आजकालच्या ओव्या

आजकालच्या ओव्या

आजकालच्या ओव्या!

जुलूमशाहीचा मिरविती टेंभा
खुर्च्या चाटती लाचार जीभा
रामशास्त्री घालवितो शोभा
न्यायासनाची! ।।१।।

संविधानाविपरीत कारभार
लोकशाहीविरोधी सत्ताचार
न्यायदानाची खिल्ली अपार
उडविली बा! ।।२।।

न्यायाची ना इथे उरली चाड
महाविलंबाची चंद्रचूडी खोड
अपराध्यांचेच पुरविती कोड
मनःपूर्वक! ।।३।।

सत्य पडले आहे खितपत
असत्याची सरबराई सतत
न्यायव्यवस्था खंगत खंगत
मरूनी जाय! ।।४।।

जनहिताची न करती पर्वा
लोकशाहीनिष्ठतेचा कांगावा
संविधान पालनाचा देखावा
करती व्यर्थ! ।।५।।

न्यायबुद्धीला चढलेला गंज
कर्मकांडासाठी सदैव सज्ज
न्यायदेवतेला भारतीय साज
चढविला आता! ।।६।।

हीच ऐतिहासिक कामगिरी
मुजोरांची दुर्लक्षिली मुजोरी
नि निरपराध्यांना तुरुंगवारी
घडविली बा! ।।७।।

नवीन देवता बनवली सुंदर
तेहतीस कोटीत टाकली भर
आज संविधान,पुढे काय असणार?
देवतेहाती! ।।८।।

                          -भरत यादव
                     Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने