ
जनतेचे हक्क
गिळण्या टपले
गिद्ध पिसाळले
एकजात
पैशासाठी ज्यांनी
लाज सोडलेली
मान मोडलेली
पक्षाचीही
सत्ता हीच जणू
साध्य व साधन
दिलेले वचन
विसरती
संविधान राखी
हक्क जनतेचे
बा संविधानाचे
राखा भान
सहिष्णुता खरी
ओळख देशाची
आग विद्वेषाची
पेटू पाहे
कुण्याही धर्माची
नको मक्तेदारी
गाभ्याशी गद्दारी
घडू नये
स्वातंत्र्य समता
न्याय नि बंधुता
हेच बा भारता
तारणार
दुष्ट आणि स्वार्थी
नीच राजकारणी
लोकशाही ज्यांनी
क्षीण केली
सत्ता-संपत्तीची
सुटलेली हाव
फितुरीचा डाव
साधलेला
न्याय प्रशासन
बनले लाचार
आचार विचार
फेकलेले
सत्याचा विजय
होणार शेवटी
असत्याच्या पोटी
असत्यच
निराशेचा जरी
भोवती अंधार
देऊ पाहे धीर
'उल्का' एक
🚩
-भरत यादव
Bharat Yadav