ज्येष्ठ विचारवंत डाॅ.आ.ह.साळुंखे यांनी 'विद्रोही तुकाराम' हा ग्रंथ लिहिला,त्याला सत्तावीस वर्षे झाली.या ग्रंथाची पहिली आवृत्ती
१९९७ साली प्रसिद्ध झाली,त्यानंतर आजवर या ग्रंथाच्या अनेक आवृत्या आणि पुनर्मुद्रणे प्रसिद्ध झाली आहेत.
संत तुकाराम महाराजांबाबत मराठी माणसाच्या मनात विलक्षण प्रेम आणि कुतूहल दिसून येते,मागील तीनशे-चारशे वर्षांपासून तुकारामांचे अभंग महाराष्ट्राच्या घराघरात पाठ आहेत इतकेच नव्हे तर त्यातील कैक अभंगओळी मराठीभाषेमध्ये उक्ती म्हणून स्थानापन्न झाले आहेत,वाकप्रचार म्हणून प्रसिद्ध पावले आहेत.
मराठी समाजाच्या तळागाळात पोहोचलेल्या वारकरी संप्रदायामुळे ज्ञानोबातुकोबा
ही संतद्वयी आणि त्यांची विचारसंपदा अजरामर झाली आहे.सार्वकालिक श्रेष्ठ जागतिक साहित्याचा दर्जा ज्ञानेश्वरी आणि तुकारामगाथेला लाभला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये!
तुकोबांच्या गाथेपुरते बोलायचे झाल्यास इंद्रायणी नदीच्या डोहात जलसमाधी मिळाल्यानंतर ती गाथा लोकगंगेवर तरली होती म्हणजेच जनसामान्यांना ती तोंडपाठ होती,
तेच गाथेतले अभंग संत जगनाडे महाराज,जे तुकोबांचे टाळकरी होते,मित्र होते,त्यांनी गावखेड्यात अथक पायपीट करीत अतिशय परिश्रमपूर्वक लोकांकडून ऐकून लिहून काढले होते.
मनुस्मृतीनुसार वैदिक व्यवस्था सामान्य जनतेवर किती आणि कसा अन्याय करत होती,हे तपशिलवारपणे 'विद्रोही तुकाराम' मधून आपल्याला वाचायला मिळते.तत्पूर्वी तुकोबा यांची
प्रतिमा मराठी जनमानसात एक टाळकुटे वारकरी संत अशीच रंगवली गेली होती,चित्रपटांमधून तर त्यांचे चित्रण एक भित्रा,नेभळट संतकवी असेच झाले होते.तुकोबांच्या अभंगांवर आणि चरित्रावर अधिकारवाणीने भाष्य करणारे तोपर्यंत चारदोनच ठळक नावे आढळत होती,एका अर्थाने त्यांनी तुकोबांवर लिहिण्याबाबत स्वतःचीच मक्तेदारी प्रस्थापित केली होती,
'विद्रोही तुकाराम' नंतर मात्र
हे चित्र बदलत गेले आहे.
सज्जड पुराव्यानिशी संत तुकारामांच्या चरित्राची पुनर्मांडणी करणार्या आ.ह.साळुंखे यांनी तुकोबांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक अज्ञात पैलू साधार आपल्या ग्रंथामधून लोकांपुढे ठेवले,वाचकांनी ते सहर्षपणे स्विकारलेही.
वैदिक व्यवस्थेपुढे नीडरपणे उभा राहणारा,सत्याबाबत कुठलीही तडजोड न करणारा,
विठोबाभक्तीची शिकवण देताना जनसामान्यांना
धार्मिक आणि सामाजिक अन्यायाविरोधात
ठामपणे उभे राहाण्याचा मूलमंत्र आपल्या सोप्या मराठी भाषेतल्या अभंगगाथेमधून देणार्या,
धार्मिक कर्मकांड,अंधश्रद्धांवर
तुटून पडणार्या,
जगदगुरु,विवेकी तुकोबारायाचे 'विद्रोही तुकाराम' मधून
उभे राहाणारे चित्र आमजनतेला विलोभनीय न वाटते तरच नवल!
विशेष म्हणजे हे कुठले काल्पनिक चित्र अजिबात नव्हते,अस्सल तुकोबा
असेच होते असा ठाम विश्वासच या मांडणीने लोकांच्या मनात निर्माण केला.परिणामी मागील पंचवीस वर्षाहून अधिकच्या काळात तुकोबांच्या चरित्रावर आणि अभंगगाथेवर लिहिणारे शेकडो लेखक,कवी,संशोधक,अभ्यासक,
समीक्षक मराठीत निर्माण झाले आहेत.विविध अंगांनी तुकाराम अभ्यासले गेले आहेत,अजूनही अभ्यासले जाताहेत.
संत तुकाराम जाणीवपूर्वक इथल्या
अन्याय्य धार्मिक व सामाजिक व्यवस्थेशी झुंजले,झगडले.स्वतःच्या
कुटुंबापेक्षा त्यांनी जनसामान्यांच्या हिताचा विचार केला.'ऐशी कळवळ्याची जाती,करि लाभांविण प्रीती' या स्वतःच्या उक्तीअनुरूपच त्यांची प्रत्यक्ष कृती होती.तुकोबांच्या
चरित्रात अनेक खोट्या गोष्टी आणि प्रसंग घुसडून त्यांच्या बदनामीची पद्धतशीरपणे मोहीम राबविण्याकामी इथल्या कलमकसायांनी थोडीही कसर सोडली नव्हती.अगदी तरुण वयातच आपल्या घराण्यात परंपरेने चालत आलेल्या महाजनी व्यवसायाचा म्हणजेच सावकारकीचा स्वेच्छेने त्याग करण्याच्या तुकारामांच्या या क्रांतीकारी कृती आणि प्रसंगाबाबतची
मराठीजगताकडून झालेली उपेक्षाही तितकीच विलक्षण,असाधारण,आणि धक्कादायक असल्याचे मत या ग्रंथात लेखक आ.ह.साळुंखे नोंदवतात.
या प्रसंगातून तुकोबांचे संतत्व झळाळून उठते.
खरेतर वयाच्या अवघ्या विसाव्यावर्षी एक युवक इंद्रायणीत आपल्या वाट्याच्या कर्जखात्यांना
जलसमाधी देतो,
ही मुळीच साधारण घटना नव्हती.
पुढच्या युगकार्याची नांदी देणारीच ही ऐतिहासिक घटना होती.
अजस्त्र वैदिक,सनातनी व्यवस्थेबरोबर दोन हात करण्यास सज्ज होण्याआधी स्वतःला सर्व मोहमायेच्या पाशातून मुक्त करण्याचे हे जाणते पाऊल होते..'आधी केले,मग सांगितले'..तसेच 'बोले तैसा चाले'..या उक्तींनुसार.
पण त्यानंतरही तुकोबा विरक्त वृत्तीने संन्यासधर्म स्विकारत नाहीत,कुटुंबवत्सलता सोडत नाहीत,संसाराचा त्याग करीत नाहीत.
गृहस्थाश्रमाच्या कर्तव्यांपासून पळ काढून लोकांना कोरडा उपदेश करीत नाहीत,यातच तुकोबांची थोरवी दिसून येते.आल्या संकटाला धैर्याने सामोरे जाणे यातच तुकोबांच्या संतत्वाची खरी कसोटी होती.त्यामुळेच त्यांनी 'रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग...अशी
नोंद करून ठेवली आहे.
तुकारामांसारख्या द्रष्ट्या आणि युगप्रवर्तक संताला वेदांचा तसेच धर्माविषयी काही लिहिण्या-बोलण्याचा अधिकार नाकारण्यात आला होता,या निर्णयाच्या विरूद्ध त्यांनी युद्ध पुकारले,ते युद्ध वैयक्तिक पातळीवरचे नव्हते तर ते समस्त मानवजातीसाठीचे होते,श्रेष्ठ मानवी मूल्यांच्या पुनर्स्थापनेसाठीचे होते,धर्म-जाती-वर्णश्रेष्ठत्वाच्या खोट्या कल्पनांना कवटाळून बसलेल्या अन्यायी प्रवृत्तींविरोधातले होते,मुजोर धर्ममार्तंडांनी
साध्या साध्या सामाजिक हक्क-अधिकारांपासून वंचित ठेवले गेलेल्या बहूसंख्य जनतेसाठीचे होते.
त्यामुळेच तत्कालीन धार्मिक-सामाजिक सोंगाढोंगांवर आपल्या अभंगांमधून कठोरपणे हल्ला चढविणार्या योद्धा तुकोबांची प्रासंगिकता सांप्रत काळातही मुळीच संपलेली नाही,याचे थोडेफार भान जरी आज आपल्याला येऊ शकले तरी विद्रोही तुकाराम या ग्रंथातील मांडणीचे योग्य आकलन आपणांस झाले असे मानता येईल.
--------------
भरत यादव
yadavbh515@gmail.com
प्रसिद्धीः दै.नवशक्ती,मुंबई
अक्षररंग पुरवणी
२४/०३/२०२४