नवरात्रोत्सव म्हणजे आदीमायेचा
म्हणजेच बाईपणाचा अर्थातच बाईच्या माणूस असण्याचा जागर.
प्राचीन काळापासून ते आजपर्यंतच्या मानवी जीवनाच्या विशाल काळपटावर उमटलेला स्त्रित्वाच्या
अस्तित्वाचा, स्त्री-जाणीवेचा नैसर्गिक हुंकार शब्दाच्या चिमटीत पकडण्याचा प्रयत्न जगभरातील प्रतिभावंत स्त्रियांनी आजवर केलेला आहे.
भारतीय संविधानाने स्त्रीला प्रदान केलेला माणूसपणाचा हक्क आणि अधिकार मोडीत काढू पाहाणार्या पुराणमतवादी शक्ती पुष्ट होत चाललेल्या आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करू पाहाण्याच्या या काळात स्त्रीमनाच्या सहज भावना शब्दांच्या माध्यमातून
वेगवेगळ्या सामाजिक स्तरातून लिहीत आलेल्या हिंदी भाषेतील कवयित्रींनी कशा प्रकट केल्या आहेत,हे अनुवादाच्या माध्यमातून मराठी रसिक वाचकांपुढे ठेवण्याचा नवरात्रीच्या निमित्ताने केलेला हा
विनम्र प्रयत्न.
पहिली माळ
पूनम वासम
समाजशास्त्र आणि अर्थशास्त्रात एम.ए. असलेल्या पूनम वासम यांचे सद्या छत्तीसगढ राज्यातील बस्तर विद्यापीठात संशोधनकार्य सुरू आहे.छत्तीसगढ येथील विजापूर येथील शासकीय शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या पूनम यांच्या कविता आदिवासी जनतेच्या जगण्यामरण्याचे तथ्य प्रभावीपणे मांडत आल्या आहेत.त्यांच्या कवितांमधून आदिवासी जीवनशैलीचे विविध पैलू सहजपणे व्यक्त झाले आहेत.विशेषकरून आदिवासी स्त्रियांच्या भावनांची घुसमट शब्दबद्ध करताना त्यांची लेखणी विलक्षण धारदार होताना दिसते.आजवर हिंदी काव्यलेखन क्षेत्रातील अनेक सन्मान त्यांनी पटकावले आहेत.'मछलियाॅं गायेंगी एक दिन पंडुमगीत' हा त्यांचा अलिकडेच प्रकाशित झालेला कवितासंग्रह सद्या चांगलाच चर्चेत आहे.या संग्रहातील सर्व कविता बस्तर मधील लोकसंस्कृती आणि लोकचळवळीवर फोकस करणार्या आहेत.शेकडो वर्षांपासून निबिड जंगलातून मोहफुले वेचत आलेल्या आपल्या पूर्वजमातांच्या दुरड्या-टोपल्यांचे रीतेपण आपल्या भाषेने भरून टाकण्याचा संकल्प पूनम वासम आपल्या कवितालेखनातून करू पाहात आहेत.'माझे पूर्वज कैकदा थकून भागून मरून गेले असून मी त्यांना पाहाते आणि आपल्या भाषेमधून किंचाळत असते'असा वेदनादायी भाव त्यांच्या कवितेचा आहे.जो वाचकांना अंतर्बाह्य हलवून सोडण्यास पूरेसा आहे.
---------------
१.
बायका ज्या चांगल्या नसतात
बायका ज्या चांगल्या नसतात त्या
घाईघाईत आटपून येत असतात स्वयंपाकपाणी
सोडून येतात फ्रीजमध्ये
तिंबलेल्या कणकेचा काही भाग
जेव्हा पोहोचायचं असतं त्यांना कुठेतरी
नेमके त्याचवेळी जेव्हा
खायच्या असतात सासर्याला
गरम गरम भाकरी
बायका ज्या चांगल्या नसतात
त्या भांडून येतात बाळंतवाॅर्डात
हासडतात घाण-घाण शिव्या
झाडून पुसून आपली नाळ
उठून उभ्या राहतात
मुठीत पकडून वितभराची नवी ओटी
नेमके त्याचवेळी
ठिकठिकाणी भेगाळलेल्या
उजाड भूमीचं सिंचन करायचं असतं
स्वाती नक्षत्राच्या थेंबांनी,
बायका ज्या चांगल्या नसतात
की ज्या झाडत असतात
हातपाय
सौदा करीत असतात पाताळलोकातील पर्यांशी
रेवड्यांप्रमाणे वाटून येत असतात
आपली सारी सुखं
त्यांना फुलपाखरांशी खेळणं
आणि फुलांप्रमाणे दरवळणं
आवडतं
नेमकं याच्या उलट
नको असतं काहीही असलं
ज्यात भरलेला असतो रंग
बरोब्बर त्याचवेळी कुठलासा कुंभार
उकळवत असतो रेताड माती
मिसळत असतो त्यात धातूचा चुरा
ज्यामुळे तयार होऊ शकेल भक्कम घागर
त्या बायकांसाठी
ज्या चांगल्या नसतात.
-----
२.
लोकशाहीच्या अनौरस अवलादी
आम्ही लोकशाहीचा असा किस्सा
आहोत
ज्यांना तेव्हा मोठ्या उत्सुकतेने ऐकलं जातं
जेव्हा झोपेत पेंगत असते सबंध लोकशाही
किंवा तेव्हा जेव्हा बुद्धीबळाचे सर्व प्यादे
मारले गेलेले असतात
कधी कधी तेव्हा जेव्हा हात रिकामे असतील आणि खुर्चीचा पाया डगमगू लागलेला असतो
तेव्हाही जेव्हा संपत चाललेली असते
तमाम कथांमधली रंजकता
किंवा तेव्हा जेव्हा असेच बसलेले रिकामटेकडे कुणी
नव्या कहाणीचे पात्र शोधायचे असेल
डोक्यावर असते येणार्या निवडणूकीचे ओझे
झाडून पुसून पुन्हा एकदा
उघडले जात असते
आमचे पोथीपुराण
जसे अखंड रामायणाला एखाद्या नेमक्या उपायाप्रमाणे उपयोगात आणले जात असते
श्रमपरिहाराकरिता
बरोब्बर तसेच भात्यातील अखेरच्या बाणासारखे
शिल्लक राखले जात असते आम्हाला
आणि एकदा पुन्हा
लोकशाहीच्या अनौरस अवलादींप्रमाणे
एखाद्या इंग्रजी लेखकाच्या 'जंगल बुक'च्या मुखपृष्ठावर
'ट्राईब आॅफ बस्तर'च्या नावाने फेमस होऊन जातो आम्ही
या काळात फेमस होण्यापेक्षा मोठी
गोष्ट ती कोणती असू शकते?
ते प्रत्येक निवडणूक जिंकून प्रसिद्ध होत असतात
आणि आमची प्रसिद्धी ही की आम्ही कधी जिंकलेलोच नाही.
-----
३.
खटला
हजारो झाडांच्या हत्येचा खटला
गुदरला उरल्यासुरल्या पानांनी
बोलाविण्यात आलं त्या मारेकर्यांना
देण्यात आली हातात गीता
शपथ पण खाल्ली भर न्यायालयात
की जे काही बोलू खरे तेच बोलू
बोललेही तेच जे खरे होते!
न्यायालयाने पण मान्य केले की
झाडांची हत्या काही विचारपूर्वक आखण्यात आलेले षडयंत्र नव्हते
आणि ना कुठला कट रचला होता मारेकर्यांनी
चूक तर झाडांची होती ज्यांनी केला होता प्रयत्न
धरणीला सूर्याच्या उष्णतेपासून वाचविण्याचा
मुर्ख होती सारी झाडे
समजून बसले स्वतःला
चंद्राच्या मौन किरणांच्या भाषेचे सर्वात मोठे अनुवादक!
