अजिंठ्यात ठायी ठायी
मला बुद्ध भेटलेला
डोंगराच्या कातळात
जणू धम्म नटलेला
प्रिय तथागता तुला
प्रेममयी जय भीम
करुणेच्या पालवीने
आता कंठ दाटलेला
जगातल्या विद्रूपांशी
लढा सुरूच अजूनि
आम्ही थांबणार नाही
आलो तुला सांगायला
'फुले-शाहू-बाबां' सवे
आहे तुझीही सोबत
माथ्यामध्ये आहे धम्म
निरंतर पेटलेला!
अशा विषारी युगात
वैरी प्रबळ प्रमत्त
तुझ्या सम्यक वाटेने
तांडा आता सुटलेला
तुझीच बा ही प्रेरणा
आम्ही पहाट निर्मिली
तथागता तीच तुझ्या
हातावर ठेवलेली
बोधिसत्वाची भुरळ
अजिंठ्याच्या पहाडाला
उजळल्या दाही दिशा
नि अंधार मिटलेला
तंद्री उत्कट मनात
बुद्ध भेटतोच मग
चिंब करुणार्त अश्रू
शब्द वन्ही पेटलेला
बुद्ध वेदनेचा टाहो
बुद्ध करुणेचा ठेवा
बुद्ध ज्ञानाचा प्रवाह
कधीच ना आटलेला
ज्याचा विवेक जागृत
त्याला पाहावया मिळे
बुद्धऋतूचा सोहळा
पाषाणात थाटलेला
अजिंठ्यात ठायी ठायी
मला बुद्ध भेटलेला
मनोहारी सौंदर्याचा
दृष्टीशोध फिटलेला!
-भरत यादव
Bharat Yadav.