एक आनंदवार्ता-एक खंत

एक आनंदवार्ता-एक खंत

एक आनंदवार्ता आणि एक खंत

कर्नाटक राज्याचे सांस्कृतिक नायक म्हणून महात्मा बसवण्णा यांच्या नावाची अधिकृत घोषणा माननीय सिद्धरामय्या सरकारने केली आहे.कर्नाटकातील लिंगायत समाज आणि अनेक अभ्यासक,लेखक,इतिहासतज्ज्ञ यांनी मागील काही वर्षांपासून या मागणीसाठी सरकारकडे पाठपुरावा करीत होते.त्यासाठी लिंगायत मठाधीश महासभेचे अध्यक्ष आदरणीय डाॅ.बसवलिंग पट्टदेवरु ( हिरेमठ संस्थान भालकी ) यांच्या नेतृत्वाखाली आठ जानेवारी २०२४ रोजी मुख्यमंत्र्यांना भेटून यासंबंधीचे निवेदनही देण्यात आले होते.कर्नाटक सरकारच्या या निर्णयामुळे फक्त कर्नाटकातील कन्नडभाषिक बसवप्रेमीच सुखावला नसून 'भारत देशा..जय बसवेशा' या घोषणेप्रमाणे भारतातील सर्वभाषिक बसवप्रेमींनाही तितकाच आनंद झाला असेल.आता एक कटाक्ष सोलापूरात घडलेल्या एका घटनेकडे.

         सद्या सोलापूर या कर्नाटकसीमेवरील महाराष्ट्रातील शहरात ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांची गड्डायात्रा सुरु आहे.त्यानिमित्ताने पारंपारिक आणि धार्मिक विधी यथासांग पार पडले आहेत.शोभायात्रेदरम्यान घडलेल्या
एका घटनेमुळे मात्र या वैचारिक,सामाजिक सलोख्याच्या यात्रेला तडा गेला आहे.शोभायात्रेत शिवसिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमेसह महात्मा बसवण्णा यांचीही प्रतिमा ठेवण्यात आली होती,पण काही बसवविचारविरोधकांनी
यावर आक्षेप घेत बसवण्णांची प्रतिमा झाकण्यास भाग पाडले,बाराव्या शतकात एका ध्येयाने,एका विचाराने झपाटलेल्या दोन युगपुरुषांची आजच्या काळात कृत्रिम ताटातूट करण्यामागचा डाव उघड आहे.शरणपरंपरेचा
समतावादी प्रवाह सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा संदेश
देत आला आहे.शरणविचारवंतांनीच अनुभवमंडपाच्या माध्यमातून भारतातील बुद्धकाळापासून वाहात 
आलेल्या पण बाराव्या शतकात जवळजवळ लुप्तप्राय झालेल्या लोकशाहीजाणीवेचा प्रवाह नव्याने सुरु केला होता.त्यासाठी मोठी सामाजिक चळवळदेखील चालवली गेली,तत्कालीन विषमतावाद्यांकडून या समता आग्रहाला साहजिकपणे कडवा विरोधच नव्हे तर शरणांची सामुहिक हत्याकांडेदेखील घडवण्यात आली होती.

एकेकाळी ज्यांच्या समतावादी विचारांना जे कट्टर
विरोध करत होते तेच विषमतावादी आज शरणश्रेष्ठ शिवसिद्धराम हे आमचेच म्हणून मिरवत आहेत.एखाद्या महामानवाचे विचार नाकारायचे असल्यास त्याचा देव करुन टाकायचा,हीच नेहमीची वैदिकट्रीक इथेही वापरण्यात आली आहे.समतावादी शरणपरंपरेतील शिवसिद्धरामेश्वरांना आज तळ्यातला महादेव बनवून टाकण्यात आले आहे.त्याचबरोबर मंदिराला सोनेचांदी आदी धातूंनी मढवले जात आहे.महात्मा बसवण्णा आणि शरणपरंपरेशी असलेला सिद्धरामांचा जैविक अनुबंध उघडउघड नाकारला जात आहे.त्यातूनच बसवण्णांची
प्रतिमा झाकण्याची,शरणपरंपरेशी असलेले नाते लपविण्याची मुजोरी घडत आहे.

शरणवाङमयातून बसवण्णा आणि 
सिद्धरामांच्या घनिष्ठ संबंधांविषयी
अनेक ठिकाणी दाखला मिळतो.ऐतिहासिक संदर्भांची
लपवाछपवी करण्यात हातखंडा असलेल्या कुप्रवृत्तींचे
कोंडाळे सध्या शिवसिद्धरामेश्वर आणि बसवण्णा यांची
ताटातूट करण्याच्या कटकारस्थानात सोलापूरात आघाडीवर आहे.मंदिराच्या माध्यमातून महामानवांचे दैवतीकरण आणि धार्मिक कर्मकांडांचे उदात्तीकरण अशा दोन्ही गोष्टी सहजपणे घडविल्या जात आहेत.
ही अतिशय संतापजनक बाब आहे.खरा इतिहास,परंपरा दडवण्याचे आणि खोटा इतिहासच खरा म्हणून बहूजनांवर थोपविण्याचे विषमतावाद्यांचे धंदे आजही राजरोसपणे जारी आहेत.त्याला राजसत्ता-धर्मसत्ता आणि त्यांच्या युतीतून निर्माण होणारी अर्थसत्ता हातभार लावते आहे.

फोटो साभार
Vishal Phutane 
Raju Jubare
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने