बळीचं राज्य येवो!
🌿
अजूनही बळीराजा
जातो आहे फसवला
कपटाने वामनाने
पाताळात ढकलला
सारी व्यवस्था-यंत्रणा
नासवली वामनाने
कष्टकरी माणसाचा
वाटा हक्काचा लाटला
काळ्या आईची लेकरे
तरसती जन्मभर
राब राबती तरीही
दाम मिळेना घामाला
धनदांडग्यांची सत्ता
दलालांचा बडेजाव
मूळ मालक भूमीचा
आयुष्याला विटलेला
मूठभरांच्या हिताचा
धर्म मनुचा अन्यायी
कोंभ कोंभ प्रतिभेचा
येथे नित्य करपला
माणसाच्या उत्थानाचा
ध्यास सकलांना हवा
बुद्ध-बळीच्या वाटेने
माझा भारत चालावा
🌿
-भरत यादव
Bharat Yadav