समकालीन हिंदी कवितेतील बाबासाहेब

समकालीन हिंदी कवितेतील बाबासाहेब

समकालीन हिंदी कवितेतील बाबासाहेब आंबेडकर


महामानव प्रज्ञासूर्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विश्वकल्याणाचे विचार केव्हाच प्रांत,भाषा,राष्ट्र आणि इतर सर्व प्रकारच्या कृत्रीम सीमांचे अडथळे ओलांडून अखिल मानव जातीचे झाले आहेत.

बाबासाहेबांच्या गौरवार्थ मराठीशिवाय इतरही अनेक भाषांमधून मागील पाच-सहा दशकांपासून मोठ्या प्रमाणात साहित्यनिर्मिती सुरु आहे.मराठीत लिहिल्या गेलेल्या आणि अजूनही लिहिल्या जात असलेल्या वंचितवर्गाच्या अस्मिता उद्गारालाच आंबेडकरी साहित्य अशी संज्ञा आहे.उपे

क्षितांच्या धगधगत्या काळीजजाणीवा जळजळीतपणे,

नीडरपणे मांडणार्‍या साहित्याला आंबेडकरी साहित्य असे

म्हटले जाते.या साहित्यामुळेच हिंदीसहित इतर भारतीय भाषांमध्येही आंबेडकरी साहित्यनिर्मितीच्या चळवळीची प्रेरणा मिळाली.


घोर अन्यायी सामाजिक अव्यवस्थेमुळे हजारो वर्षांपासून मूलभूत मानवी न्याय्य हक्क-अधिकारांपासूनही वंचित राहिलेला गावकुसाबाहेरचा मानवीसमूह जसा शिकू लागला,लिहू-वाचू लागला तसा तो आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडू लागला,साहित्याच्या माध्यमातून आपली टोकदार अभिव्यक्ती नोंदवू लागला.

बाबासाहेबांनी घडविलेल्या

रक्तविहीन लोकक्रांतीला आलेली ही मधुर फळे होती,ज्यामुळे समाज आणखी सुंदर होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करायला लागला.


बाबासाहेबांवरील रचण्यात आलेल्या विपुल साहित्यांसंदर्भात विचार करताना समकालीन हिंदी कवितांमधील चित्रणाचा इथे धावता आढावा घेण्याचा प्रयत्न आहे.संविधाननिर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी

समस्त भारतीयांना बुद्धीवादी विचारसरणीचा वैभवशाली वारसा प्रदान केला आहे.भारतात प्राचीन काळापासून प्रखर बुद्धीवादाचा प्रवाह अखंडपणे वाहतो आहे. चार्वाक-लोकायत-बुद्ध ही परंपरा नव्याने पुनरुज्जीवीत करण्याची ऐतिहासिक कामगिरी बाबासाहेबांनी बजावली आहे,ती १९५६ साली बुद्धधम्मदीक्षेच्या माध्यमातून.

ही धम्मक्रांती आणि संविधाननिर्मितीच्याद्वारा भारतीय जनतेला विवेकाचे सम्यक ज्ञानच त्यांनी बहाल केले आहे.हा बहूमुल्य विवेकवारसा

पुढील पिढ्यांकडे सोपविताना तो विकृत स्वरुपात जाऊ नये,तसेच त्यांनी सांगितलेल्या प्रखर बुद्धीवादी

विचारसरणीविरुद्ध चुकूनही वर्तन घडू नये याविषयी काळजीयुक्त इशारा देताना हिंदीतील ज्येष्ठ आंबेडकरी कवी जयप्रकाश कर्दम आपल्या ….देव करू नका…

या कवितेत लिहितात…..

देव नाहीयेत बाबासाहेब

की जे पूजागृहात 

कोंडून ठेवले जातील

ना एखादा पुतळा आहेत बाबासाहेब

ज्यास फोडून 

उद्धवस्त करता येईल


बाबासाहेब केवळ नाव नाहीत

इतिहासाच्या पानांमध्ये

दफन करून टाकता येईल असे


आंबेडकर हे कोट्यवधी 

आंबेडकरी जनतेच्या

अस्मितेचे प्रतिक आहेत…

त्यांच्या जीवनातले संगीत आहेत…


आंबेडकर एक जिताजागता विचार आहेत

श्रद्धेच्या आवेगात

जिवंत विचाराला दडपू नका

बाबासाहेबांना देव करू नका.’

आजच्या या प्रचंड धर्मवाद बोकाळलेल्या काळात बाबासाहेबांना अभिप्रेत बुद्धीवाद अनुसरणे म्हणजे

क्रांतीची ज्वलंत मशाल हाती घेणेच होय.क्रांतीचे विचारवैरी आपल्या तमाम महामानवांना वैदिक अव्यवस्थेत सामावून घेण्याचा अथक प्रयत्न करीत आले आहेत.मग ते कधी विष्णुचा अवतार करतील तर कधी प्रातःस्मरणीय विभूतींच्या यादीत समाविष्ट करण्याची छद्मी चाल खेळतील,म्हणूनच आंबेडकरी जनतेने अशा विविध प्रलोभनास बळी न पडता,आपल्याच महामानवांच्या विचारांचा पराभव करण्याचे टाळले पाहिजे,हेच या कवितेतून स्पष्ट होते.


तर कवी प्रशांत सागर

आपल्या ‘मिस्टर आंबेडकर’ 

या कवितेतून समस्त भारतीयांना बाबासाहेबांनी आपल्या

अथक संघर्षातून मुलभूत मानवी हक्कअधिकार कसे मिळवून दिले यावर पुढीलप्रमाणे मार्मिक भाष्य केले आहे

…….मिस्टर आंबेडकर, 

तुमच्या ग्रंथात

हे बरेच भयंकर विचार आहेत

जसे 

संपूर्ण मानवजातीचे

मूळ एकच आहे.


जसे

कुणी कुणावरही

जुलूम करू नयेत,


ज्याला ज्याच्यावर वाटेल

त्याच्यावर प्रेम करावं


जसे

प्रत्येकाला त्याचा हक्क मिळो-

कसणार्‍याला त्याचे शेत मिळो.


जल आणि जंगल मिळो

तिथे राहाणार्‍यांना

भाकर मिळो

प्रत्येक रहिवाशाला…..


….असे कसे होईल?

जे कुठे कधी नाही घडले-

ते कसे घडेल?


मानवीसंस्कृती ही तर

मालकांची संस्कृती राहिली आहे!


मि.आंबेडकर,

मजूरांच्या कहाण्या

अद्याप मौन आहेत

खूप भयानक आहेत संकल्प

आपले

मिस्टर आंबेडकर-


सांगा…बरं….

तुमच्या गुलाबी स्वप्नांमध्ये

दिसणारा

हा जादुई देश कोणता आहे? 

खरेतर बाबासाहेबांनी भारतावर आणि भारतीयांवर केलेले

अगणित उपकार शब्दांमध्ये मांडणे अतिशय कठिण आहे.

पण शेकडो कवी,शाहिरांनी आपल्या कविता आणि कवनांमधून भीमरायाने केलेला तो भीमपराक्रम अजरामर केला आहे.बाबासाहेब म्हणजे नेमके काय? हे विशद करताना प्रशांत सागर सहजपणे लिहून जातात,

बाबासाहेब समजून घेताना! 

या कवितेत…….


वावरातून उंदीर पकडून

खाण्यासाठी मजबूर केलं जायचं,

माझ्या आजे-पणजे-पूर्वजांना…


त्यांनी

ऐकलं नव्हतं कधी

आंबेडकर कोण होते ते…


शाळेत आपलं जेवण लांब,वेगळं

बसून खाणार्‍या बापानं वाचलं होतं

आंबेडकर कोण होते ते…


मी लहानपणापासून जाणले होते

आंबेडकर कोण आहेत ते…


आता जेव्हा कुणी विचारतं की

हे आंबेडकर कोण आहेत,त्यांना

मी केवळ एवढेच सांगू शकतो की

आंबेडकर समजून घेण्यासाठी 

पिढ्यानपिढ्या खर्ची पडतात….


डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे 

एका दिवसाच्या मुठीत सापडणारं व्यक्तिमत्व नव्हे!


कवी मुसाफिर बैठा बाबासाहेबांवरील प्रेमाने ओथंबलेल्या

आपल्या कवितेतून माय अशी आर्त साद घालतात,पण भावनेच्या आहारी न जाता मनुव्यवस्थेचे कटकारस्थान

काय आहे याचेही भान बाळगत,अन्यायाचे समर्थन करणारांना परखडपणे जाबसुद्धा विचारतात.


आंबेडकर माझी माय


हा देह जैविक मातेने जन्मास 

घातला आहे

बाकी सर्वकाही 'आंबेडकरमाय'चं आहे


मी जे शब्द बोलतो,

मी जी चिकित्सा करतो

चहा जो मी तुझ्यासोबत

पिऊ शकतो

पाणी ज्याला तुझ्याकडून 

जातीय रंगात रंगवले गेले होते

तो आपला नैसर्गिक रंग मिळवण्याचा

पुन्हा मी आता 

अधिकार मिळवला आहे

शिक्षण जे फक्त तुझेच होते

ते प्राप्त करून आता

आपली अस्मिता जाणून घेण्याचा

आणि तिचे रक्षण करण्याचा 

मी प्रयत्न करतो आहे.


माता तर तुझ्याही दोन आहेत

तुझीसुद्धा एक पुरुषमाता आहे

जोवर तू या ब्राह्मण्यवादी मातामुखातून म्हणजेच 

ब्रह्म्याच्या मुखातून जन्म 

घेत राहशील,

या मानसमातेवर अवलंबून राहशील

तोवर तुझ्या देहाची जननी आणि समस्त जैविक माता 

तुझ्या अस्तित्वाने कलंकित होत राहतील.


तुझी पुरुषमाता तुला अमानवी बनवते

उलट माझी आंबेडकरमाय मला तुझ्यातल्या मनुविचाराशी लढण्याचे, भिडण्याचे बळ देते

त्याआधारेच तुला झिडकारण्याच्या,

आव्हान देण्याच्या 

रचनानिर्मितीसाठी सक्षम आहे!


मला माझ्या मातांचा अभिमान आहे

आणि तुला??


मूळात हिंदीभाषिक जनतेच्या राज्यांना राजकीय भाषेत

गायपट्टा म्हणून ओळखले जाते,कारण तिथे 

जातीयवादी आणि धर्मवादी राजकीय पक्षांचे वर्चस्व वाढत

चालले आहे.पण बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकर-पेरियार अशा

महामानवांचे विचार तळागाळात जिथे पोहोचलेले आहेत

असा प्रदेशदेखील हाच आहे.सध्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या

वावटळीत सापडल्यामुळे सामान्य जनता हतबल आहे,पण

आजही परिवर्तनवादी विचाराच्या प्रेरणेची धग आपल्याला

इथल्या आंबेडकरी साहित्यातून जाणवते.

म्हणूनच तर याच प्रदेशातला अरविंद पासवान सारखा कवी आपल्या आंबेडकर या कवितेत थेटच लिहितो,


‘तो कुणी 

देव अथवा ईश्वर नव्हता

मंदिरात कैद व्हायला

मुर्ती बनून दगडासारखा


ना कुणी दूत-प्रेषित होता तो

परमेश्वराने पाठवलेला,

वेगवेगळ्या लीलांमध्ये सहभागी व्हायला


तो कुणी खुदादेखील नव्हता निर्विकार


तो एक मनुष्य होता

प्रज्ञा,करुणा आणि समतेचे विचार घेऊन माणुसकाळजाने बनलेला

माणसाच्याच तिरस्काराच्या धगीवर तापलेला एक मनुष्य

जो युगानयुगापासून छळले गेलेल्या

माणसांची वेदना जाणत होता

समजून होता की

देव नाहीये

माणूसच माणसाच्या 

मुक्तीचा मार्ग आहे.’


आज तमाम आंबेडकरी जनतेला बाबासाहेब हे आपले

मुक्तीदाते वाटतात याचे कारण या युगनायकाने आपले

संपूर्ण जीवन एका ध्येयासाठी पणाला लावले होते,वंचित,उपेक्षित वर्गाला

त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्या होत्या.म्हणूनच बाबासाहेबांविषयीचा अथांग कृतज्ञताभाव व्यक्त करताना कर्मानंद आर्य विलक्षण भावूक होतात,

आणि भावनावेगाने लिहून जातात…..

याच्यापूर्वी ना धरती होती ना माती

ना कुठली कला होती ना कुणी कलावंत,

ना तिरस्कार होता ना होते प्रेम

मग तू मातीला स्पर्श केलास

कला निर्माण झाली

कलावंत निर्माण झाले

प्रेम जन्माला आले

तू एक मुर्ती कोरलीस

एक मुर्ती निर्माण झाली

रंग जन्माला आले

जो आतापर्यंत रंगहीन होता

हे निश्चित होते

तू आपल्या काळाला समजून घेतले होते

तुला ठाऊक होते

येणारा काळ हा तुझाच आहे

धरतीत,मातीत,कलेत

तूृ कसले अमर्त्य प्राण ओतले होतेस

माझ्या कलावंता?


बाबासाहेब आंबेडकरांविषयी समकालीन हिंदी कवितेतून

व्यक्त होणारा हा भाव म्हणजे अस्सल माणुसकीचा सुगंधच

आहे.बाबासाहेबांचे जाज्ज्वल्य विचार म्हणजे

शतकानुशतके अंधारात चाचपडत असलेल्या वस्तीत उगवलेला स्वातंत्र्याचा तेजोमय सूर्यच जणू! 

म्हणूनच तर प्रज्ञासूर्याविषयी लिहिताना कवींची लेखणी अखंडपणे तळपत राहाते,वेदनेने पाझरत राहाते.

—-----

भरत यादव,

मुक्त पत्रकार

yadavb515@gmail.com

९८९०१४०५००.









टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने