आंबेडकरी कवितेचा अग्निमोहोर
ज्येष्ठ विचारवंत,प्रख्यात मराठी साहित्यिक,
कवी डाॅ.यशवंत मनोहर सर आज
सव्वीस मार्च २०२४ रोजी वयाच्या
ब्याऐंशीव्या वर्षात प्रवेश करीत आहेत.त्यांचे विद्यार्थी,विचारअनुयायी,वाचक त्यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे साजरा करीत आहेत.
मुख्य समारंभ दिक्षाभूमीनगरी नागपूरात होतो आहे.
मनोहरांच्या एक्याऐंशीव्या वर्षपूर्तीनिमित्त
एक्याऐंशी कवितांचा संग्रह
'पर्यायाचे पडघम'
( कवींचे यशवंत मनोहर )
या शीर्षकाने प्रकाशित होतो आहे.
या संग्रहात सुमारे सत्तरच्यावर कवी आणि कवयित्रींच्या रचना संकलीत आहेत.या संग्रहाचे साक्षेपी संपादन कवी डाॅ.प्रकाश राठोड यांनी केले आहे.
संपादकीय मनोगतात राठोड म्हणतात त्याप्रमाणे 'यशवंत मनोहर यांची कविता ही निरंतर उज्ज्वल होत जाणार्या पर्यायाची कविता आहे.त्यांच्या कवितेत १९६५ पासूनच
हे पर्यायाचे पडघम गर्जना करीत आहेत.तो हुंकार आजही तितक्याच ताकदीने गगनभेदी होत आहे.'
मनोहरांची समग्र कविता
अन्यायी व्यवस्थेवर अग्निलोळाप्रमाणे
निव्वळ कोसळत नाही,तर ती आंबेडकरी विचारांचे स्फुल्लिंग मनामनात चेतवण्याचे कार्य करते.
मनोहरांची कविता ही
मागच्या तीन पिढ्यांतील 'फुलेशाहूआंबेडकरी' विचारांच्या लिहित्या कवींचा ऊर्जास्त्रोतच
बनली आहे.
'पर्यायाचे पडघम'च्या संपादकीय
मनोगतात राठोड पुढे लिहितात,
'यशवंत मनोहर यांचे व्यक्तिमत्त्व हे अंतर्बाह्य काव्यमयच आहे.
त्यांच्या लेखी काव्यमय जगणे हेच प्रतिभावंतांचे खरे जगणे असते.
हे जगणे सर्जनशीलच असते.
हे जगणे मानवी जीवनातील दुःखगर्भतेची अनुभूती देत असते.'
मनोहरांची समग्र काव्यसृष्टी ही कल्पनारम्यतेत अडकून पडणारी नाही,तर तुरूंग तोडणार्या उठावाचे
जाणीवभान देणारी आहे.अग्निपरिक्षेचे वेळापत्रक समाजापुढे ठेवणारी कविता यशवंत मनोहर लिहित आले आहेत.प्रज्ञासूर्य,महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणास्त्रोत मानीत आलेल्या आंबेडकरी साहित्याचा लखलखता
बाज या मनोहारी काव्यातून निरंतरपणे भेटत आला आहे.
धम्ममयी सम्यक मांडणीबरोबरच
श्रमणपरंपरेचा महान वारसा सांगणारी,जपणारी संयत शब्दकळा
हा मनोहारी काव्याचा प्राण राहिली आहे.
त्यांची कविता विषमतावाद्यांच्या
मनात धडकी भरवणारी तर संविधानवादी,समताआग्रही वाचकांच्या
मनाला युगउभारी देण्याचे कर्तव्य निभावत आली आहे.शालीन आणि भरजरी शब्दांच्या कलाकुसरीने सजलेली भाषा असूनही तिच्यातली
आंबेडकरी विचारांची तेजतर्रार धार
तसुभरही कमी होत नाही,हीच तर या मनोहारी काव्याची थोरवी आहे.
याच मनोहारी कवितेची आणि कवीवर्य यशवंत मनोहर यांच्या काव्यप्रतिभेची महत्ता विषद करताना
बंगळुरूचे कवी युवराज सोनटक्के लिहितात, 'उत्थानगुंफे'तील प्राशून विद्रोहाच्या ज्वाला,
परीक्षावंत होऊन रिक्त केला प्रतिभेचा प्याला'
तर परभणीचे माधव हैबतकर
सार्थपणे लिहून जातात,
'तुमचा शब्द आम्हांसाठी नित्य नवा आहे,
नव्या जिंदगीची ती नवी जन्मभू आहे'
ज्येष्ठ विचारवंत डाॅ.जनार्दन वाघमारे
शिवराय आणि भीमराय या कवितासंग्रहाच्या
प्रस्तावनेत कवी
यशवंत मनोहरांविषयी लिहितात,
'मनोहर यांच्या कविता ह्या क्रांतिगर्भ कविता आहेत.
क्रांतीचे गीत गाणारा हा कवी आहे.
या कवितेत स्वातंत्र्य,समता,बंधुत्वाचे सूक्त आढळते.
ही कविता निबिड अंधारातून लख्ख प्रकाशात प्रवेशणारी आहे.कालबाह्य मूल्यांचे भंजन आणि नव्या मूल्यांचे पूजन करणारी ती कविता आहे'
सद्यकालीन वास्तवाचे कठोर भान जागृत करणारी
कविता लिहीणारी
ही मनोहारी प्रतिभा विषमतावादी
शक्तींपुढे मुळीच मान तुकवीत नाही,
श्रेष्ठ मानवी मूल्यांसाठी ती विचारवैर्यांविरूद्ध थेट एल्गार पुकारते,त्यातूनच मनोहरांसारख्या
प्रतिभावंत कवीश्रेष्ठाला काल्पनिक दैवी थोतांडांना आणि शोषणाच्या सनातन मनुसाधनांना
झिडकारण्याचे भीमबळ प्राप्त होत आले असावे!
यशवंत मनोहर या सूर्यकुळातल्या काव्यसेनानीपुढे
आदराने नतमस्तक होताना,
‘पर्यायाचे पडघम’मधील काव्यसंग्रहातील कवींची
प्रतिभा मोहरून उठते.धामणगाव,लातूरचे कवी
प्रफुल्ल धामणगावकर लिहितात,
सर तुम्ही,
काळजाचे वाफे करुन क्रांतिबीज पेरले,
सनातनी मातीलाही बुद्धीवादाने अंकुरीले,
अग्नीचे तांडव करीत कित्येक मोसम आले नि गेले
याचनांचे महाल कधी कुणाचे चढले नाहीत’
तर याच युगप्रतिभेचे यथार्थ वर्णन करताना
वर्ध्याचे कवी प्रमोद नारायणे
म्हणतात,
‘हे युगांतराची कविता लिहिणार्या प्रतिभे,
तुझ्या लेखनसामर्थ्याने भूत,भविष्य,वर्तमानावर
युगमुद्रा उमटविणारी लख्ख प्रकाशवाट उजेडत जाणार आहे,तुझ्या स्वप्नसंहितेने ही अखिल प्राणीजात सर्वांगसुंदरतेचे अपरिमित विश्व होणार आहे.’
समतेची सकारात्मक मांडणी करणारे यशवंत मनोहर
आपल्या चिंतनशील कवितालेखनातून वंचित-बहूजन समाजाला उजेडवाटा दाखवत आले आहेत.
शिवराय आणि भीमराय
या दोन क्रांतीस्तंभांची महत्ता समाजमनावर बिंबवत संविधानमूल्यभान जागवणारी कविता कठिण काळाच्या
कठोर कातळावर कोरत आलेल्या कवीवर्यांविषयी आपल्या भावना व्यक्त करताना आर्णीचे कवी प्रशांत वंजारे म्हणतात,
‘तुम्ही मूल्यांचे रक्षक
तुम्ही व्यवस्थेचे समीक्षक
तुम्ही भीमसैनिकांचे सरसेनापती….
लोकांच्या मनावर इहवादाचे शिल्प कोरणारे
शिल्पकार तुम्ही,
अंधारलेल्या कॅनव्हासवर उजेडाचं चित्र काढणारे
चित्रकार तुम्ही….’
तर जळगावचे शशिकांत हिंगोणेकर आपल्या
कवितेत लिहितात,
‘बुद्धाच्या करुणेची फुले ओंजळीत ओतणार्या
विद्रोही महामानवांच्या क्रांतिकारी विचारांना पेरत
लेखणी सुसज्जच ठेवली शोषित पीडितांच्या
दास्यमुक्तीसाठी तुम्ही…’
तसेच पंचाळा,जि.वाशिमचे महेंद्र ताजणे
म्हणतात,
‘तुम्ही सौंदर्यस्वप्न तेजाळत्या कवितांचे
अगणित धुमारे उगवत्या दिवसाला फुटलेले
तुम्ही काव्यसर्जनाचे अंतराळ
अग्निपरिक्षेच्या वेळापत्रकाचे
तुम्ही कवितेतून उगवलेली महाकविता
मनोभूमीच्या क्षितिजावरची.’
तर या कवितासंग्रहाची सुरूवातच ज्यांच्या
कवितेने होते ते पुण्याचे कवी विवेक काटीकर
आपल्या कवितेमधून काळीजमायेने विचारतात,
‘ऋतुंच्या प्रकोपातून वाचलेल्या शब्दांना मिळावा
संविधानाचा सुखरूप किनारा म्हणून जागोजागी
रोवून ठेवलेले हे प्रकाशसंदर्भ तुम्ही कोणत्या
सूर्यमंडळातून घेऊन येता?’
…..निरंतर संघर्ष हाच आहे तुमच्या देदीप्यमान
कवितेचा स्थायीभाव….अनंत कल्लोळाच्या प्रक्रियेसमोर
निधड्याने उभी असलेली तुमची कविता जन्म आणि मृत्यू
यांच्या दरम्यान पसरलेल्या जीवन नावाच्या लांबलचक पुलावर टाकते प्रकाशाचा एक झगझगीत झोत अन् उजळून टाकते त्या पुलाचा प्रत्येक कानाकोपरा.’
तर धाराशिवच्या कवयित्री भाग्यश्री रवींद्र केसकर
मनोहरांविषयी कृतज्ञतापूर्वक
भाष्य करताना,
‘तू कालजयी अजिंक्य वारा….या आपल्या कवितेत
लिहितात,
‘...तू बुद्धाच्या पायवाटेवरील सत्यशोधक पांथस्थ.
तू कवटाळतोस दुःखांना हसतहसत
पचवतोस उद्रेक व्यवस्थानिर्मित काळ्या पावसाचे
आणि सांगतोस हसतहसत पाऊस आलाच नाही
आमच्या गावात…..’
‘पर्यायाचे पडघम’मधून कवी यशवंत मनोहर
यांच्या काव्यसंसाराचा आणि संविधाननिष्ठ व्यक्तिमत्वाचा
सदिच्छारुपी मनोहारी शब्दस्तूपच या प्रतिभावंत भावंडांनी विवेकी वाचकांपुढे उभा केला आहे.
यातून कविश्रेष्ठ यशवंत मनोहरांच्या नवोन्मेष काव्यप्रतिभेने बहरलेला आंबेडकरी कवितेचा अग्निमोहोरच
प्रत्ययास येतो.
------------
भरत हरिदास यादव,
yadavbh515@gmail.com
प्रसिद्धीः दैनिक आरंभ मराठी,धाराशिव