होता ढगांसोबतदेखील यांचा
घरोबा
म्हणून पेरून येत असत धरतीच्या ओटीपोटात
अगणित छोट्या-छोट्या थेंबांना
निळ्या समुद्राच्या शेतीसाठी
मुर्ख होती सगळी झाडे
काॅंक्रीटच्या जंगलात उगवू पाहात होती गुलमोहोराची फुले
मधमाशांबरोबर यांचे चांगले जमत असे
म्हणून वाटून येत असत फुलपाखरांना
त्यांच्या वाट्याचे अन्न-पाणी
आपल्या हवेच्या बदल्यात
आमचे श्वास ठेवू इच्छित होते गहाण
म्हणून त्या सर्व झाडांना उखडून फेकून दिले
ज्यांची मूळं जोडली गेली होती आमच्या वाट्याच्या मातीशी!
मुर्ख होती सगळी झाडे
यांना कदाचित ठाऊक नसावे की
जिवंत राहाण्यासाठी आता कृत्रीम हवाच पुरेशी आहे!
फांदीपासून वेगळे झालेल्या
पानांनाही
एवढी अक्कल कुठली की
करतील विरोध झाडांच्या हत्येचा
बरे झाले असते जर वेळेआधीच सगळी झाडे बसली असती उपोषणाला,
काही बोलल्या-ऐकल्याविना
------
४.
तुला चुंबून
तुझ्या भाळाला चुंबून
एके दिवशी पृथ्वीला चुंबावे म्हणते
ज्यामुळे तुझ्या भाळावरच्या
सुपीक भूमीची चव
चाखू शकतील धरतीवरील
ती तमाम लेकरं
ज्यांच्या जीभेला ठाऊक नाहीए
चवी-चवींमधला फरक
तुझ्या माथ्यावरून निथळणारा घाम
नांगराचे अनुकूचीदार टोक आणि
धरणीच्या मऊश्शार मातीच्या मध्ये
एखाद्या सुरक्षाकवचाप्रमाणे आहे
तुझा माथा चुंबणे
माझ्यासाठी धरतीवरती प्रीतिफुलांच्या
पहिल्या बहराचे फुलून येणे होय.
-----
५.
उत्तर
आता नाही जाणार अनिता शाळेला
नाही चिवचिवणार घराच्या अंगणात
एखाद्या चिमणीप्रमाणे
नाही वेचणार मायसोबत मोहाची फुलं
नाही तोडणार तेंदूपत्ता मैत्रिणींसोबत जंगलात
उड्या मारत आंघोळ नाही करणार अनिता गावातल्या तलावात
ऐकू नाही येणार
आता तिचे खळखळून
हसणे जत्रेत-बाजारात-हाटात
नाही खेळणार यावर्षी
रंगपंचमी भावासोबत
गावातल्या चौकात
आता नाही येणार अनिता
माघारी कधी
बस्तरमधल्या या हिरव्या खोर्यात
'मोटियारी' बनण्यास
राहिली नाही अनिता
तिला मारण्यात आले कोटा बाजारात
प्रेशर बाॅम्बने उडाल्यात तिच्या शरीराच्या चिंधड्या
हात एकीकडे आणि पाय दुसरीकडे जाऊन पडलाय
रक्तबंबाळ अनिताचा देह
किती तडफडला असेल,
किती तळमळले असेल तिचे मन
जाण्यापूर्वी किंचाळून किंचाळून
रडला असेल तिचा आत्मा
उभे राहिले असतील तिच्या मेंदूतसुद्धा
कैक अनुत्तरीत प्रश्न
कुठंवर अशीच निरागसांच्या रक्ताने
होत राहील बस्तरची भूमी लाल
आहे कुणापाशी या प्रश्नांचे उत्तर
बोला,बोला ना कुणी काही तरी बोला?
------
मूळ हिंदी कवितांचा
मराठी अनुवाद आणि टिपण
भरत यादव,
९८९०१४०५००
https://baimanus.in/maharashtra-article-and-poems-of-adivasi-and-dalit-women-on-the-occasion-of-navratr-festival/