अगा,फाटलं आभाळ

अगा,फाटलं आभाळ

अगा,फाटलं आभाळ!

अगा,फाटलं आभाळ
गेलं आयुष्य नासून
आता अस्मानी संकट
झाला पाऊस दुश्मन

दैना कुणब्यांची सदा
करविती ठरवून
कधी निसर्गाचा कोप
कधी मुर्दाड शासन

तुम्ही झाले का मालक 
चार दिडक्या धाडून?
खातो कष्टाची भाकर
घाम मातीत गाळून

पर्जन्याच्या देवा सांगा
काय चूकले आमचे
दिवाळीत शिमगा बा
कसा दिला पाठवून

हातातोंडाशी आलेला
घास घेतो हिरावून
कधी करपते पीक
कधी पाण्याचं ईघीन

आम्ही पोशिंदे राष्ट्राचे
राखू भूमीशी इमान
बांडगुळापरी कधी 
नाही होणार कृतघ्न

शब्द कोरण्याची वेळ
गेली कधीची सरून
जित्या कुणब्याची गाथा
कधी घेणार ऐकून

तुझ्या हसर्‍या छबीचा
होवो आता जाळभात
त्या दगडी काळजात
माझा पोचावा आकांत!
             -भरत यादव
          Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने