एक झळाळता,घमघमता दिवस!
काल अठरा आॅगस्टला मुंबईत होतो.
निमित्त एकच,पाटण्याचे कवीमित्र
रंजीत वर्मा यांच्या समवेत
ज्येष्ठ कवीवर्य वरवरा राव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणे
आणि मनसोक्त गप्पा छाटणे!
तर ठरल्याप्रमाणे आम्ही जीवंत दंतकथा बनलेल्या
कवीश्रेष्ठांच्या घरी जमलो,
रंजीतभाई पाटण्याहून व्हाया सुरतमार्गे तर
ज्येष्ठ पत्रकार,अनुवादक आणि बहूभाषाकोविद लेखक,कवी तुषारकांती नागपूरहून आणि मी सोलापूराहून असे तिघे होतो.
तुषार कांती यांनी व्ही.व्ही.सरांच्या पुस्तकाचा तसेच इतर साहित्याचा हिंदीत अनुवाद केला आहे.त्यांचे आडनाव भट्टाचार्य म्हणजे ते मूळचे बंगाली पण जन्म हैद्राबादचा,
आता वास्तव्य नागपूरात,
अशाप्रकारे पाच-सहा भाषा बोलू-लिहू-वाचू शकतात तुषारकांती.
व्ही.व्ही. सरांबरोबर त्यांच्या पत्नी राहातात,ज्या
सरांचे चाहते,कार्यकर्ते,
विचारअनुयायी यांच्यात हेमाक्का म्हणून सुपरिचीत आहेत,
दुपारचे जेवण आणि न संपणार्या गप्पा तसेच नव्या पिढीतील लिहित्या कवी-लेखकांशी राव सरांचा फोनवरून संवाद यात वेळ कसा निघून गेला हे कळले सुद्धा नाही.
हेमाक्कांच्या हातचे जेवण जेवून मने तृप्त झाली.अस्सल तेलुगू संस्कृतीतील चविष्ट पदार्थांनी अन्नपूर्णेची थाळी सजली होती,
त्याला मातेच्या ममतेची चव होती!
आपल्या सक्रियतेने सांस्कृतिक,धार्मिक आणि राजकीय
मुखंडांच्या,सत्ताधार्यांच्या डोळ्यात खुपत असलेल्या एका क्रांतिकारी कवी,विचारवंताशी झालेल्या मनमोकळ्या गप्पांमुळे माझ्या उरात नवी ऊर्जा भरली असल्याची भावना दृढ झाली,आणखी प्रेरणा प्राप्त झाली.
भीमाकोरेगावप्रकरणी
विरोधी विचाराच्या अनेक लेखक,कवी,पत्रकार,कार्यकर्ते,गायक,कलावंत यांना व्यवस्थेने तुरूंगात डांबले आहे,खोटारडे आरोप लादून त्यांच्यावर खोटेपणाने केसेस गुदरण्यात आल्यात,त्यातून त्यांचा मानसिक आणि शारीरीक छळ केला जातो आहे.वय अवघे ब्याऐंशी असलेले वरवरा राव सर सध्या वैद्यकीय जामिनावर आहेत.पण मुंबईतच राहाण्याचे त्यांच्यावर निर्बंध आहेत.महाराष्ट्रापुरती जरी मुभा मिळाली असती तर तेलंगणा राज्याशेजारच्या नांदेड जिल्ह्यात राहाता आले असते,घरापासून दूर राहून अनेक वर्षे झाली याची चुटपूट
त्यांच्या बोलण्यातून जाणवत राहिली.
या देशातल्या कष्टकरी,कातकरी,शेतकरी,मजूर,
आदिवासी यांच्या हक्क-अधिकारांसाठी संवैधानिक चौकटीत राहून लढा देणे देखील आज व्यवस्थेच्या दृष्टीने मोठा गुन्हा ठरतो आहे,यापुढील काळ तर अशा जिवंत आणि सळसळत्या रक्ताच्या कार्यकर्त्यांसाठी आणखी बिकट होत जाणार असल्याचे संकेत आहेत.
व्ही.व्ही.सर जुन्या आठवणींमध्ये रमले होते,अफाट उत्साहाने भरभरून बोलत होते,जुलमी सत्तेने त्यांच्यावर बहिष्कार टाकणे एकवेळ आपण समजू शकतो पण ज्या विचारासाठी हा क्रांतीकारी कवी आजही न्यायालयीन लढा लढत आहे,
गेंड्याच्या कातडीशी झुंज घेत आहे,
व्यवस्थेला धडका मारत आहे,
त्या विचाराच्या आपले म्हणवणार्या कार्यकर्त्यांनीही त्यांच्यापासून अनेक हात लांब राहाणे ही बाब अनाकलनीय आहे.खटकणारी आहे.वेदना देणारी आहे.
