🚩
कुणाची कुणाशी
करावी तुलना
काहीच कळेना
बये तुला!
मंदबुद्धी झाले
कलीयुगी देव
तुझी उठाठेव
अनाठायी!
श्रद्धेच्या नावाने
अंधश्रद्धा सुरू
स्वामी किंवा गुरु
फसवती!
इथे विवेकाला
मिळे तिलांजली
गुलामीची झाली
सुरुवात!
चिकित्सेला नसे
जिथे मुळी वाव
वाढतो जमाव
निर्बुद्धांचा!
अक्कल गहाण
पडली म्हणून
बुद्धीचा विझून
जाय दिवा!
बेढबपणाला
प्रतिष्ठीत केले
दास शोभलेले
पेशव्यांचे!
चंगळवादाची
जिथे भलावण
पापही पावन
होत असे!
घडावे अखंड
घोर कर्मकांड
मठाची निकड
भागवावी!
ऐतखाऊ ऐसे
चटावले कैक
चालविती ठोक
धर्मधंदा!
सोन्याचांदीमध्ये
तोलती भक्तीला
उन्माद-मस्तीला
उत्तेजन!
संप्रदाय झाले
शोषण सापळे
शोषकांचे मळे
फुलविती!
'देवळात जळे
पुजार्याचे पोट'
उद्गार हे नीट
ध्यानी घ्या रे!
खराट्याने ज्याने
जोडला समाज
मठातला माज
झोडलेला!
गाडगेबाबांचा
मार्ग तुकोबांचा
धर्म माणसांचा
सांगितला!
🚩
-भरत यादव