- अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली
🌿
दोन वर्षांपूर्वी सोलापूरात स्थायिक होण्याचा निर्णय घेऊन शांतपणे आपले जीवन व्यतीत करीत असलेले प्रसिद्ध निसर्गलेखक आणि अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांची भेट होण्याची संधी नुकतीच चालून आली.
मराठीतील ज्येष्ठ लेखक भगवंत क्षीरसागर जे नांदेडमध्ये राहातात,मागील काही महिन्यांपासून सोलापूरात येणार असल्याचे आणि त्यावेळी चित्तमपल्ली सरांची भेट घेण्याची इच्छा असल्याचे सांगत होते.जगप्रसिद्ध निसर्गलेखक,विचारवंत डेव्हिड थोरो यांचे इंग्रजीतून मराठीत अनुवादीत केलेले पुस्तक केपकाॅड हे चित्तमपल्ली सरांना भेट देण्याची इच्छा क्षीरसागर सरांनी व्यक्त केली होती.चित्तमपल्ली सरांचे पुतणे श्रीनिवास यांच्याशी संपर्क झाला,त्यानंतर भेटीची वेळ घेतली,सायंकाळी पाच ते सात या वेळेतच सर भेटतात असे कळले.त्यानुसार साडेपाचला आम्ही अक्कलकोट रस्त्यावरील एका प्रसन्न सोसायटीत पोहोचलो.निवासस्थानी आमचे स्वागत करण्यात आले.काही मिनिटातच अरण्यऋषींची स्वारी डुलत डुलत हातातली आधाराची काठी टेकत आमच्या समोरील खुर्चीत स्थानापन्न झाली.मग सुरू झाला अनौपचारिक गप्पांचा फड.
ज्या लेखकाची जंगलातल्या संपन्न अनुभवांची पुस्तके वाचून आणि त्यांची पक्षीनिरिक्षणावरील व्याख्याने ऐकून मी शाळकरी जीवनात असताना फाॅरेस्ट आॅफिसर होण्याचा संकल्प सोडला होता त्या लेखकासोबत आता मुक्तपणे चर्चा करण्याची संधी मिळाली होती.आजकाल पुस्तकं वाचलीच जात नाहीत अशी खंत चित्तमपल्ली सर आपल्या बोलण्यातून पुनःपून्हा व्यक्त करीत होते.डोईवरचे केस अद्यापही चंदेरी झालेले नाहीत,दाढी मात्र पांढरी शुभ्र आहे.त्यांच्या निर्दोष दृष्टीबद्दल सर्वात जास्त आश्चर्य वाटले.आजकाल शालेय जीवनापासून डोळ्यांना चष्मा लागत असताना अरण्यऋषी मात्र आमच्यापुढे चष्म्याविना क्षीरसागर सरांनी भेटीदाखल दिलेले पुस्तक चाळत होते,तळपृष्ठ वाचत होते.याचे रहस्य सांगतानाही ते आम्ही वाचत नसल्याचीच तक्रार नोंदवत होते,मी हे सगळं पुस्तकात,आत्मचरित्रात लिहिलं आहे असे म्हणाले.नियमित निरोगी दिनचर्या,योग्य आहार आणि व्यायाम,प्राणायम इत्यादी गोष्टींनी आपण वयाच्या ब्याण्णव्यावर्षीदेखील निरामय जीवन जगू शकतो असे सरांनी सांगितले.मुलांना मोबाईलची सवय लागता कामा नये,त्यातून येणार्या रेडिएशनमुळे त्यांच्या मेंदूवर घातक परिणाम होत असतो,परिणामी त्यांची विचारशक्ती क्रियाशील राहाण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात,असे आयुष्याची तब्बल पन्नास वर्षे जंगलात संशोधनासाठी घालवलेले चित्तमपल्ली सर सांगत होते.
एकुलता एक असल्यामुळे आईवडिलांनी मला जंगल अधिकारी होण्यासाठी परवानगी नाकारली असे सांगताच दिलखुलास हसून सर म्हणाले,प्रत्यक्ष ट्रेनिंग खूप खडतर असतं,त्यातून जीव वाचला तर आपली निवड होऊ शकते.पण हे सगळे अवघड टप्पे पार करून चित्तमपल्ली सरांनी एक उत्तम वन अधिकारी म्हणूनच नव्हे तर अपार कष्टाने संशोधन करून तज्ज्ञ संशोधक म्हणूनही लौकिक प्राप्त केला,मान्यता मिळवली. नागपूरातल्या आणि जंगलाजंगलातल्या लोकांनी आपल्यावर प्रचंड प्रेम केल्याचे सांगताना त्यांचा कंठ जड झाला होता.पण मी आयुष्याच्या अखेरीस सोलापूरात व्यतीत करण्याच्या आपल्या संकल्पावर ठाम होतो म्हणून आज सोलापूरात आहे.आपण पक्षी आणि जंगल संशोधनासाठी अनेक भाषा शिकलो असून दहा भाषांचे आपण जाणकार असल्याचे त्यांनी नमूद केले,संस्कृतचे शिक्षण घेण्यासाठी नांदेड आणि इतर ठिकाणी आपण राहिल्याचे तसेच गुरूजनांचे मन जिंकल्याचे ते सांगतात.गुरूच्या मनात आपण स्थान निर्माण केले,त्यांचा आदर केला तरच गुरूदेखील ज्ञान देण्यात हयगय करीत नसतात,असा आपला अनुभव त्यांनी नोंदविला.दहा भाषांमध्ये पारंगत असताना मग मराठी भाषेतच आपण आपले समग्र लेखन का केले? असा प्रश्न विचारता ते प्रसन्न स्मित करीत म्हणाले,मायमराठीला मी माझ्या लेखनातून-संशोधनातून दहा लाख शब्द दिले आहेत बरं! त्याबद्दल समस्त मराठीभाषिक जनता त्यांची कृतज्ञच आहे यात मुळीच शंका नाही.
तरूणपिढीला उद्देशून अरण्यऋषी चित्तमपल्ली म्हणतात,तुम्ही जंगलातली असीम शांतता नीटपणे अनुभवायला हवीय.शहरातल्या कोलाहलापासून दूर अरण्यात काही दिवस घालवले पाहिजेत! पण टिव्ही,मोबाईल अशा अनेक उपकरणांचे आपले मन आणि जीवन गुलाम झाले असल्याने जंगलात राहाण्याची मजा आणि सुख आपण हरवून बसलो आहोत.
आदिवासी जनतेविषयी आत्यंतिक जिव्हाळ्याने बोलताना आयुष्याची अनेक वर्षे जंगलाशी एकरूप झालेले चित्तमपल्ली सर भारावून गेले,आणि म्हणाले,आदिवासी कुणाचाही हक्क हिरावत नाहीत,कुणावर आक्रमण करीत नाहीत,नसतात! मग त्या अनुषंगाने प्रश्न विचारला,तरी पण सरकार विकासाच्या नावाखाली त्यांना उदधवस्त का करीत असेल? तर उसळून म्हणाले,विचारा की प्रश्न सरकारला? लेखणीतून.मग बघा काय होतं ते! तुमच्यामागे काय काय सोडतात ते! इडी आणि आणखी काय काय!!
याप्रसंगातून एकच बाब स्पष्ट झाली ती म्हणजे झाडांच्या दाट जंगलात उभी हयात घालवून आज शहरातल्या सिमेंटच्या जंगलात ते राहात असले तरी जंगलवासी आदिवासी जनतेविषयी त्यांच्या मनात आजही तितकीच आपुलकी,प्रेम आहे.याबद्दल वेळोवेळी आपल्या पुस्तकांमधूनही ती बाब अधोरेखीत केली असल्याचे ते सांगतात.
निसर्गात रमलेले एक श्रेष्ठ संशोधक म्हणून मारुती चित्तमपल्ली सरांविषयी नेहमीच माझ्या मनात अतीव आदर राहिला आहे,अपवाद फक्त कावळ्याबद्दल त्यांनी मांडलेली भूमिका अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी असल्याच्या मताशी सहमत राहिलो होतो,पण त्यामुळे त्यांच्या अपार अस्सल संशोधनाचे महत्व मुळीच कमी
होत नाही.आज या वयातही चित्तमपल्ली सरांची ज्ञानसाधना,शब्दसाधना अविरतपणे सुरूच आहे.घरामध्ये ग्रंथांनी भरलेली कपाटे दिसतात.सुरूवातीपासून आपणांस डायरीलेखनाची सवय असल्याचे सांगताना डायरीतील मजकूर इतरांनी वाचावयाचा नसतो,असा संकेत असल्याची आठवण करून दिली! निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे,माणूसच निसर्गविरोधी वागत असल्याची खंत ते व्यक्त करतात. नव्यापिढीने वाचन,संशोधन करताना जंगलातील पशूपक्षी निसर्ग,तेथील आदिवासी जनता यांच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे,अशी माफक अपेक्षा अरण्यऋषी व्यक्त करीत होते.येणार्या पिढ्यांसाठी आपण प्रदूषण शिल्लक ठेवणार आहोत की निसर्गाचा अस्सल वारसा,हे ठरविण्याची वेळ येऊन ठेपली असल्याचे अरण्यऋषींशी झालेल्या छोटेखानी वार्तालापातून प्रकर्षाने जाणवले.निस्सिम निसर्गपुत्राला अभिवादन करून आम्ही बाहेर पडलो.
निसर्गाशी तादात्म्य पावणे म्हणजे काय असते,याची जिवंत प्रचिती लोकप्रिय साहित्यिक,संशोधक मारुती चित्तमपल्ली यांच्या भेटीतून
आली आणि आम्ही काही काळ तरी अनुभवकथनातून साक्षात निसर्गसान्निध्याची परम अनुभूती घेतली.
🌿🌿🌿
-भरत यादव
Bharat Yadav
----------------
एक भेट अरण्यऋषी मारुती चित्तमपल्लींशी…
https://baimanus.in/maharashtra-article-on-the-famous-naturalist-maruti-chitampalli-and-their-work/