चळवळीसाठी आपले प्राण तळहातावर घेऊन लढत असलेला हा वयोवृद्ध योद्धा कुठे आणि नोकरी,करीयर,पैसा,प्रतिष्ठा,पुरस्कार यांच्या कच्छपि लागलेले आणि मग्रूर सत्तेच्या डोळ्याला डोळा भिडवण्याची मानसिक,बौद्धिक हिंमत,ताकद हरवून बसलेले लोक कुठे?
अशी एक तुलना मनात उगीचच चमकून गेली.
काॅम्रेड म्हणजे नेमके काय आणि कोण? याची पुनर्व्याख्या करण्याची आज गरज निर्माण झालीय का? असेही क्षणभर वाटून गेले,असो.
प्रत्येकाने आपापल्या पातळीवर
देशातल्या फॅसिस्ट प्रवृत्तींविरोधात लढत राहाणे ही आज काळाची गरज बनलेली आहे.पण घर,दार,कुटुंबीय असे सर्वच्यासर्व सोडून अज्ञातवासात जगत असलेल्या लढाऊ योद्ध्याच्या
स्वाभिमानी बाण्यास कडक सॅल्युटच.
अशी लढाऊ बाण्याची,
ताठ कण्याची,
कणखर मनाची हीच माणसे उद्या आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी इतिहासातले प्रेरणास्त्रोत बनतील,
आदर्श बनतील,
एका सत्यासाठी आपला जीवच नव्हे तर सर्वस्व पणाला लावणारे म्हणून ओळखले जातील.
कोर्ट,पोलिस,चौकश्या अशा भानगडी मागे लागतील की काय या भीतीने पछाडलेल्या लेखक,कवी,कार्यकर्ते त्यांची भेट टाळत असावेत,पण हा सरळसरळ भ्याडपणा,डरपोकपणा झाला.
याचा अर्थ त्यांना निव्वळ भेटणे म्हणजे तो धाडशीपणा,शूरपणा,नीडरपणा असेदेखील नक्कीच नाही,
पण मला महाराष्ट्रातलेच नव्हे तर,आंध्र,तेलंगणातले माझे सहकारीसुद्धा भेटत नाहीत,
अशी खंत सरांनी बोलताबोलता
व्यक्त केली,याचा अर्थ आपण समजून घ्यायला हवा की नको,
इतकीच माझी नम्र अपेक्षा आहे.
ही व्ही.व्ही.सरांच्या भेटीची अप्राप्य संधी काल मिळाली,खरेतर ती जानेवारीतच मिळाली होती पण तेव्हा थोडक्यात हुकली होती.अजूनही ज्यांना त्यांची मुंबईत भेट घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी खुशखबर आहे.
पेंग्वीन प्रकाशनाकडून आलेल्या त्यांच्या एका नव्या इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशनसोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत लवकरच संपन्न होणार आहे,
व्ही.व्हीं.च्या सार्वजनिक वक्तव्ये,व्याख्याने यांवरही अद्याप निर्बंध आहेत,असावेत असे दिसतेय,
पण त्यांच्यावर,
त्यांच्या साहित्यावर प्रेम करणार्यांना त्यांच्याशी सहज हृदयसंवाद साधता येऊ शकेल हे नक्की!
कालच्या या भेटीत मी व्ही.व्ही.सर आणि हेमाक्का यांच्याशी तेलुगू भाषेतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला,माझं मोडकंतोडकं तेलुगू आक्कांना तर समजत होतं असं जाणवलं,आम्ही सोलापूरकर मंडळी तीन राज्यांच्या सीमेवर असल्यामुळे कन्नड-तेलुगूदेखील प्रचंड आत्मविश्वासाने बोलत असतो,
मग भले ते समोरच्याला कळो अथवा न कळो!
या भेटीत सरांच्या ज्या पुस्तकाचा हिंदी अनुवाद तुषार कांती यांनी केलाय,ते पुस्तक मी सोबत नेले होते.
मग त्यावर व्ही.व्ही.सरांचा संदेश,सही घेतली,यावेळी त्यावर अनुवादक म्हणून तुषार कांती यांचीही सही घेतली.यावेळी व्ही.व्हीं.नी महाराष्ट्रातील आदिवासींबद्दलच एका ओळीत लिहिलेय.
एकूण काय कालच्या या झळाळत्या आणि घमघमत्या दिवसाच्या स्मृती पुढील अनेक दिवस,महिने माझ्या मनात दरवळत राहणार आहेत,हे निश्चित.
-भरत यादव
Bharat Yadav