आदरणीय यशवंत मनोहर सरांची भेट
आणि अजिंठ्यामधली बुद्धमयता
🍁
अलिकडेच म्हणजे आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात
विदर्भ-नागपूर सहल करून आलो.निमित्त होते आदरणीय
डाॅ.आ.ह.साळुंखे सरांना नागलोक सेंटर कडून जाहीर झालेला पुरस्कार स्विकारण्यासाठी प्रतिनिधी म्हणून मित्रवर्य राकेश साळुंखे उपस्थित राहाण्याचे,म्हणून आम्हीही निघालो त्यांच्यासमवेत.
चिखलदरा-मेळघाट चा अप्रतिम निसर्ग अनुभवून
डोळ्यात-हृदयात साठवून धम्मप्रवर्तनदिनाच्या आदल्यादिवशी दीक्षाभूमी नागपूरात दाखल झालो होतो.
आदरणीय डाॅ.यशवंत मनोहर सरांना
भेटण्याची ओढ होती.लुम्बिनी निवासस्थानाबाहेर येऊन
सर आमची प्रतिक्षा करीत होते.मग जवळजवळ तासभर
मनोहर सरांसोबत गप्पांचा फड रंगला.सातार्यात मागे अनेक वर्षांपूर्वी आ.ह.सरांशी झालेल्या भेटी-गाठीसह अनेक आठवणींना मनोहर सरांनी लख्ख उजाळा दिला.आपल्या नविन लेखन प्रकल्पांविषयी,
आगामी पुस्तकांविषयी मनोहर सर
भरभरून बोलत होते,मी ते जीवाचे कान करून ऐकत होतो,आपली नवी कोरी पुस्तके भेटीदाखल दिली त्यांनी.
आपल्या राजकीय आणि सामाजिक-वैचारिक भूमिकांवर
कायम ठाम असणार्या मनोहर सरांच्या प्रत्यक्ष भेटीतून
गप्पांमधून मोठी ऊर्जा मिळाली,यापूर्वी २०१५ साली
लुंबिनीला येणे झाले होते,त्यावेळी सोबत लेखक आणि
गांधीविचाराचे अभ्यासक चंदूभाऊ वानखडे होते.नंतर
मनोहर सर पुणे शहरात पत्रकार,संपादक,लेखक संजय आवटे यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी आले होते,तेव्हा भेटलेले,त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवारही समारंभात
होते.त्यानंतर आता निवांतपणे ही भेट झालेली.
गप्पा आणि भेट संपूच नये असे वाटत होते,पण उठणे भाग होते,मनावर दगड ठेऊन मी मनोहर सरांचा निरोप घेतला.
दूसर्या दिवशी नागपूरातला कार्यक्रम आणि मित्रांच्या गाठीभेटी संपवून आम्ही अजिंठा पाहाण्याच्या
ओढीने शेगाव-बुलडाण्याच्या दिशेने जातोय,हे समजताच
कवीश्रेष्ठ यशवंत मनोहर सरांनी बुद्धभेटीच्या ओढीने अतिशय तरलपणे मला एक नितांतसुंदर कविताच धाडून
दिली,जणू आम्ही नव्हे तेच अजिंठ्याला निघालेत!
त्यांच्या या काव्यसंवादानेच मलाही अजिंठ्यातली
बुद्धमयता अनुभवून काही ओळी स्फुरल्या ज्या मी मागेच फेसबुकवर शेयर केल्यात.
पुढे.....
मनोहर सरांनी साधलेला तरल बुद्धसंवाद,
नव्हे एक शब्दलावण्यशिल्पच,
जणू अजिंठ्याच्या प्राचीन गुफेमधले कुठल्याशा!
🍁🍁🍁
------------
प्रिय भरत,
पाऊस आहे इकडे ?
काळजी घ्या!
*
अजिंठ्यात बुद्धाची भेट घ्या.
बुद्धाला माझा जयभीम सांगा.
*
आमचं सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विद्रूपांशी युद्ध
सुरूच आहे,आम्हीही थांबणार नाही,
हे सांगा बुद्धाला.
*
फुले शाहू आंबेडकरांसोबत तूही असतोसच आमच्या माथ्यात हे
सांगा बुद्धाच्या कानात.
*
सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशी सर्वच पर्यावरणं आमच्या जीवावर उठली
आहेत आज हा निरोप सांगा बुद्धाला!
*
आपण निर्माण केलेली पहाट बुद्धाच्या हातावर ठेवून त्याला सांगा , तुला देण्यासारखं हे एवढंच आहे आमच्याजवळ!
हे विनम्रपणे सांगा बुद्धाला.
*
आणि येताना बुद्धाचं थोडं मन माझ्यासाठी आणायला विसरू नका...
*
एवढं कराल भरत माझ्यासाठी?
तुमचा,
यशवंत मनोहर
६ ऑक्टोबर २०२२
*
भरत ,
मनात उत्कट तंद्री उगवली की बुद्ध भेटतोच मला लिहिता लिहिता. मस्तकावर हात ठेवतो तो माझ्या प्रतिभेच्या!
*
आसवांनी भिजलेली करुणा माझ्या शब्दांना शिकवते जीवन!
शिकवते माणसांच्या मनांचं जंगल !
*
शब्दांचे ओले डोळे मग माझ्या
ओल्या डोळ्यांसोबत शब्दांशिवायच बोलत राहतात.
Photo Click
by Atul Kadam