सत्यशोधकी अभंग

सत्यशोधकी अभंग

सत्यशोधकी अभंग!
🚩
पेशव्यांचा देव
बैसला बोकांडी
विकृत थोतांडी
स्वरुप हे!

समाजमनाला
केले गा भ्रमिष्ट
इष्ट की अनिष्ट
समजेना!

सत्य समतेची
हरवली खूण
कल्पनेची धून
वाजवती!

विस्मरोनी सत्य
भजनी लावले
वाहवत नेले
बहूजना!

वर्गणी पूरता
उरे कार्यकर्ता
कर्मकांड सत्ता
विस्तारली!

घरचा गणपती
रस्त्यावर आला
उत्सवाचा झाला
महास्फोट!

आता उत्सवाचा
बाजार बनला
जो तो झिंगलेला
उन्मादात!

मराठा मावळा
बडवतो ढोल
ढासळला तोल
स्वराज्याचा!

लढाऊ बाण्याला
झाली भटबाधा
आणि चेंदामेंदा
सह्याद्रीचा!

स्वाभिमानशून्य
भक्तीत तल्लीन
शिव-शंभू भान
हरपले!
🚩
      -भरत यादव
Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने