ओमप्रकाश कश्यप

ओमप्रकाश कश्यप

हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक 
ओमप्रकाश कश्यप
यांनी बाल,लघुकथा,कादंबरी,विडंबन,
नाटक,कविता,वैचारिक आदी साहित्यप्रकारात मोलाची 
भर घातली आहे.
आतापर्यंत त्यांची ३३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
'हिंदी अकादमी दिल्ली' आणि 'उत्तर प्रदेश हिंदी संस्थान' यांच्याकडून त्यांना सन्मानित केले गेले आहे.

श्रमजीवी संस्कृतीच्या उत्थानासाठी झटत आलेल्या जगातील आणि भारतातील तत्वचिंतक,महामानवांचे कार्य,विचार,लेखन हीच कश्यप यांच्या समग्र लेखनाची मूळ प्रेरणा होय.
शोषित समूहाची प्राणंतिक वेदना साहित्यामधून मांडण्याबरोबरच श्रमसंस्कृतीला प्रतिष्ठा देणारी राजकीय,सामाजिक व्यवस्था कशी निर्माण होऊ शकेल याचाही ध्यास तसेच चिंतन त्यांनी साहित्यलेखनाच्या माध्यमातून वाचकांपुढे सातत्याने  ठेवले आहे.
घटनाधिष्ठीत मूल्यव्यवस्था समाजात रूजावी,सामाजिक न्यायाबरोबरच स्वातंत्र्य समता,न्याय आणि बंधूता ही मानवी शाश्वत मूल्ये जीवंत राहावीत या हेतू आणि प्रेरणेनेच आपण लेखनरत असल्याचे ओमप्रकाश कश्यप सांगतात.
पुरोगामी विचार आणि विज्ञानवादी जाणीवांची ओळख बालमनाला वेळीच होण्यासाठी बालसाहित्य हे प्रभावी माध्यम असल्याचे ते मानतात.
म्हणूनच बालसाहित्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन गंभीर असायला हवा असा त्यांचा आग्रह असतो.
धार्मिक कर्मकांडापेक्षा वैज्ञानिकतेचा संस्कार भारतातील उगवत्या पिढीवर होण्याची आज खरी गरज असल्याचे कश्यप यांचे प्रतिपादन आहे.
हिंदीतील विविध
नियतकालिके,दैनिकांमधून आधुनिक शिक्षण,मानवी मूल्ये आणि राजकीय घडामोडी,सामाजिक रूढी आदी विषयांवर नियमितपणे त्यांचे विस्तृत लेखन प्रसिध्द होत असते.
आखरमाला या ब्लाॅगमधून ते सामाजिक माध्यमातही सक्रिय आहेत.
प्राचीन मिथककथांकडे पाहाण्याचा नवा दृष्टिकोनच त्यांच्या साहित्यामधून वाचकांना मिळतो.

प्रस्तुत दोन लघुकथांमधूनही त्यांनी देशातील ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजकीय व धार्मिक प्रवृत्तींवर मार्मिक भाष्य करत सामाजिक,आर्थिक प्रश्नांकडे पाहाण्याची निकडही 
अधोरेखीत केली आहे.
----------------------------------------

लघुकथाःओमप्रकाश कश्यप
----------------------------------
अयोध्येच्या वाटेवर 
१.
उतरल्याबरोबर टांगेवाल्यांचा आवाज त्याच्या कानावर पडला-
'अयोध्या...अयोध्या...अयोध्या....'
'शंबूकनगर...शंबूकनगर...शंबूकनगर....'
'अयोध्येला जाणारा टांगा 
जवळ जवळ भरला होता,
तो शंबूकनगरला जाणार्‍या टांग्याकडे वळला--
'तू सुद्धा अयोध्येला चल ना,
खूप पवित्र नगरी आहे.'
'नाही साहेब,
आमच्यासाठी तर आमचे मगहर* हेच काबा-काशी आहे..'टांगेवाला म्हणाला आणि ओरडू लागला,
--शंबूकनगर....शंबूकनगर....
...शंबूकनगर'
एका झटक्यात त्यानं आपलं तोंड फिरवलं,
तो पुन्हा अयोध्येला जाणार्‍या टांग्याकडे आला.
टांगा उतारूंनी भरून गेला होता.
तो येण्यापूर्वीच टांगेवाल्यानं घोड्याला इशारा केला,
घोडा पुढे चालायला लागला.
'थांब....'
त्यानं मागून हाक मारली.
'बाबू! दूसर्‍या टांग्याची वाट बघा,माझा टांगा भरला आहे.'
टांगेवाल्याने लगाम खेचत म्हटले.
'माझे तिथे पोहोचणे खूप गरजेचे आहे.'
'नाईलाज आहे,
बाबू! जनावर आहे,
जास्त प्रवासी पेलू शकणार नाही.'
'हं..चल,
मी स्वतः पाहतो.'
असे म्हणून तो फिरला आणि एका उतारूजवळ जाऊन म्हणाला,'तू कोण आहेस?'
'अयोध्येला चाललो आहे म्हणजे रामभक्तच समजा..'
उतारूने हसत उत्तर दिले.
'मी विचारलं,
कुठल्या जातीचा आहेस?'
'जी मजूराची जात असते,समजा माझीही तीच आहे...'
'अयोध्येला कशासाठी चाललायंस?'
'ज्यासाठी सगळे जात असतात?'
'मंदिराचा शिलान्यास आहे,
माझे तिथे पोहोचणे अत्यावश्यक आहे,मला उशीर होतोय.'
'शिलान्यासासाठी तिथे मी पोहोचणेही फार गरजेचे आहे,
उशीर झाला तर ठेकेदार अर्धी मजूरी कापेल' 
टांग्यात बसलेला व्यक्ती म्हणाला. 
तर त्याला संताप आला.
'ठाऊक आहे,मी कोण आहे.
हे बघ...'
त्याने बगलेत लटकत असलेले जाणवे दाखवले.
ते पाहताच टांग्यात बसलेल्या माणसाच्या चेहर्‍यावर भीती पसरली.
त्यानं आपली अवजारं सांभाळत टांग्यातून उडी मारली.
त्याला पाहून अन्य उतारूही 
पटापटा उतरले.
'तुम्हा सर्वांना काय झालंय...'
टांगेवाल्यानं विचारलं.
'खड्यात गेली अयोध्या...आम्हाला तर मोल-मजूरी करायची आहे.
कुठेही जाऊन राबू.'
सर्वजण एका सूरात म्हणाले.
मग आपापली अवजारं घेऊन, 
ते शंबूकनगरला जाणार्‍या 
टांग्याच्यादिशेने निघाले.
---------
२.
टांगा थेट शंबूकनगरला 
येऊन थांबला.
उतारूंनी उतरून इकडं तिकडं पाहिलं.
चहूबाजूला झोपड्या उभ्या होत्या.
बाकी सर्वत्र ओसाड.
उतारूंच्या चेहर्‍यावर निराशा पसरू लागली--
'अयोध्येत मंदिर उभं राहातंय,
तिथंच गेलो असतो तर काम-धंद्याची ददात नसती.' ,
एकानं म्हटलं.
'जे झालं,चांगलं झालं...',
दूसरा म्हणाला.
'आम्ही इथं करणार काय?'
'इथं कामाची कुठं कमी आहे?चारहीबाजूला कामच काम तर आहे....'
एकजणानं चहूबाजूला पसरलेल्या जमिनीकडे नजर फिरवत म्हटलं.
'मी समजलो नाही'
'आतापर्यंत तर आपण दुसर्‍यांच्या सांगण्यावरून,
त्यांच्यासाठी कष्ट उपसत आलो आहोत.
इथं राहून आपल्यासाठी आणि एकमेंकाकरिता राबूयात'
'तिकडं बघा.
त्या बोर्डावर काय लिहीलं आहे ते.'
एकजण रस्त्याच्या दूसर्‍याबाजूला बघत ओरडला--
'स्वर्ग मजूरांच्या पायाखाली वसतो.'
'ही गोष्ट फक्त शंबूकनगरीत खरी होऊ शकते,
अयोध्येत नाही.'
त्या सर्वांच्या तोंडातून एकाचवेळी बाहेर पडलं हे वाक्य.
....याबरोबरच त्यांचे चेहरे 
आनंदाने उजळून निघाले.
---------------------

*मगहर-संत कबीर यांची समाधी उत्तर प्रदेशात याठिकाणी आहे.
----------------------
मूळ हिंदी लघुकथा
ओमप्रकाश कश्यप
Omprakash Kashyap

मराठी भाषांतर
भरत यादव
Bharat Yadav
------------------------
पूर्वप्रसिद्धी
पाक्षिक
'आपले वाङमय वृत्त'  
आॅगस्ट २०२०.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने