आजकालचे अभंग!

आजकालचे अभंग!

अठराव्या विद्रोही मराठी साहित्य 
संमेलनाच्या ( अमळनेर )
विचारमंचावर निमंत्रित कवीसंमेलनात 
सादर केलेला अभंग.

आजकालचे अभंग!
🚩
पंढरीची वारी
बंद करु आता
अयोध्यामहत्ता
वाढवू या!

देहू-आळंदीचे
घडो विस्मरण
अयोध्यास्मरण
व्हावे नित्य!

चंद्रभागा नदी
अदानीला विकू
शरयूत टाकू
मत्स्यबीज!

वाळंवट आता
रिसाॅर्ट होईल
लयास जाईल
भूवैकुंठ!

विठुराया तुझी
ठरली गच्छंती
येईल मागुती
रखमाई!

आता पांडुरंगा
जाणार बा कुठे
पुंडलिक कुठे
भेटणार!

नामा-तुकयाची
विसरावी गाथा
तुळशीरामकथा
ऐकवावी!

नच पडो कानी
आता ज्ञानेश्वरी
राम-कृष्ण-हरी
नामशेष!

संपवू सगळा
रिंगण सोहळा
उजाडेल मळा
पंढरीचा!

विठूराया तुझा
लोपेल लौकिक
धर्मांधांचा धाक
बोकाळला!

होतील पोरके
संतांचे अभंग
किर्तनाचा रंग
ओसरेल!

झाल्या आक्रमक
भगव्या पताका
घोषणेत ऐका
शिवीगाळ!

ज्ञानोबा तुकोबा
घ्यावा रामराम
आता जै श्रीराम
किंचाळतो!
🚩
      -भरत यादव
Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने