अमळनेरचा सांगावा

अमळनेरचा सांगावा

अमळनेरचा सांगावा

'अभासा'च्या तुलनेत अमळनेरला पार पडलेले अठरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कमालीचे यशस्वी ठरले या गोष्टीचा अनेकांना पोटशूळ उठला आहे.अनेकांनी आपली मळमळ व्यक्त करायलादेखील सुरुवात केलीय.शासनाकडून तब्बल दोन कोटींचा निधी हडप करुन गावखेड्यातील सामान्य मराठी वाचक रसिकांच्या हातात निव्वळ धत्तुरा देणार्‍यांनी आता पुन्हा नव्याने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.
अतिशहरीकरणाने निसर्गाचा र्‍हास  झाला,हिरवाईचे क्राॅंक्रिटीकरण झाले
अगदी तसेच मानवी मनांचेही झालेय असे वाटण्याजोगी सध्याची स्थिती आहे.स्वतःची पोटं भरली म्हणून अशा पोटार्थी सदाशिवपेठीय लेखकु-पत्रकारांनी आता लिटरेचर फेस्टीवलची स्वप्नं पाहायला आणि दाखवायला सुरुवात केलीय.खरेतर मायमराठीपुढची आव्हानं वेगळी,प्राधान्यक्रम वेगळे याचा काहीही विचार न करता फक्त उच्चवर्णीय मानसिकतेचे महत्त्व आटत,ओसरत चालले म्हणून साहित्य संमेलनेच बंद करून लीट.फेस्ट. घ्यावे असे नकळपणे सुचवणे म्हणजे दीडशहाणेपणाच आहे.
खरेतर आत्ता कुठे मराठी समाजाच्या तळागाळात साहित्यजाणीवा जागृत होतायत,जगण्याचं भान येत चाललंय, बोलीभाषांना विद्रोही साहित्य संमेलनातून सन्मानपूर्वक विचारमंच उपलब्ध करून दिला जातोय.
आम जनतेला हे साहित्य किंवा हा साहित्यप्रपंच आपला असल्याची सुखद जाणीव करून देणे हे काम अ.भा.म्हणवणार्‍या संमेलनांच्या घालमोड्या कारभार्‍यांनी कधीच केलेले नाही.भाषेवरील आक्रमण हे त्या त्या संस्कृती आणि समाजावरील आक्रमण असते पण अ.भा.वाले कायम शासनाचा निधी ढापण्यात आणि भोजनभाऊपणात रमण्यातच दंग राहिले.त्यांचा आणि मराठी भाषा व संस्कृतीशी तसा संबंध तुटलेलाच होता,जो परखडपणे महात्मा जोतीराव फुले यांनीदेखील आपल्या काळातील अ.भा. वाल्यांना म्हणजेच ग्रंथकार सभेस पत्र लिहून ठणकावून सुनावले होते.
असा लोकद्रोहीपणा वारंवार करण्याची उबळ
यांना येतेच कशी? तर याचे उत्तर जातवर्णव्यवस्थेत दडले आहे.
वर्चस्ववादाची भावना हा विषमतेचा पाया आहे व सर्वांप्रती समभाव हा समतेचा गाभा आहे.

तर आदिवासीबंधूबांधवांसह अठरापगड जातीसमूहांना सामावून घेणारे,त्यांचा आवाज बुलंद करणारे
अमळनेरचे अठरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन दणदणीत यशस्वी झाले हे प्रांजळपणे कबूल न करता उलट ते लपवून
तेथील किरकोळ वादांना ठळक प्रसिद्धी देणार्‍या,
सत्ताधार्‍यांचे लाचार भाट बनलेल्या
बोरुबहाद्दरांना अ.भा. चे गडद अपयश दिसत नाही,
विद्रोहीच्या यशामागे असलेले तळागाळातल्या कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम दिसत नाहीत,
विद्रोही संमेलनातली लोकांची उत्स्फुर्त गर्दी लपवणार्‍या,साहित्यविश्वाशी काहीही देणेघेणे नसणार्‍या पेडपत्रकारितेकडून वास्तवदर्शनाची अपेक्षाच फोल ठरते.
रसिकांना आपल्याकडे खेचण्यात अ.भा.संमेलन सपशेल अपयशी ठरले असेल तर मग दोन कोटी निधीचे नेमके झाले तरी काय किंवा केले तरी काय? असे प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य करणार कोण? हा खरा सवाल आहे. 

आजची राजकीय आणि सामाजिक दडपशाही आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याची सुरू असलेली गळचेपी पाहता प्रस्थापित अन्यायी व्यवस्थेविरोधात विद्रोह बुलंद करणारे आवाज आणखी वाढत गेले पाहिजेत,संविधाननिष्ठता हीच भारतीय असल्याची खरी खूण मानत संविधानाचा गाभा उद्धवस्त करून टाकण्याच्या कटकारस्थानात सहभागी झालेल्या,होणार्‍या सर्वांनाच अशा लोकसंमेलनांमधून धारेवर धरले गेले पाहिजे,अशा कुप्रवृत्तींवर त्वेषाने तुटून पडले पाहिजे.पण तसे न होता जातधर्मवर्चस्ववादाला गर्वअभिमानाने मिरवणार्‍यांनाच पाठीशी घातले जात आहे.स्वतःला पुरोगामी म्हणवणारे सुद्धा परिवर्तनाच्या लढाईत आपले योगदान न देता क्रियाशील कार्यकर्त्यांच्या पायात खोडा घालत आहेत,शाळकरी पोरापोरींप्रमाणे बालिशपणे एकमेंकांची उणीदुणी काढण्यात शक्ती वाया घालवताहेत.
मीच एकमेव क्रांतीकारी अशा पोकळ अविर्भावात वावरणार्‍या व्यक्ती आणि प्रवृत्ती परिवर्तनवादी चळवळीला अडथळे ठरत आहेत.
यामुळे आपण समोरच्या अजस्त्र वैचारिक शत्रूचा मुकाबला करणार तरी कसा? आपसातले किरकोळ हेवेदावे,लोभ आणि मत्सर आत्ताच विसर्जीत नाही केले गेले तर आगामी काळात मनुस्मृतीच्या समर्थकांसाठी सगळेच सोपे होत जाणार आहे.

म्हणून विनम्रपणे सुचवावेसे वाटते की
आतातरी विद्रोहीची झालेली अनेक शकले एकत्र येतील का? याचाही विचार व्हायला हवा.महाराष्ट्रात आजही फुलेशाहूआंबेडकरी विचारांना आपली प्रेरणा मानणार्‍या व त्याच तत्त्वाने आजवर अन्यायी व्यवस्थेशी संघर्षरत राहिलेल्या ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेण्यास विद्रोहीच्या गटातटात विभागले गेलेल्या कार्यकर्त्यांनी अजिबात संकोच बाळगू नये असे ठामपणे सांगावेसे वाटते.त्यामुळे आपल्या या लढ्याची दिशा निश्चित होऊ शकेल,प्राधान्यक्रम समजून घेण्यास मदत होईल.तळागाळातला बहूजन जितका सांस्कृतिक वर्चस्वाची ही लढाई नीटपणे समजून घेईल तितका हा लढा अधिक तीव्र होत जाणार आहे.
त्यामुळे 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे' हा तथागत बुद्ध आणि महात्मा गांधींचा मानवतावादी संदेश देणार्‍या साने गुरुजी
यांच्या अमळनेरचा सांगावा आपण
आतातरी 
मनावर घेणार आहोत की नाही?

- भरत यादव
साने गुरुजी यांच्या अमळनेरचा सांगावा आपण आतातरी मनावर घेणार आहोत की नाही? 

 https://baimanus.in/click-here-to-read-18th-rebel-marathi-literary-conference-held-at-amalner-was-a-great-success/
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने